निःस्वार्थ मदतीचे साधेपण

Help
Help

‘अवि माझ्याबरोबर बॅंकेत येतोस का? पेन्शनचे पैसे काढायचेत.’’ भेट घेऊन निघताना आत्याने विचारले.

आत्याचे मिस्टर सैन्यात होते. त्यांच्या पाश्‍चात तिला पेन्शन मिळे, जी ती बॅंकेत जाऊन खर्चासाठी काढून आणी. एरवी ती स्वतः जाई. पण, आता थकत चालल्याने तिला कोणाची तरी मदत लागत असावी. मी महिन्या-दीड महिन्याने तिला भेटायला जात असे.

‘हो येतो, मी निघालोच होतो. तुझे काम करून जाईन,’’ असे पुटपुटत मी तिच्याबरोबर निघालो. 
‘कुठे आहे तुझी बॅंक?’’ मी रस्त्यावर आल्यावर विचारले. 
‘‘ती काय समोरची,’’ रस्ता ओलांडल्यावर जेमतेम पाचशे फुटांवर असलेल्या बॅंकेकडे बोट दाखवत आत्या म्हणाली. 
‘अगं, इतक्‍या जवळ असलेल्या बॅंकेत जायला मी कशाला पाहिजे?’’ मी हसतच विचारले.

‘बरोबर आहे. मी एकटीच जात होते. पण, वयोमानाप्रमाणे थकलेय रे मी. पटपट चालता येत नाही. त्यामुळे आजकाल रस्ता ओलांडायचीसुद्धा भीती वाटते. मुले-नातवंडे येत होती. पण, आजकाल तेही बिझी झालेत. रिक्षा करण्याचाही प्रयत्न केला. पण, इतक्‍या छोट्या अंतरासाठी ते येत नाहीत आणि आले तरी परत घरी जाताना हाच प्रश्‍न! म्हणून आज तुझी मदत घेतेय,’’ आत्या रस्ता ओलांडताना माझा हात घट्ट पकडत काहीशा खिन्नतेने म्हणाली. 

मी निमूटपणे तिच्याबरोबर बॅंकेत गेलो. काम झाल्यावर तिला घराजवळ सोडून निघालो. घरी जाण्यासाठी रिक्षाला हात केला. रिक्षात बसतो ना बसतो तोच रिक्षावाला ‘‘नमस्कार काका’’ म्हणाला. 

‘अरेच्या अशोक तू?’’ असे मी म्हणेस्तोवर आम्ही निघालोही. अशोक माझ्या एका परिचिताचा पुतण्या. शेतीवर भागत नाही म्हणून शिक्षण सोडून रोजगारासाठी शहरात आलेला. सुरवातीला तो भाड्याची रिक्षा चालवत असे. एक दिवस स्वतःची रिक्षा घ्यावी म्हणून बॅंकेकडे गेला. पण गॅरेंटर असल्याशिवाय बॅंक कर्ज देईना. मग हा त्या परिचिताबरोबर माझ्याकडे आला आणि परिचिताच्या आग्रहामुळे गॅरेंटर म्हणून मी सही केली. नवीन रिक्षा आल्यावर माझ्या हस्ते पूजा करून, त्याचा व्यवसायही व्यवस्थित सुरू झाला. कदाचित, माझी मदत स्मरून तो रस्त्यावरून जाताना कधी हात करी. 

घराजवळ आल्यावर मी उतरलो. मनात विचार आला, याला विचारावे का दरमहा आत्याला बॅंकेत न्यायला? मी त्याला आत्याची गरज सांगून दरमहा तिला बॅंकेत नेऊन आणशील का? हे विचारले. 

‘का नाही नेणार? ही रिक्षा तुमच्यामुळे आहे, हे मी विसरलो नाही. यानिमित्ताने मला तुमच्यासाठी काही केल्याचे समाधानही मिळेल. चला, आपण आताच त्यांच्या घरी जाऊ. त्यांची ओळख करून द्या. त्या सांगतील त्या तारखेला मी त्यांना बॅंकेत घेऊन जाईन आणि परत आणूनही सोडेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका,’’ तो हसतच म्हणाला. मी काही म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता.

मी सहा महिन्यांनी आत्याला भेटायला गेलो. मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. अशोक दरमहा आत्याला रिक्षाने बॅंकेत नेऊन आणत होताच; पण आत्याकडून पैसेही घेत नव्हता. ‘‘माझी आई लवकर गेली. तुम्ही मला आईसारख्याच आहात. मी सेवाभावनेने हे करतोय, मला पैसे नकोत आणि तुम्ही दुसरे काहीबाही आणले, तर तेही घेणार नाही,’’ असे त्याने पहिल्या फेरीतच सांगितले होते. इतका चांगला रिक्षावाला मिळवून दिल्याबद्दल आता आत्याच काय, तर घरातले सर्वच माझे आभार मानत होते! 

दोन वर्षे गेली. आत्या थकत चालली होती.  अशोक तिला व्यवस्थितपणे बॅंकेत नेऊन आणत होता. एक दिवस माझ्या आत्येभावाचा फोन आला. आत्या गेल्याची दुःखद बातमी होती. मी तातडीने तिकडे जाऊन अंत्यदर्शन घेतले.  नंतर महिनाभराने तिकडे गेलो. किरकोळ बोलणे झाल्यावर त्याने ५,००० रुपये माझ्या हातात ठेवले. 
‘‘हे काय?’’ मी चमकून विचारले.

‘आईने जाण्यापूर्वी हे पैसे अशोकला द्यायला सांगितले होते. ती गेल्यावर तो येऊन गेला; पण माझे धाडस झाले नाही. आता तूच बघ काय करायचे ते,’ तो उत्तरला. आता धर्मसंकट माझ्यावर आले होते! 

मला फार काळ वाट पाहावी लागली नाही. काही दिवसांतच अशोकचे लग्न ठरले. लग्नानंतर मी त्या दोघांना घरी बोलावले. भोजनोत्तर माझ्या पत्नीने त्याच्या बायकोची ओटी भरली, ज्यात आत्याने दिलेल्या पैशातून आणलेली भरजरी साडी होती. सर्व हकिकत सांगूनही अशोक ती नाकारूच शकला नाही; कारण ती कोणत्याही मदतीची परतफेड नव्हती, तर आता तिला एका आईने आपल्या सुनेचे केलेल्या कोडकौतुकाचे स्वरूप प्राप्त झाले होते! 

मदत छोटी असो वा मोठी. एक ना एक दिवस तिला उदात्तता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, हेच खरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com