Virajas-Kulkarni
Virajas-Kulkarni

सेलिब्रिटी वीकएण्ड : आनंददायी ‘फॅमिली टाइम’

मालिकेतला कोणताही कलाकार अमुक एका दिवशी घरी असेलच, याचा अंदाज कधीही बांधता येत नाही. लॉकडाउनमुळे काही महिने शूटिंग बंद होतं आणि आता हळूहळू शूटिंगच्या शेड्यूलची गाडी रुळावर येतेय. आजही महिन्यातले २६-२७ दिवस मी काम करतो. शूटिंग जास्त वेळ असल्यामुळे मी घरी फारच क्वचित असतो. पण, जेव्हा मला सुटी मिळते तेव्हा ती मी नक्कीच वसूल करून घेतो. तो संपूर्ण दिवस हा माझा आहे, असं ठरवून मी ज्या गोष्टी बिझी शेड्यूलमुळे करता येत नाहीत, त्या मी सुटीच्या दिवशी करतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे उशिरा उठणं. छान हवी तशी झोप फक्त सुटीच्या दिवशीच मिळते. ती संधी मी सहसा सोडत नाही. दुसरं म्हणजे फॅमिली टाइम. मी, आई आणि बाबा; आम्ही एकमेकांना वेळ देणं या गोष्टीला खूप प्रेफरन्स देतो. एरवी आपापल्या कामांमुळे आम्हाला एकमेकांना फार वेळ देता येत नाही. या दिवशी मात्र आम्ही तिघं एकत्र वेळ घालवतो. भरपूर गप्पा मारतो, एकत्र जेवतो आणि जेवणानंतर आम्ही तिघं मिळून एखादी कौटुंबिक सीरिज, चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी बघतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मला वाचन प्रचंड आवडतं. सेटवर वेळ मिळेल तसं मी काही ना काही वाचत असतोच; पण घरी असल्यावर संध्याकाळी बाहेरचे दिवे लगेपर्यंत वाचायचं राहिलेल्या एखाद्या पुस्तकाची जितकी पानं वाचता येतील तितकी वाचतो. त्यानंतर न चुकता तासभर वेळ व्यायामाला देतो. आमच्या सेटवर सगळेच जण खूप को-ऑपरेटिव्ह आहेत. वेळ मिळेल तसं मला ते सेटवर व्यायाम करायला परवानगी देतात. पण, नियमित ठरलेल्या वेळी व्यायाम असतो तो रोज होत नाही. ती कसर मी घरी असल्यावर भरून काढतो. आमच्या बिल्डिंगमध्येच जिम आहे. तिथं मी व्यायाम करायला जातो.  तिथून घरी आलं, की तोवर आई-बाबाही घरी आलेले असतात. मग आमचा एक छान फॅमिली डिनर असतो. तो झाला की पुन्हा एक चित्रपट पाहायचा आणि मग झोपायचं, असा माझा दिनक्रम असतो. 

मला फिरायला, सायकलिंग करायला फार आवडतं. आत्ताही गरज असेल, तरच सगळे बाहेर जात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत फिरणं तसं फार झालं नाहीये. सायकलिंगबद्दल बोलायचं, तर आमच्या सीरिअलमध्ये मी सायकलनं ऑफिसला जातो, असं दाखवलंय. त्यामुळे माझी सेटवरच रोज भरपूर सायकल चालवून होते. मला दोन दिवसांची सलग सुटी मिळाली, तर मी एखाद्-दोन महिन्यांतून एकदा पुण्याला जातो आमच्या घरी. तिथं माझ्या दोन आज्या असतात, मी त्यांना भेटतो. आपला नातू इतक्या दिवसांनी आला आहे म्हटल्यावर त्याही खूप खूष असतात. माझे फार लाड करतात त्या. त्यासोबत मी माझ्या पुण्यातल्या मित्रमंडळींना भेटतो. आमचा एक नाटकाचा ग्रुप आहे पुण्यात, त्याच्या मीटिंग्ज असतात. त्या मी तिथं जाऊन अटेंड करतो. या ग्रुपअंतर्गत मी अनेक नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 

सध्या मी मालिका करत असल्यामुळे दिग्दर्शक म्हणून मी इतक्यात कधी दिसेन, हे सांगता येत नाही. परंतु, लेखनाचं माझं काम जोरात सुरू आहे. दोन सीन्सच्या दरम्यान किंवा घरी आल्यावर जसा वेळ मिळेल तसं माझं लेखन सुरू असतं. पुण्यात असा वेळ घालवल्यावर मी अगदी फ्रेश होऊन जातो. मग शूटिंगच्या आदल्या दिवशी रात्री किंवा शूटिंगच्या दिवशी पहाटे लवकर उठून पुन्हा मुंबईला यायचं आणि पुन्हा आपल्या रुटीनला सुरुवात करायची.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com