आंबा घाटातील निसर्गाची उधळण

Amba-Ghat
Amba-Ghat

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय. पावसाळ्यात हा संपूर्ण प्रदेश हिरवाईनं नटलेला असतो.

पाहावं तिथं धबधब्यांचं साम्राज्य. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वाऱ्याच्या झुळकीवर झुलणारं हिरवंगार गवत आणि विविध रानफुलं लक्ष वेधून घेतात. याच सह्याद्रीच्या कुशीत वसलाय आंबा घाट. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर. पश्‍चिम घाटातलं जैववैविध्य इथंही ठायी-ठायी दिसतं. पावसाळ्यात आंबा घाटाचं सौंदर्य तर खुलतंच, पण उन्हाळ्यातही थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटक इथं गर्दी करतात. ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरहून कोकणात उतरण्यासाठी या परिसरातून रस्ता नव्हता. आंबा गावच्या एका गुराख्यानं तो ब्रिटिश अभियंत्याला दाखवला. कालांतरानं हा घाटरस्ता झाला. त्यानंतर त्याचं नाव पडलं आंबा घाट.

इतिहासाच्या पाऊलखुणा आजही या परिसरात आढळून येतात. कोल्हापूरपासून सुमारे ७६ किलोमीटरवरील किल्ले विशाळगड किंवा खेळणा हा इतिहासातील गतवैभवाचा ठळक दागिना. शिलाहारांच्या राजवटीत राजा मानसिंह यानं १०५८मध्ये हा किल्ला बांधला. त्यानंतरची काही शतकं तो हिंदू राजांच्या ताब्यातच होता. पुढं १४५३मध्ये बहामनी राज्याचा सरदार मलिक उत्तुजार, हा प्रदेश काबीज करण्यासाठी आला. सर्वांत प्रथम तो थडकला पन्हाळगडाच्या पायथ्याला. दीर्घकाळ त्याचा वेढा उठण्याचं लक्षण न दिसल्यानं, किल्लेदार शिर्के यांनी त्याला विशाळगडाचं आमिष दाखवलं.

या आमिषाला भुलून तो विशाळगडाच्या पायथ्याच्या निबिड अरण्यात तळ ठोकून बसला. विशाळगडाचे किल्लेदार मोरे यांनी वरून जोरदार हल्ला केला आणि दुसरीकडून शिर्क्‍यांनी हल्ला चढवला. दोन्ही सैन्याच्या कात्रीत सापडलेल्या उत्तुजारची दाणादाण उडाली. स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६५९मध्ये खेळणा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव विशाळगड असं ठेवलं. विजयपूरच्या आदिलशाहचा सरदार सिद्दी जोहर यानं पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर, त्याच्या हातावर तुरी देऊन महाराजांनी चोरवाटेनं विशाळगड गाठला. अवघ्या ३१२ मावळ्यांच्या साह्यानं जोहरच्या भल्या मोठ्या सैन्याला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा हा प्रदेश साक्षीदार आहे.

वाहनतळावरून गडाकडं जाण्यासाठी एकच वाट आहे. प्रत्यक्ष गडाची चढाई सुरू करण्यापूर्वी एक लोखंडी पूल ओलांडावा लागतो. ही चढाई साधारणपणे अर्ध्या तासांची आहे. गडावर हजरत मलिक रिहान यांची कबर आहे. दरवर्षी हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. तट आणि काही बुरूज यांशिवाय गडावर काहीच शिल्लक नाही. गडावर निवास आणि भोजनाची सोय होऊ शकते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंच आहे.

विशाळगडाच्या पूर्वेला सुमारे दहा किलोमीटरवर पावनखिंड आहे. बाजीप्रभूंच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी गजापूरच्या या खिंडीचं नाव पावनखिंड असं ठेवलं. गजापूर, पांढरपाणी आणि येळवण जुगाईच्या मध्येच ही खिंड आहे. खिंड आणि त्यापुढची दरी सुमारे सात किलोमीटर लांबीची आहे. दरीतून कासरी नदीचा उगम होतो. खिंडीशेजारी ध्वज उभारण्यात आला आहे. जवळच बाजीप्रभूंचं स्मारक उभारण्यात आलं आहे. ही खिंड समुद्रसपाटीपासून सुमारे १७०० फूट उंचीवर आहे.

ज्या गावामुळं घाटाचं नाव पडलं, त्या आंबा गावाला लागूनच जुनी देवराई आहे. संपूर्ण परिसर दाट जंगलानं व्यापलेला आहे. सदाहरित, मिश्र सदाहरित आणि पानझडी अशा तिन्ही प्रकारची जंगलं इथं अनुभवता येतात. आंबा गावाजवळच्या माणोली बंधाऱ्याच्या परिसरातील जंगलात दिवसा भटकता येतं. इथल्या जंगलात गवे रेडे विशेषत्त्वानं दिसतात. विशाळगडाच्या रस्त्यावर घाटमाथ्यावर सकाळी किंवा संध्याकाळी ते हमखास दिसतात.

त्याशिवाय विविध प्रकारचे पक्षी इथं वास्तव्य करून आहेत. शेकरू किंवा जायंट स्क्विरलही इथं दिसते. या जंगलात बिबटे, सांबर, भेकर आणि क्वचित पट्टेरी वाघही दिसतो. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंमध्ये आंबा घाट पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात सर्वत्र धुक्‍याची दाट दुलई पसरलेली असते. मात्र, पावसाळ्यात जळवांचा सुळसुळाट वाढतो. त्यासाठी योग्य सावधगिरी घ्यावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com