
आरोग्यमंत्र - डॉ. आदित्य पाटील, मनोविकारतज्ज्ञ
समजा आपल्याला असे वाटू लागले, एखादा विचार आला अथवा डोळ्यांसमोर प्रतिमा आली की त्यातील घटना आता घडणारच किंवा एखादी अनावर इच्छा झाली आणि ती पूर्ण नाही केली तर माझ्यासोबत किंवा माझ्या जवळच्यांसोबत काहीतरी वाईट घडेल.
विचार, प्रतिमा, इच्छा म्हणजेच घडणारी कृती यामध्ये अंतरच नाही राहिले तर? मंत्रचळ (ओसीडी) झालेल्या लोकांमध्ये नेमके हेच होते. ओसीडीचे दोन भाग असतात. ‘ऑब्सेशन’ आणि ‘कंपल्शन’. ऑब्सेशन म्हणजे वारंवार आणि सतत येणारे अवास्तव विचार, प्रतिमा किंवा अनावर इच्छा ज्या अनाहूतपणे येतात आणि खूप अप्रिय
असतात. दिवसभरात कधीही, कुठेही आणि काहीही करत असताना अचानक ऑब्सेशन्स सुरू होतात. अस्वच्छता, खंत, आत्महत्या, हत्या, सममिती (symmetry), क्रमवारी, स्वतःच्या किंवा नातेवाइकांच्या आरोग्यविषयक, लैंगिक व इतर माहिती जमवण्याविषयी, आकडेवारी संबंधात आणि अगदी कशाविषयीही ऑब्सेशन असू शकतात. व्यक्तीला या विचारातील फोलपणा लक्षात येतो. पण काही केल्या हे विचार थांबतच नाहीत. याचा रुग्णाला प्रचंड त्रास होतो. हे ऑब्सेशन्स काही करून थांबावे किंवा त्यापासून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी ती व्यक्ती एखादी शारीरिक किंवा मानसिक कृती करते. त्या कृतीला म्हणतात ‘कंपल्शन’. ते सुद्धा बऱ्याच प्रकारांचे असतात. वारंवार स्वच्छता करणे, हात धुणे, गोष्टी तपासत राहणे, गोष्टी क्रमाने ठेवत राहणे, मनामध्ये आकडे मोजणे किंवा बेरजा करणे, विचारांना पर्यायी विचारांनी किंवा प्रतिमांनी बदलत राहणे, एखादी घडलेली कृती उलट करण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या विशिष्ट पद्धतीने चालणे, बोलणे, गोष्टींचा साठा करणे ही काही उदाहरणे आहेत.
कंपल्शननंतर काही वेळासाठी त्रास कमी होतो खरा. पण काही वेळातच परत ऑब्सेशन सुरू होतात आणि हे चक्र सुरूच राहतं. ओसीडीचे रुग्ण बरेच दिवस या त्रासाशी एकटेच लढत असतात. शक्य होईल तितकं कुणालाही आपल्या या विचित्र आजाराविषयी समजू नये यासाठी प्रयत्न करत असतात. लोक काय म्हणतील, आपला स्वीकार करतील का, या भयगंडाने पछाडलेले असतात.
अपराधीपणे जीवन जगत असतात. हा विकार खूप चिवट असतो; पण योग्य उपचारानंतर पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. सीबीटी नावाचा मानसोपचार यासाठी वापरला जातो. खूप दिवस अतिशय संयमाने सीबीटी सुरू ठेवावी लागते. ऑब्सेशनला स्वतःच्या परीनं विरोध सुरू ठेवावा लागतो आणि दिवसेंदिवस तो वाढवावा लागतो.
यासोबतच औषधंसुद्धा सुरू करणं आवश्यक असतं. साधारणतः दोन ते तीन वर्षे औषधोपचार सुरू ठेवावा लागतो. नातेवाइकांनी हा विकार आणि त्याचं गांभीर्य ओळखून रुग्णाला आस्थेनं वागणूक देणं जरुरी असतं. सर्व प्रयत्न केल्यास आणि निकराने या विकाराचा सामना केल्यास ओसीडी पूर्णपणे बरा होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.