उन्हाळा-पावसाळ्यात त्वचेची काळजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
पावसाळ्यात दमट वातावरणात कपडे ओलसर राहतात व शरीराच्या बंद भागात त्वचा पूर्णपणे कोरडी होत नाही. उन्हाळ्यातही जास्त घामामुळे दमटपणा राहतो. अशा वातावरणात त्वचेला पटकन जंतुसंसर्ग होतो.

बुरशीच्या वाढीस हे वातावरण पोषक असते, तसेच उन्हाळ्यातील गरमपणामुळे घाम येऊन त्वचेला खाज येणे आदी त्रास होऊ शकतो. 

उन्हाळ्यात आंघोळीसाठी कोमट अथवा थंड पाणी वापरावे. सैलसर व सुती कपडे परिधान करावेत. काखेत व जांघेत जास्त ओलसरपणा टिकून राहतो. या जागांवर साबण लावून त्वचा स्वच्छ करावी. या जागेचे केस रेझरच्या साह्याने काढून टाकावेत. त्वचा पूर्णपणे कोरडी झाल्यावरच कपडे परिधान करावेत. पावडरचा हलका थर पसरावा. अंत:वस्त्र दिवसांतून दोन वेळा तरी बदलावेत. उन्हाळ्यात शाळांना सुटी असते. ट्रेकिंग, पोहायला जाणे याचा आनंद बच्चेकंपनी घेत असतात. तीव्र उन्हात जास्त फिरल्याने सनबर्नचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे, फिकट रंगाचे सुती कपडे घालावेत. डोक्‍याला टोपी व चेहऱ्याला रूमाल बांधावा. वैद्यकीय सल्ल्याने सनक्रीमचा वापर हा सर्व ऋतूंत करावा.

पावसाळ्यात सूर्य दिसत नसला, तरी घातक अतिनील किरणे वातावरणात असतात. त्यामुळे ढगाळ हवेतही संरक्षक कपडे वापरणे गरजेचे आहे. सनक्रीम वापरताना हाताने पसरावे, चोळू नये. रोज दोन ते तीन तासांनी ते परत वापरावे. पोहायला जाताना पाण्यात टिकणाऱ्या सनक्रीम उपलब्ध आहेत. पोहून झाल्यावर स्वच्छ आंघोळ करावी व मॉइश्‍चराजर लागावे.

ओलसर कपडे जास्त काळ अंगावर ठेवू नयेत. पावसाळ्यात बूट व मोजे वापरणे टाळावे. बंद पादत्राणे वापरणाऱ्या व्यक्तींना चिखल्या होण्याचे प्रमाण जास्त असते. बोटांच्या फटींमध्ये पाणी साचून राहते. याबाबत योग्य काळजी घेतली पाहिजे. बोटात कापूस अथवा टिश्‍यूपेपरची घडी ठेवावी. मोजे रोज धुवावेत व बूट हवेशीर जागी वाळवावेत. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. या काळात कपड्यांचे जास्त जोड ठेवावेत. जाड कापड लवकर वाळत नसल्याने शक्‍यतो जीन्सच्या पॅंट वापरणे टाळावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dhanashri Bhide all is well sakal pune today