
आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
कुष्ठरोगाविषयी समाजात अनेक गैरसमज आढळतात. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर रुग्ण व नातेवाइकांच्या मनात भीती निर्माण होते. घरातही अशा रुग्णांना वेगळी वागणूक दिली जाते. याचा रुग्णाच्या मनावर खोलवर परिणाम होऊन अशा व्यक्तींचे दैनंदिन जीवन विस्कळित होऊ शकते. हा एका विशिष्ट प्रकारच्या जंतूमुळे होणारा, परंतु योग्य औषधोपचाराने पूर्ण बरा होणारा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला फिकट रंगाचा, दीर्घ मुदतीपर्यंत टिकणारा, न खाजवणारा चट्टा असल्यास अशा रुग्णांनी वेळ न घालवता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सहसा चेहऱ्यावरील चट्ट्यांना बधिरपणा येत नाही. त्यामुळे, अशा रुग्णांचे निदान लांबू शकते.
कुष्ठरोगाचा प्रत्येक चट्टा बधिर नसतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. खाज येणारे व काही काळानंतर पूर्णपणे नाहीसे होणारे चट्टे सहसा कुष्ठरोगाचे नसतात. या आजारात इतरही काही लक्षणे आढळतात. लालसर रंगाच्या चट्ट्यांबरोबर हातापायाला मुंग्या येणे, ते बधिर होणे, हाताची बोटे वाकडी होणे, डोळे मिटताना त्रास होणे, ताप येणे, अशी लक्षणे आढळल्यास कुष्ठरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार औषधोपचारांचा कालावधी बदलतो. ही औषधे न चुकता डॉक्टरांनी सांगितलेल्या मुदतीपर्यंत घ्यावीत. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ती विनामूल्य मिळतात. पहिला डोस गेल्यानंतर या आजाराचे ९९.९ टक्के जंतू नष्ट होतात. अशा रुग्णांमुळे इतरांना आजार होण्याची शक्यता कमी असते.
उपचाराआधी काही तपासण्या करून निदान पक्के केले जाते. हाता-पायाला बधिरपणा जाणवणाऱ्या रुग्णांनी स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्यावी. गरम वस्तू उचलताना, भाज्या कापताना जास्त काळजी घ्यावी. शेतात अथवा अनवाणी पायांनी काम करणाऱ्या व्यक्तींनी रोज रात्री आपल्या पायांची तपासणी करावी. जखमा अथवा पाण्याने भरलेले फोड आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशिष्ट प्रकारेच बूट निवडावेत. घट्ट व अधिक घर्षण होणारी पादत्राणे घालणे टाळावे. हाता-पायाची बोटे वाकडी झाल्यास फिजिओथेरपी घ्यावी. लाटणे, रबर बॉल बोटाने दाबणे असे व्यायाम घरच्या घरी करता येतात. काही वेळा एखादा बधिर चट्टा आल्यावर भीतीने रुग्ण वैद्यकीय सल्ला घेणे टाळतो. विनाकारण आजाराची तीव्रता वाढते. त्यामुळे न घाबरता लवकरात लवकर उपचार करणे हितावह ठरते.