सोरायसिस समजून घेताना...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
हा त्वचारोग पेशीतील रचनेत बदल झाल्याने होतो. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये त्वचेच्या पेशी तयार होऊन त्या वरील थरातून निघून जायला साधारण तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये अंदाजे तीन दिवसांमध्येच हे चक्र पूर्ण होते व जास्त प्रमाणात पेशींची वाढ होते. यामुळे तळहात, तळपायावर डोळ्यात लाल रंगाचे चट्टे उमटतात. या चट्ट्यांवर अभ्रकासारखे पांढरे चकचकीत पापुद्रे तयार होतात.

ते रुग्णाच्या आजूबाजूला पडतात. काही वेळा त्वचेबरोबरच सांधे आखडणे, नखांमध्ये बदल होणे अशी लक्षणे आढळून येतात. हा आजार होण्याची नेमकी कारणे अजून पूर्णपणे नेमकी माहीत झालेली नाहीत. काही रुग्णांमध्ये आनुवंशिकतेचा भाग आढळून येतो. 

रक्तदाब कमी करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या बीटा ब्लॉकर गोळ्यांमुळे काही वेळा हे चट्टे उद्‌भवतात. घशाला संसर्ग झाल्यानंतरही कधी कधी सोरायसिसची लक्षणे आढळतात. पण काही रुग्णांमध्ये यापैकी कोणतेही कारण सापडत नाही. या आजाराविषयी अनेक गैरसमज व मनात प्रचंड भीती असते. हे रुग्ण मानसिक तणावाखाली वावरत असतात. त्यांच्या या मानसिकतेचा काहीवेळा गैरफायदा घेतला जातो. विनाकारण वारेमाप पैसा खर्च करूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे, या आजाराची नेमकी शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे. हा आजार संसर्गजन्य नाही.

हस्तांदोलन केल्याने, कपडे एकत्र धुतल्याने अथवा अशा व्यक्तींबरोबर काम केल्याने हा आजार पसरत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना घर व समाजातील प्रत्येकाने आपल्यात सामावून घेऊन त्यांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. या आजाराचा कर्करोगाशी कोणताही संबंध नाही.

पोटात घेण्याची काही औषधे कर्करोगावरील उपचारपद्धतीत वापरली जातात. डॉक्टरांनी अशी औषधे दिली, तरी कर्करोग झाल्याची भीती बाळगण्याचे काही कारण नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dhanashri Bhide all is well sakal pune today