स्तनाचा कर्करोग : पुढील वाटचाल  (डॉ. भारती ढोरे-पाटील)

स्तनाचा कर्करोग : पुढील वाटचाल  (डॉ. भारती ढोरे-पाटील)

वुमन हेल्थ
सीमा, माझी पेशंट अगदी पहिल्या बाळंतपणापासून माझ्याकडे येणारी, अलीकडे अगदी उत्साहाने मुलीच्या डिलिव्हरीला येऊन गेलेली. मात्र, आज वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली माझ्यासमोर आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता माझ्या काळजात चर्रर्र झाले... काहीशी भांबावलेली, धास्तावलेली. ती म्हणाली, ‘‘मॅडम, गेले काही दिवस माझ्या एका बाजूच्या स्तनात गाठ जाणवते आहे, दुखत वगैरे काही नाही. पण गाठ मात्र नक्की आहे. काय करायचे पुढे?’’ तिच्यासारख्या अशा अनेक स्त्रियांसाठी सोप्या भाषेत सखोल माहिती देण्याचा माझा एक प्रयत्न. 

सीमाच्या वयानुसार आलेली अचानक आणि वेदनारहित गाठ असल्याने तिला ताबडतोब कोअर बायोप्सीचा सल्ला दिला. मला शंका आणि भीती होती, तेच निदान समोर आले आणि तिची पुढील वाटचाल सुरू झाली. जवळजवळ एका वर्षाच्या कालावधीनंतर ती आता पूर्णपणे बरी झाली असून, पूर्ववत जीवनाच्या वळणावर आहे. स्तनाचा कर्करोग हा प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या स्वरूपात उद्‌भवतो, तो कधी एकाच टिपिकल साच्याप्रमाणे नसतो. स्तनाचा कर्करोग मुखत्वे त्याच्या जागेवरून, म्हणजे कोणत्या स्तनाच्या जागेवरून त्याची सुरवात होते त्यावरून संबोधला जातो. त्याचा संसर्ग कोठपर्यंत पोचला, याच्या टप्प्यावरूनही विभागाला जातो. 

स्तनाच्या कर्करोगाचे जागेसंदर्भातून प्रकार ः 
डक्‍टल ब्रेस्ट कर्करोग : स्तनांमधील वाहिनीचा म्हणजेच, जिच्यामधून दूध वाहते त्या जागेचा कॅन्सर. 

लोब्यूलर ब्रेस्ट कर्करोग : स्तनाच्या वाहिनीभोवती असणारे घड. म्हणजे ज्याच्यामध्ये दूध तयार होते त्याला लोब्यूल असे म्हणतात. 

पॅजेट डिसीज : स्तनावरील बोण्डसच्या कर्करोगाला ‘पॅजेट डिसीज’ असे संबोधले जाते. स्तनातून स्राव येणे अथवा तिथे वारंवार खाज सुटून रक्त येणे, अशी लक्षणे यात आढळतात. 

घड आणि वाहिनी यांना जोडणारा टिशू म्हणजे स्ट्रोमा अथवा कनेक्‍टिव्ह टिशू याचा कॅन्सर ः त्याला ‘फायलोइड ट्यूमर’ असे संबोधले जाते. हा कर्करोग शक्‍यतो मासिक पाळी जाण्याच्या वेळी होतो. परंतु हा ट्यूमर कर्करोगजन्य असतोच, असे नाही. 

स्तनाच्या कातडीचा कर्करोग : हा कर्करोग खूप लवकर लक्षात येतो, कारण तो वरील थरामध्ये आढळतो. मात्र, यामध्ये गाठ जाणवत नाही.  

हे विभाजन कर्करोगाच्या उपचारपद्धतीसाठी खूपच गरजेचे असते. हा कर्करोग शरीरामध्ये पसरू लागल्यावर त्याचा संदर्भ लक्षात घेऊन पुढील उपचाराची दिशा ठरते. त्याचे तीन प्रकार आहेत.

 कॅन्सर इन सीतू       इन्व्हेझिव्ह कॅन्सर       मेटास्टॅटिक कॅन्सर 
काही कर्करोगाच्या पेशी जागेवरच असतात त्याला ‘कॅन्सर इन सीतू’ म्हणतात. काही कर्करोग त्या पेशींच्या जवळील विभागांत प्रवेश करतात, तेव्हा त्याला ‘इन्व्हेझिव्ह कॅन्सर’ म्हणतात. तर काही कर्करोगाच्या पेशी स्तन सोडून दुसऱ्या अवयवात पसरू लागतात त्याला मेटास्टॅटिक कॅन्सर संबोधले जाते. ‘कॅन्सर इन सीतू’ हा गाठी काढण्यापर्यंत मर्यादित राहू शकतो. तसेच ‘ॲडव्हान्स स्टेज’ची उपचारपद्धती शस्त्रक्रियेबरोबर केमोथेरपी आणि किरणोत्सर्ग यांचा वापर करून पूर्ण केली जाते. अलीकडील विविध नवीन संशोधनांमुळे स्तनाचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो व स्त्रियांना पूर्ववत आयुष्य जगता येते. मात्र ‘ॲडव्हान्स स्टेज’मध्ये याचे गांभीर्य रुग्णाच्या वयानुसार ठरू शकते. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार ही यशाची गुरुकिल्ली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com