मनोविकारांशी लढताना...

Dr-Aditya-Patil
Dr-Aditya-Patil

आरोग्यमंत्र - डॉ. आदित्य पाटील, मनोविकारतज्ज्ञ
हा आजार कुणाला नको व्हायला. बाकीचं काही झालं तर सांगू तर शकतो. हा आजार म्हणजे तोंड दाबून मुक्यांचा मार. सगळ्यांना त्रास होतो ना हो डॉक्टर. सगळ्या घरादाराची ओढाताण चाललीय. कसं होणार हो सगळं. मनोविकारग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांसोबतचे हे नेहमीचे संभाषण. समाजाचा मनोविकारांप्रती असणारा कलंकित दृष्टिकोन रुग्ण आणि नातेवाईक दोघांनाही मदतीपासून वंचित ठेवतो. इतर आजारांसारखे मानसिक समस्यादेखील आजारच आहेत आणि ते मेंदूमधल्या रासायनिक असमतोलामुळे उद्‍भवतात. बाहेरचं झालंय, अंगात आलंय, भूतबाधा, करणी, साधू, बाबा यांच्या चकरा यामुळे मानसिक आजार बळावतात. तातल्यात्यात तीव्र मानसिक आजार असेल तर रुग्णाला त्या आजाराचे काहीच भान नसते.

अशा वेळी नातेवाइकांनी पुढाकार घेणं आवश्यक असतं. रुग्णाला मनोविकारतज्ज्ञाकडे घेऊन जाणं, वेळच्या वेळी औषधं देणं जरुरी असतं. रुग्णाला आस्थेने आणि समानतेची वागणूक द्यावी. भविष्याचा आराखडा तयार करण्यात मदत करण, वेळोवेळी आर्थिक किंवा मानसिक आधार देणं आशा जबाबदाऱ्‍याही उचलाव्या लागतात. या सर्वांमध्ये सगळ्यात दुर्लक्षित कोण असतो, तो म्हणजे नातेवाईक.

बऱ्‍याच वेळा, विशेषतः पालकांमध्ये असा ग्रह असतो की माझ्याशिवाय अजून कोणी यांची उत्तम काळजी घेऊच नाही शकत. त्यामुळे रुग्णाचा सांभाळ करणे हे त्यांच्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट बनून जाते. स्वतःची सर्व स्वप्नं, गरजा मागे टकल्या जातात. रुग्णाला सांभाळताना होणारी दमछाक काही वर्षांनंतर नातेवाइकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू लागते. सततच्या ताणाखाली राहून काही वर्षांनंतर नातेवाइकांमध्ये चिंता, नैराश्य यांसारख्या विकारांची सुरुवात होते.

शारीरिक समस्याही उद्‍भवतात. आता माझ्यानंतर रुग्णाचं भविष्य काय? हे माझ्यासोबतच का झालं? असे प्रश्‍न सतत डोक्यात घिरट्या घालत असतात. त्याला आमच्या भाषेत बर्नआऊट असं म्हणतात. रुग्णाचा त्याच्या विकारासोबत विनाअट स्वीकार करणं या तणावावर मात करण्याचं पाहिलं पाऊल. मनोविकारांविरुद्धची ही लढाई मॅरेथॉन स्पर्धा असते. त्यामुळे शक्ती पुरवून वापरावी लागते. काही वेळ स्वतः साठी ठेवणं, स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणं, स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणं आवश्‍यक असतं. घरातील सर्व सदस्यांनी जबाबदारीचं वाटप करणं उपयुक्त ठरत. स्वतःची बॅटरी सतत रिचार्ज करत राहणं महत्त्वाचं असतं. मी रुग्णाकडे दुर्लक्ष करणार नाही, पण त्याबरोबरच माझं स्वतःचं आयुष्यही तितकंच महत्त्वाचं आहे हे ध्यानात ठेवावं लागतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com