उ:शाप (ऐश्वर्य पाटेकर)

Aishwary-Patekar
Aishwary-Patekar

त्याचं मन धाकधुक करू लागलं. एवढी नामी संधी घोड्यावर बसायची आली होती, पण आजोबामुळं जाणार म्हणून तो मनातून आजोबांवर खूप चिडला होता. पुन्हा पाय ओढत ओढत मामाच्या घराकडं निघाला. त्याला माहिती होतं, की सद्या घरी आला असेल, आता कशाचं आपल्याला घोड्यावर बसता येईल. तो घरी आला आईकडं चहा-साखरी दिली. पाहिलं तर सद्या आला नव्हता. त्याला खूप आनंद झाला. आता मात्र एकही क्षण दवडायचा नाही. म्हणून तो घाईत लाकडी घोड्याजवळ आला. अन् टांग मारून घोड्यावर बसला. अन सद्याने येऊन त्याला जोरदार धक्का दिला...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दत्तोबानं घोडा घ्यायचं ठरवलं अन् सारं गाव टेन्शनमध्ये आलं. गावभर खलबतं झाली. पाच पंचांची मीटिंग बोलवली. साहजिकच दत्तोबाचा घोडा हाच मिटिंगचा विषय होता. साऱ्या गावाचं लक्ष पंचांच्या निर्णयाकडं लागलं. कारण तो, दत्तोबा तिरसटासारखं कुणाचंच ऐकेना, ना कुणाला जुमानीत होता. घोडा घ्यायचाच या निर्णयावर ठाम होता. पंचांमधील वयस्क मधुअण्णानं विषयाला तोंड फोडलं,
“पोरा, कशापायी हे तू डोक्यात घेतलं हायं, माझं आयक, काढून टाक डोक्यातून!”
“म्या घोडा घेनार म्हण्जे घेनार! माला कुणी उगाच आडवू नका!”
“आरे, आमी तुही आडवणूक न्हायी करतय!”
“मग हे काय करून ऱ्हायले? म्या काय दूधपेता बच्छा हाये का? माला कायी कळत न्हायी!”
“अण्णा म्या तुमाला म्हन्लो व्हतो तो सरळ आयकनार न्हायी!” पांडू गोपाळा म्हणाला.
“म्हणजे तुमी काय माह्या डोक्यात दगड घालनार का?”
“ह्ये बघ आमी तुला फक्त समजून सांगतोय!”
“सरळ सरळ सांगा नं तुमी जळून ऱ्हायले माह्यावर! शेळी घ्यायची आयपत न्हायी तुम्ची. म्या घोडा घेतोय ते तुमाला काय सहन व्हणार का?”
“घोडा घे न्हायी त हत्ती. आमची नको आयपत काढू. अण्णा ह्या गाढवापुढं गीता वाचून उपेग न्हायी!”
“ह्ये पांगळ्या तू माला काय गाढव म्हणून ऱ्हायला का?”
दत्तोबा हातघाईवर आला. गावातले दोनचार जण उठले अन् गाव ह्या बैतल माणसाला समजावीत बसण्यात काहीच उपेग होणार न्हायी या निर्णयावर येऊन गप्प बसले. गाव गप्प बसलं असलं, तरी दत्तोबा गप्प बसला नव्हता. तो घोड्याच्या बाजारात जाऊन येत होता. त्यास त्याच्या मनाजोगता घोडा काही मिळत नव्हता. गाव प्रचंड दहशतीखाली जगत होतं. त्याला घोडा मिळाला नाही हे गावाला कळलं, की लोक सुस्कारा टाकायचे अन् पुढं पाऊल टाकायचे.
दत्तोबा घोडा घेणार याची जी दहशत गावाला बसली, की घरोघरी वेगळ्याच गोष्टी सुरू झाल्या. गावातलं राम सुताराचं पोरगं म्हसू आपल्या बापाला म्हणालं,
“अण्णा महा लग्न करून टाका बरं!”
“आर इथं गाव काय टेन्शनमधी आलं! तुझं काय मधीच लग्नाचं निघालं! ते दत्ते घोडा घेऊन येतंय तुला कळतं का?”
“म्हणून त म्या माह्या लग्नाचं म्हणून ऱ्हायलोय!”
“व्हय ती गाय वरडून ऱ्हायली. तिला पाणी पाजायला घेऊन जाय नदाडावर!”
“अण्णा तेवढं माह्या लग्नाचं ध्यानात ठिवा!”
“हा व्ह्यय व्ह्य ठिवतो म्या ध्यानात!”
म्हसू नाखुशीने गाईला पाणी पाजायला निघून गेला. इकडे त्याची आई कमल त्याच्या बापाला म्हणली,
“अवं, आयकता का?”
“आता तुझं काय?”
“बाई, माही मोहनमाळ सोडून आणा बरं!”
“आता तुला काय पडलं मोहनमाळीचं!”
“अवं, फुटका मनी सोन्याचा तुमी मला कधी घेतला न्हायी पर माझ्या आईनं देलेली मोहनमाळ सदा गहाण ठिवता. माही गळ्यात घालायची हौस ती कधी झाली न्हायी, ह्ये दत्त्याचं घोडं आलं तं समद ऱ्हावून जाईल!”
हे काही एका घराचं चित्र नव्हतं हर घरात काही न काही चालू होतंच. पारावरही सुरु होतं अन् चावडीवरही,
“ह्या दत्त्याला माहिती नसावं का घोड्याचं?”
“आरं, त्या निर्बुद्ध्याला म्हयीती असतं तर त्यानं घोडा आणण्याची बातच नसती न केली!”
“त्याची अक्कल कुडं शान खाया गेली, कायी कळनं ? आयकूच न्हायी ऱ्हायलं गाभडू!”
दत्तोबाची अक्कल काही शेण खायला गेली नव्हती. त्याला घोडा का घ्यायचा आहे हे काही लोकांना माहिती नव्हतं. त्याच्या बालपणात घडलेली गोष्ट आहे ती. तेव्हा तो सात-आठ वर्षांचा असंल. मामाच्या घरी सुट्टीत गेला होता. मामाच्या पोराकडं लाकडी घोडा होता. तो दत्तोबाला जराही त्या लाकडी घोड्याला हात लावू देत नव्हता. त्यानं त्याच्या आईला सांगितलं, की मालाही असाच घोडा घ्यायचा. आईनं सणसणीत मुस्कटात ठेवून दिली. तरी त्यानं त्या लाकडी घोड्याचा नाद सोडला नव्हता. अगदी त्याला घोडा हवाच होता असं नाही. एकदा जरी तो त्या लाकडी घोड्यावर बसला, तरी त्याचं मन शांत झालं असतं. पण मामाचं पोरगं महाखट्याळ. मामाच्या गावाजवळच्या गावाला जत्रा भरली होती. खरंतर ह्यालाही जत्रेची ओढ होती. पण जत्रेमुळंच त्याची मनोकामना पूर्ण होणार असते. त्याच्या लहान भावानं आणि बहिणीनं त्यास खूप काय जत्रेचं आमिष दाखवलं, पण काही केल्या तयार झाला नाही. तो उलट मामाच्या मुलाची म्हणजे सद्याची जत्रेला जायची वाट पाहू लागला. तो गेला की तो मनसोक्त लाकडी घोड्यावर बसणार होता. त्याच्या भावाबहिणीच्या दृष्टीने तो खूप मोठ्या आनंदाला मुकला होता, पण त्यांना काय माहीत घोड्यावर बसण्याचा आनंद हा त्या आनंदाहून मोठा आहे! एकदाचा सद्या जत्रेला गेला.
दत्तोबाला असं झालं, की कधी आपण घोड्यावर जाऊन बसतो. आता घोड्याचा मालक आपणच. दुष्ट सद्या आता आसपास नाही. फक्त आपले राज्य. तो अधिरतेनं घोड्याजवळ पोचला अन् त्याला हात लावणार तोच त्याच्या आईनं त्यास हाक मारली.
“अरे, आजोबाच्या पोटात दुखायला लागलं. रम्या भगताकडून औशद घेऊन ये!”
खरंतर दत्तोबाला म्हणावसं वाटलं, की मी नाही जाणार. पण त्यालाच त्याच्या मनाला समजावलं, की अख्खा दिवस पडलाय आपल्याला घोड्यावर बसण्यासाठी. ये झट जाऊन पट औशद घेऊन येऊ! त्यानं त्याच्या गाडीला गेर टाकला धुम पळत गाव गाठलं. रम्या भगताच्या दाराशी जाऊन उभा ऱ्हायला. त्याची बायको म्हणाली, की झाडपाला आणायला तो जंगलात गेला. पण येईल यवड्यात!”
एक तास झाला. दोन तास झाले. रम्या भगताचा काही तपास नव्हता. दत्तोबानं नाद सोडला, म्हणून तो मळ्यात निघाला तर रम्या हजर.
“माह्या आजोबाच्या पोटात दुखून ऱ्हायल औशद द्या लवकर!”
“आरं, कायी दम खाऊन देशील का न्हायी, जंगलात गेलो व्हतो कुडं फिरायला न्हायी!”
“यवडा टाइम न्हायीये माझ्याकडे”
“आरं, तू तं घोड्यावरस हाये!”
“घोड्यावर न्हायी नं इडून गेलो का म्या घोड्याव बसणार”
रम्यानं पाला खलबत्यात घालून कुटला अन् याच्या हाती दिला. यानं पुन्हा तोंडाने ब्रूर्म ब्रूर्म करून आपल्या गाडीचा गेर टाकला. घरी येऊन त्यानं औषध आईकडं दिलं अन् पुन्हा पळाला लाकडी घोड्याकडं. आता आपल्याला घोड्यावर बसण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. लाकडी घोडा त्याला खुणावत होता. आता लगाम खेचून तो बसणारच होता, तर आईनं पुन्हा हाक मारली,
“आरे, आजोबा चहा मागून ऱ्हायले आन् चहा-साखरी बी न्हायी घरात. जाय वाण्याच्या दुकानातून घेऊन ये!”
“आधीच सांगायचं नं आई!”
“माला काय माहिती ते चहा मांग्तील म्हणून! माला का सपनं पडलं व्हतं का?”
“न्हायी आई म्या न्हायी जाणार?’
“ह्ये पाय दहा पैसे वाढवा देले तुला लेमन गोळ्याबी घेऊन ये!”
एरवी लेमन गोळ्याच्या अमिषासाठी त्याची काहीही करायची तयारी असती. पण आता लेमनच्या गोळ्याही त्याच्यासाठी उपयोगाच्या नव्हत्या. त्याला बसायचं होतं ते फक्त लाकडी घोड्यावर. त्यामुळं त्यानं आईला ठाम नकारच दिला. त्यामुळे आई चिडली,
“तुला माणसाच्या जीवाचं हाये की न्हायी कायी. धर हे पैसे. पहिलं चहा-साखरीचं घेऊन ये!”
त्याचा नाईलाज झाला. आता मात्र त्यानं त्याच्या गाडीचा गेर टाकला नाही. तो पाय ओढत ओढत गावात गेला. वाण्याच्या दुकानात ही भली मोठी गर्दी. त्याचा नंबर लागता लागता चार वाजायला आले होते. त्याचं मन धाकधुक करू लागलं. एवढी नामी संधी घोड्यावर बसायची आली होती, पण आजोबामुळे जाणार म्हणून तो मनातून आजोबावर खूप चिडला होता. पुन्हा पाय ओढत ओढत मामाच्या घराकडे निघाला. त्याला माहिती होतं, की सद्या घरी आला असेल. आता कशाचं आपल्याला घोड्यावर बसता येईल. तो घरी आला आईकडे चहा-साखरीचं दिलं. पाहिलं तर सद्या आला नव्हता. त्याला खूप आनंद झाला. आता मात्र एकही क्षण दवडायचा नाही. म्हणून तो घाईत लाकडी घोड्याजवळ आला. अन् टांग मारून घोड्यावर बसला. अन् सद्यानं येऊन त्याला जोरदार धक्का दिला. तो धपकन खाली पडला.
“ये भिकारद्या माझ्या घोड्यावर तू बसलाच कसा?”
“एय, या लाकडी घोड्याचं यवडं कौतुक नको मिरू. म्या तुला खरोखरच्या घोड्यावर बसून दाखवील!”
“चल, कुणाला सांगून ऱ्हायला? तुमाला त खायला ते मिळत न्हायी आमच्या घरी येऊन ऱ्हाता, आन् बाता मारून ऱ्हायला!”
सांगा आता ज्याच्या आयुष्यात असं काही घडून गेलं, त्याची खबर आहे का त्या गावाला? म्हणे घोडा घ्यायचा नाही!
शेवटी त्याला हवा तो घोडा विजापूरच्या बाजारात मिळाला. त्याला असंही वाटून गेलं, की एकदा घोडा गावात मिरवण्याआधी मामाच्या गावाला जाऊन येऊ अन् सद्याची घमेंड उतरवून येऊ. घोडा जो निघाला सुसाट, तो मामाच्या गावाच्या वेशीपाशी येऊन थांबला. घोड्यानं टाप उचलली अन् वेशीच्या आत टाकली. तोच गाव नष्टं झालं. बाजूच्या झाडाखाली बसलेला माणूस त्याला म्हणाला,
'अरे, नतद्रष्टा हे काय केलं तू ? आता कुणाला दाखवशील तुझा घोडा ? तो पहायला गावच न्हायी!'

दत्तोबाला खूप वाईट वाटलं, की सगळ्यांनी आपल्याला घोडा घ्यायचा नाही. हे सांगितलं, पण एकानंही तो का घ्यायचा नाही? हे सांगितलं नाही. हा शाप कुठं ठाऊक होता आपल्याला. आता कुणाला दाखवायचा आपला घोडां ? म्हणून त्यानं घोड्याचा लगाम ओढला अन् घोडा वळवला दरीच्या दिशेनं... तो इतका वेगात गेला की घोड्यासकट दरीत...

इकडं गाव विजापूरला गेलेल्या दत्तोबाची वाट पहात होतं... त्यानं घोडा आणला तर शेवटचाच दिवस असेल आपला? पण गावाला कुठं माहिती होतं, की स्वतः उ:शाप भोगून त्यानं गावाला जीवदान दिलंय...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com