स्तनाच्या कर्करोगाची उपचारपद्धती (डॉ. भारती ढोरे-पाटील)

डॉ. भारती ढोरे-पाटील
गुरुवार, 7 मार्च 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत.

वुमन हेल्थ
मागील भागात आपण स्तनाच्या कर्करोगाबाबत माहिती घेतली. स्तनांच्या कर्करोगाची उपचारपद्धती त्याच्या प्रकारावर आणि अवस्थेवर ठरवली जाते. सर्जरीद्वारे स्तनातील गाठ काढून टाकणे अथवा ॲडव्हान्स स्टेज असेल तर स्तन पूर्णपणे काढून टाकणे. याबरोबर केमोथेरपी, किरणोस्तर्ग, हॉर्मोनथेरपी, इम्म्युनोथेरपी आदी उपचार पद्धती आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारे या कर्करोगावर आपल्याला मात करता येते. फक्त हवा तो निर्धार लढण्याचा, खचून न जाण्याचा. याचे कारण म्हणजे विज्ञानातील विलक्षण संशोधन आणि त्याद्वारे झालेली प्रगती. अलीकडे कॅन्सरथेरपी नंतरचे जीवनमान खूपच सुधारले आहे. अनेक संघटना यासाठी कार्यरत आहेत त्यांचा रुग्णांनी फायदा घ्यावा. तरुण वयातील कॅन्सर सर्व्हायव्हल रुग्णांची संख्या अलीकडे खूप वाढलेली आहे. याला कारण लवकर निदान व योग्य वेळी प्रगतिशील उपचार त्यामुळे या रुग्णाचा प्रवास कॅन्सर स्पेशिअलिस्टकडून पुन्हा स्त्रीरोगतज्ज्ञाकडे येतो. 

काही आव्हाने :
  लवकर मेनोपॉज.
  सेक्‍समधील तणाव. 
  फर्टिलिटीमधील अडथळे. 
  मासिक पाळीच्या तक्रारी. 
  मानसिक तणाव 

कर्करोग निदानानंतर प्रत्येक तरुण स्त्रीने गडबडून, गोंधळून आणि नाउमेद न होता पुढील फर्टिलिटीचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. स्त्रीबीजाची साठवण करून ठेवणे व त्यासाठी योग्य फर्टिलिटी स्पेशालिस्टकडून सल्ला घेतला पाहिजे. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी उपचारापूर्वी संबंधित रुग्णाला मुलं होण्याची शक्‍यता असते याची कल्पना देणे योग्य ठरते. त्याचप्रमाणे कॅन्सर थेरपीनंतर रुग्णाला योग्य पद्धतीने साह्य देणे गरजेचे आहे. कॅन्सर थेरपीनंतर योनीमार्गातील कोरडेपणा आता लेझरद्वारे विना औषधे बरा करता येतो, त्या उपचाराविषयी रुग्णाला माहिती दिली पाहिजे. रुग्णाच्या मनातील भीती समूळ नष्ट करून सामान्य जीवन जगण्याचा सल्ला समुपदेशनाद्वारे होणे आवश्‍यक आहे. माझ्या हॉस्पिटलमधील एका स्टाफने लिहिलेली कविता खूप काही सांगून जाते.

हवे फूल, मग मान्य करा काटा 
एकदा का ठरली दिशा, मग आपसूक गवसतील वाटा 
हा प्रवास खरंच खडतर 
त्यामुळे नसेल कोणताच जर-तर 
अशक्‍यतेलाही असते शक्‍यतेची आस 
हे समजताच जन्माला येतो ध्यास 
अपयश या शब्दातच ज्यांना यश दिसले 
बस एक निर्धार, अन सारे पाश तुटले 
एक आयुष्य, एक निर्धार 
न वाचता गीता, कळले सारे सार!

Web Title: Article By Dr. Bharati Dhore-patil In Maitrin Supplement Of Sakal Pune Today