समुद्रस्नानाची पर्वणी-गुहागर

अरविंद तेलकर
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

कसे जाल
गुहागर हे पुण्यापासून सुमारे २९८ किलोमीटर आणि मुंबईहून २७७ किलोमीटरवर आहे. चिपळूणहून ६० किलोमीटर आणि रत्नागिरीहून ९० किलोमीटरवर आहे. गुहागर, हेदवी, वेळणेश्‍वर अशा सर्वच ठिकाणी निवास आणि भोजनाची उत्तम सोय आहे.

वीकएंड पर्यटन
कोकणचा किनारा नेहमीच पर्यटकांना भुरळ पाडत आला आहे. ती लाल माती, ती लाल कौलांची घरं, नारळी-पोफळीच्या बागा, सह्यगिरीच्या उत्तुंग रांगा, घनदाट वनश्री हौशा-नवशा-गवशांना नेहमीच साद घालतात. अथांग पसरलेल्या अरबी महासमुद्रात पोहण्याची मौजच काही आगळी. कोकणी मेवा तर प्रसिद्ध आहे. या सौंदर्यस्थळांपैकी एक आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं गुहागर.

रत्नागिरी जिल्ह्यातलं हे एक प्रमुख तालुका केंद्र. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक टुमदार शहर. वाहतुकीची धामधूम इथं नाही. कोकणातल्या अन्य शहरांप्रमाणंच इथले रस्तेही अरुंद. गुहागर प्रसिद्ध आहे ते नारळ आणि सुपारीच्या बागांमुळं. ही भगवान परशुरामांची पवित्र भूमी. चिपळूणच्या अलीकडं परशुराम घाट उतरल्यानंतर गुहागरकडं जाणारा मार्ग आहे. या गावात वड आणि पिंपळाचे विशाल वृक्ष पाहता येतात. या परिसरात फिरण्यासारखी अनेक स्थळं आहेत. उफराटा गणपती, श्री व्याडेश्‍वर, गाव-मळण, वेळणेश्‍वर, हेदवी, बामणघळ, रोहिला, तवसाळ आणि गोपाळगड ही त्यापैकीच काही ठिकाणं. दाभोळ ऊर्जा प्रकल्पापासून अंजनवेल सहा किलोमीटरवर आहे आणि तिथून गोपाळगड दोन किलोमीटरवर. गड एकूण सुमारे सात एकरांवर वसवला होता. वेलदूर गावातनं बोटीतनंही या गडावर येता येतं. अंजनवेलला एक दीपगृहदेखील आहे.

वेलदूरच्या दिशेनं गुहागरमध्ये प्रवेश केल्यास डाव्या हाताला दुर्गादेवीचं प्राचीन मंदिर लक्ष वेधून घेतं. हे मंदिर तेराव्या शतकात बांधल्याची माहिती उपलब्ध आहे. मंदिर हेमाडपंती पद्धतीचं आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराला लागून असलेल्या तळ्यात भरपूर कमळं फुललेली पाहायला मिळतात. हे मंदिर पाहून झाल्यानंतर शहरात प्रवेश करताना डाव्या हाताला उफराटा गणपतीचं मंदिर लागतं. साधारणपणे तीन शतकांपूर्वी समुद्राचं पाणी वाढलं होतं. त्या वेळी गुहागर गाव संपूर्णपणे पाण्यात बुडून जाईल, अशी गावकऱ्यांना भीती वाटली. त्यांनी गणेशाला साकडं घातलं आणि पूर्वेकडं मुख असलेल्या गणेशाच्या मूर्तीचं मुख पश्‍चिमेकडं फिरवलं. तेव्हापासून त्याला उफराटा गणपती असं म्हणतात. गुहागरचा लांबलचक पसरलेला समुद्रकिनारा हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे.

श्री व्याडेश्‍वर हे शहराच्या मधोमध असलेलं भगवान शंकराचं प्राचीन मंदिर. भगवान परशुरामाचे शिष्य व्याड मुनींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केल्यामुळं, हे मंदिर व्याडेश्‍वर या नावानं प्रसिद्ध झालं. मंदिराच्या प्राकारात नंदीचं भव्य शिल्प आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्यात गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची मंदिरं आहेत. गाव-माळण इथं कोकणातली खरी वृक्षसंपदा पाहता येते. हे गाव आनंदीबाई पेशव्यांचं मूळ गाव. गावात त्यांच्या वाड्याचे भग्नावशेष पाहता येतात. गुहागरपासून सुमारे २० किलोमीटरवर समुद्रकिनाऱ्यावर वेळणेश्‍वराचं मंदिर आहे. इथून १० किलोमीटरवरील हेदवीमध्ये श्री गणेशाचं दर्शन घेता येतं. हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर एका कोपऱ्यात समुद्राचा आगळा आविष्कार दाखवणारी बामणघळ आहे. अविरत लाटांमुळं तयार झालेल्या एका घळीतून भरतीच्या समुद्राचं पाणी एखाद्या स्तंभासारखं उंच उसळतं. किनाऱ्यावरच उमा-महेश्वराचं मंदिर आहे. रोहिला इथलं समुद्र आणि तवसाळ गावतली विजयगडची प्राचीन गढीचे अवशेष पाहता येतात. गावाला लागूनच जयगडची खाडी आहे. फेरीबोटीतून जयगडलाही जाता येतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Arvind Telkar Velneshwar Temple Guhagar supplement sakal pune today