संधिवात कसा नियंत्रित कराल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arthritis

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

संधिवात कसा नियंत्रित कराल?

आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
सांध्यामध्ये वेदना होणे, सूज येणे, सांधे जखडणे अशा प्रकारच्या लक्षणांना बोलीभाषेत संधिवात म्हटले जाते. वैद्यकीय शास्त्रात सूक्ष्म पद्धतीने यावर विचार व संशोधन सुरू असून केवळ अशा प्रकारची लक्षणे असलेले किमान सहाशेहून अधिक प्रकार आढळतात. त्याची विविध कारणे, तपासणी व उपचारांमध्येही वैविध्य आहे. 

सामान्यपणे आढळणारा प्रकार म्हणजे वयोमानाप्रमाणे सांध्याच्या हाडांमधील आवरणांमध्ये होणारी झीज याला इंग्रजीमध्ये ‘ऑस्टिओअथ्रायटीस’ असे म्हटले जाते. मुख्यतः गुडघ्याचा सांधा, खुब्याचा व काही प्रमाणात खांदा, कोपराच्या सांध्यामध्ये याची बाधा आढळते. सर्वाधिक व अत्यंत अधिक प्रमाण गुडघ्यांच्या सांध्यात आढळते. 

गुडघ्याच्या सांध्यामध्ये मांडीचे हाड व नडगीच्या हाडांमधील वेष्टित कुर्चेचे आवरण नष्ट होऊन हाडे एकमेकांस घासतात. त्यास ‘नी ऑस्टिओअथ्रायटीस’ असे म्हणतात. ही खराब झालेली कुची परत कोणत्याही गोळ्या, औषधे, इंजेक्‍शन यांनी तयार होत नाही. त्यामुळे बहुतांशी चौथ्या टप्प्यात अर्थात अखेरच्या टप्प्यातली झीज असते. त्या वेळी शस्त्रक्रियेचे उपाय सांगितले जातात. मुळात ‘ऑस्टिओअथ्रायटीस’ हा टाळता येण्यासारखा आजार आहे. सुरवातीच्या काळात योग्य काळजी, औषधोपचार व अचूक मार्गदर्शन घेतले तर या आजारावर नियंत्रण ठेवता येते. 

बऱ्याच वेळा अशा प्रसंगी वेदनाशामक औषधे दिली जातात. पण, दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये यामुळे विपरीत परिणाम होतात. काही लोक औषधोपचारामध्ये अशी औषधे वापरण्यासाठी बंधने येतात. स्टिॉरॉईडचाही वापर करतात. पण, दीर्घकालीन त्याचेही विपरीत परिणाम आढळतात.

औषधे, भौतिक उपचारामुळे वेदना थांबत नाहीत व पुरेसा आराम होत नाही अशावेळी शस्त्रक्रिया हाच उपाय असतो. ज्यांना शस्त्रक्रिया करणे योग्य नसते त्यासाठी संशोधक अनेकविध पद्धतीने अत्याधुनिक प्रकारे उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

गुडघ्याच्या सांध्यामधील वंगण हे साठवून ठेवण्याची उपचार पद्धतीस ‘व्हिसको सप्लिमेंट’ म्हणतात. ज्यामुळे सांध्यातील घर्षण कमी होऊन वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी वंगणयुक्त द्रव्याची इंजेक्‍शनस्‌ सांध्यात दिली जातात. काही संशोधकांनी ‘प्लेटलेट रिच प्लाझमा’ इंजेक्‍शनचा वापर करून सांध्यातल्या खराब भागातील जखमा भरून येण्याच्या प्रक्रियेस मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यतः धावपटूमध्ये अशा प्रकारच्या सांध्यावर येणाऱ्या ताणांमुळे होणारा बदलांसाठी प्रयोग केला जात असून अजून तो संशोधन प्रक्रियेत आहेत. 

खराब झालेली कुर्चा परत निर्माण व्हावी यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून शरीराच्या हाडातील अंर्तमज्जा अर्थात बोनमॅरो अशा प्रकारच्या पेशी निर्माण करतात. अशा पेशींची वाढ करून नवीन ऊती/कुर्चा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा पेशी गोळा करून गुडघ्यांच्या सांध्यामध्ये इंजेक्‍शन देऊन आतील सूज कमी करून कुर्चाची झीज भरून काढण्याचे प्रयत्न होत आहेत. या प्रयोगाद्वारे संशोधकांना अधिक जास्त आशा आहेत. 

हाडांमधील आतील अंर्तमज्जाच म्हणजेच बोन मॅरो अस्परेट कॉन्सेन्ट्रेट गुडघ्याच्या सांध्यात इंजेक्‍ट करून जखम भरून येण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

त्याचबरोबर आपल्याच सांध्याच्या कुर्चेच्या पेशी साठवून त्याची वाढ प्रयोगशाळेत करून त्या पेशी इंजेक्‍ट करण्याचे संशोधनही प्रयोगावस्थेत आहे. 

बोटॉक्‍स इंजेक्‍शन देऊन गुडघ्याच्या वेदना नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने संशोधकांचे प्रयत्न करत आहेत. 

व्यायामाबरोबरच सकस आहार व संशोधकांनी शोधून काढलेल्या विविध पद्धतीने ऑस्टिओपोरोसिस नक्की नियंत्रित राहील. परंतु हे सर्व संशोधन प्रयोगावस्थेत असून त्याची संपूर्ण सिद्धता, यशस्विता सिद्ध झाली नाही.

loading image
go to top