जर्मनीतील शिक्षणाचे फायदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक
अमेरिका आणि कॅनडाच्या पाठोपाठ जर्मनी हे शिक्षणाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत लोकप्रिय होऊ लागले आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था युरोपात पहिल्या क्रमांकावर असून, जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३. ६८ ट्रिलियन डॉलर असून ते जगाच्या अर्थव्यवस्थेच्या ४. ५५ टक्के आहे. जर्मनीची लोकसंख्या युरोपियन युनियनमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ८.३ कोटी आहे. जर्मनीत २०१८ मध्ये ३,७४,९५० परदेशी विद्यार्थी शिकत होते. त्यापैकी चिनी विद्यार्थी सर्वांत जास्त म्हणजे ३२,२६८, तर भारतीय विद्यार्थी १३,५३७ होते आणि या संख्येत दरवर्षी ५.५ ते ६ टक्के वाढ होत आहे. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी पसंत असलेल्या देशांमध्ये जर्मनी जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

जर्मनीत साधारणपणे ४०० उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत आणि त्यापैकी ११० अधिकृत विद्यापीठे आहेत आणि त्यातील बहुसंख्य विद्यापीठे उत्तम दर्जाची असून, काही विद्यापीठे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहेत. या विद्यापीठांमध्ये जवळजवळ १७,००० अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यातील बहुसंख्य पाठ्यक्रम जर्मन माध्यमातून शिकविले जात असले, तरीही इंग्रजी माध्यमातून शिकविल्या जाणाऱ्या कोर्सेसची संख्याही लक्षणीय आहे. विशेषतः गणित आणि शास्त्र, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, कायदा आणि समाजशास्त्रे याविषयांमधील कोर्सेस इंग्रजी माध्यमातून शिकविले जातात. आता जवळजवळ ३५०पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोर्सेस इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने जर्मनीत उच्चशिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. प्रामुख्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषतः मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी जर्मनीतील विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. 

ट्यूशन फी नाही -
ट्यूशन फी कमी किंवा अजिबात नाही- जर्मनीतील सर्व राज्यांमध्ये विनामूल्य शिक्षण दिले जाते. पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षणही जर्मन आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही विनामूल्य दिले जाते. यासाठीची तरतूद मुख्यतः राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात केली जाते आणि उरलेली थोडी रक्कम संशोधन प्रकल्पांना मिळणाऱ्या फंडिंगमधून वापरली जाते. काही विद्यापीठांत नाममात्र सेमिस्टर फी आकारली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व सार्वजनिक वाहतुकीची साधने कमी पैशांत वापरता येतात. काही खासगी विद्यापीठे किंवा काही इंग्लिश माध्यमातील कोर्सेससाठी फी आकारली जाते; परंतु ती इतर देशांच्या तुलनेत कमी असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dilip Oak edu supplement sakal pune today