निघोजचा भौगोलिक चमत्कार - रांजणखळगे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

कसे जाल? - पुण्यापासून निघोज सुमारे ११२ किलोमीटर. पुणे-नगर रस्त्यावर शिरूर गावानंतर काही अंतरावर निघोजचा फाटा आहे. शिक्रापूरहूनही एक फाटा निघोजला जातो. निघोजमध्ये भोजन आणि निवासाची सोय आहे.

वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना कापत पुढं जातो. प्रवाहाबरोबर दगड-गोटे आणि इतरही वस्तू वाहत असतात.

या खडकांशी लाखो वर्षं सातत्यानं घर्षण होत राहिल्यानं हा कॅनियन किंवा दरी निर्माण झाली. ही दरी तब्बल ४४६ किलोमीटर लांब आणि २९ किलोमीटर रुंद आहे. अशाच भौगोलिक चमत्काराचा छोटा आविष्कार, निघोज (जि. नगर) इथंही पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट आणि व्हेसिक्‍युलर बेसॉल्टचा एका आड एक थर आहे व त्यातून कुकडी नदीचा प्रवाह वाहतो. या खडकांमध्ये सुमारे २०० मीटर लांब आणि काही ठिकाणी ६० मीटर रुंद दरी तयार झाली आहे.

याच दरीत नदीनं कोरून काढलेली चित्तवेधक पाषाणशिल्पं दिसतात. अनेक ठिकाणी खडकांना रांजणासारखा आकार प्राप्त झाल्यानं त्याला सामान्यपणे रांजणखळगे असं म्हटलं जातं. प्रवाहातून वाहत आलेले लहान-मोठे दगड नदीपात्रात तयार होणाऱ्या भोवऱ्यांमुळे गोल फिरत राहतात. त्यामुळं वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच आहेत रांजणखळगे. लाखो वर्षांपासून ही क्रिया घडत असल्यानं, पात्रातील खडकांना खळग्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला पॉट होल्स म्हणतात. या रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

कुकडी नदीच्या पात्रातले काही रांजणखळगे खूप खोल आहेत. काही ठिकाणी छोटी गुहा आणि काही ठिकाणी पाषाणाला मधोमध कोरून त्यातून पाण्याचा प्रवाह वाहतो. नदीच्या या विशिष्ट ठिकाणच्या पात्रातले पाषाण, अंतरंगात कठीण आणि बाहेरच्या बाजूनं मृदू आहेत. नदीच्या प्रवाहानं मृदू भाग कोरून काढला आहे. लाखो वर्षांपासून घर्षणाची ही क्रिया घडत असल्यानं, पाषाणांची आकर्षक शिल्पं तयार झाली आहेत. या लहानशा दरीत एक छोटा धबधबाही आहे. इथल्या काही कुंडांमध्ये दीर्घकाळ पाणी साठून राहात असल्यानं, तिथं हायड्रिला किंवा वॉटर थाईम नावाची वनस्पती उगवते.

खळग्यांच्या तळाशी उगवणाऱ्या या वनस्पतीच्या फांद्या प्रसंगी २५ फुटांपर्यंत वाढतात. अशा असंख्य फांद्यांमुळं तळ दिसेनासा होतो.

पाण्याच्या उपलब्धतेमुळं पशुपक्षी या ठिकाणी आकर्षित होतात. चिखलानं घरटं बांधणारे स्वॅलो पक्ष्यांची लगबगही इथं पाहता येते. काही वर्षांपूर्वी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. परिणामी पाण्याचा ओघ काहीसा कमी झाला आहे. पर्जन्यछायेत असलेल्या या प्रदेशात पाऊस तसा कमीच होतो. त्यामुळं पावसाळ्यातही हा चमत्कार कधीकधी पाहता येऊ शकतो. नदीच्या प्रवाहावर एक झुलता पूलही बांधण्यात आला आहे. त्यामुळं रांजणखळगे वेगवेगळ्या कोनातूनही पाहता येणं शक्‍य झालंय. किनाऱ्यावर श्री मळगंगा देवीची दोन सुंदर मंदिरं आहेत. शिवाय कपिलेश्‍वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राममंदिरही पाहण्यासारखं आहे.

निघोजपासून कान्हूर पठारमार्गे सुमारे २३ किलोमीटरवर पारनेर तालुक्‍यातील वडगाव दर्या हे छोटंसं गाव लागतं. या गावाजवळ निसर्गाचा आणखी एक चमत्कार पाहता येऊ शकतो. गावापासून सुमारे एक किलोमीटरवर एक खोल दरी आहे. ही दरी हिरवाईनं नटलेली असते. दरीतच दर्याबाई आणि वेल्हाबाई या देवींची स्थानं आहेत. दरीत मंदिरापर्यंत उतरून जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आढळून येतात. इथं माकडांचा मुक्त संचार दिसतो. देवीचं मंदिर प्रचंड खडकातील गुहेत आहे. या गुहामंदिराच्या छतातून सतत क्षारयुक्त पाणी वाहत असतं. हे वाहणारं पाणी आपल्यासोबत क्षार घेऊन येतं. क्षाराचे हे कण भिंतीवर स्थिरावतात. वर्षानुवर्षं चाललेल्या या प्रक्रियेमुळं मंदिरात लवणस्तंभ तयार झाले आहेत. मंदिरात परशुरामाची मूर्ती आहे आणि शंकराची पिंडही आहे. वडगाव दर्याहून पुन्हा निघोज, टाकळी हाजीमार्गे मोराच्या चिंचोलीलाही जाता येतं. हे अंतर सुमारे ४६ किलोमीटरवर आहे. परतीच्या प्रवासात इथं जाता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Arvind Telkar on Nighoj Village Geographical Miracles