मानदुखी : लक्षणे व उपचार

Neck-Pains
Neck-Pains

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
पाठदुखीबरोबरच अत्यंत सामान्यपणे आढळणारा त्रास म्हणजे मानेचे दुखणे. दर तीन लोकांमध्ये एका व्यक्तीला मानेच्या दुखण्याचा त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचवेळा मानदुखी तात्पुरत्या औषधोपचाराने थांबते. पण, काही वेळा कालांतराने हा त्रास पुनश्‍च उद्‌भवू शकतो. त्यानुसार मानदुखीचे दोन प्रकार आहेत. 

तात्पुरत्या स्वरूपात मानेमध्ये दुखणे (ॲक्‍युट नेक पेन) - कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर दीर्घकाळ काम करत असल्यास झोपेतील स्थितीमुळे, खेळताना, थंडीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून काही वेळा मानेमध्ये वेदना होणे, स्नायू आखडल्याप्रमाणे वाटणे अशा स्वरूपाच्या लक्षणांची मानदुखी असते. 
साधारणतः एक ते दोन आठवड्यांच्या औषधोपचाराने ही मानदुखी थांबते. 

दीर्घकालीन मानदुखी (क्रॉनिक नेक पेन) - मानेमधील दुखणे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ असेल तर त्याला क्रॉनिक नेक पेन असे म्हणतात. मानसिक ताणतणाव, कामामुळे अथवा काही वेळा खेळताना अशा स्वरूपाच्या वेदना पुनश्‍च सुरू होतात. बऱ्याच वेळा यासाठी काही काळजी करण्याचे कारण नसते. योग्य शास्त्रीय व्यायाम व आपले काम सुरू ठेवल्यास ही मानदुखी कमी होते. पण, काही वेळा काही लक्षणे तशीच असतात, की त्यामुळे संभाव्य धोके हे अधिक घातक परिणाम करू शकतात, त्याविषयी पाहू... 

 ॲक्‍झियल पेन : मुख्यतः मानेच्या मणक्‍यांच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना या मानेच्या मागील बाजूस व खांद्यापर्यंत पसरतात. 

 रॅडिक्‍युलर पेन : यामध्ये मानेच्या मणक्‍यांच्या मध्ये असणारा चकतीसारखा गादीचा भाग हा मानेच्या मणक्‍यामधून जाणाऱ्या मज्जारंज्जूवरील शिरांवर पडतो. त्यामुळे मुख्यतः हातांमध्ये वेदना पसरणे, यामध्ये काही वेळा हातांच्या स्नायूमध्ये ताकद कमी होणे, कार्यक्षमता कमी होणे, मुंग्या येणे (टाचणी/पिन टोचल्यासारख्या संवेदना) यांसारखी लक्षणे जाणवतात. मानदुखी हे लक्षण सामान्य असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. मुख्यतः वरीलप्रमाणे अथवा पुढील लक्षणे असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

 अपघातानंतर मानेमध्ये वेदना होणे.  मान जखडणे.   मलमूत्रांवरील विसर्जन प्रक्रियेचे नियंत्रण कमी होणे.  मानदुखीबरोबरच डोके दुखणे, मळमळ, उलटी होणे, अंधारी येणे, उजेड नकोसा वाटणे.  आरामाच्या वेळीही मानेमध्ये सतत वेदना होणे.   ताप, थंडीबरोबरच वजन कमी होणे.  

हातांमधील पायांमधील स्नायूंची ताकद कमी होणे, मुंग्या येणे, हातांची बोटे जड वाटणे, हात उलटताना त्रास होणे, वस्तू न पकडता येणे. 

डॉक्‍टर परीक्षण करून स्नायूंची ताकद, स्थिती यांचा अंदाज घेऊन क्ष-किरण तपासणी (एक्‍स-रे), सी.टी, स्कॅन अथवा एमआरआय तपासणीद्वारे निदान करतात. बहुतांश वेळा मानेच्या स्नायूवर येणारा अतिरिक्त ताण, मानेच्या मणक्‍यांच्या चकतीचा दाब, मानेच्या मणक्‍यांच्या ठिकाणी हाडांमध्ये झालेली अतिरिक्त वृद्धी, मानेच्या मणक्‍यामधील हाडांची झीज (ऑस्टिओअथ्रायटीस), त्यामुळे होणारे बदल (सर्व्हाकल स्पॉन्डिओलायसिस) अथवा अपघातांमध्ये मानेच्या अंतर्गत रचनांमध्ये झालेली इजा (विप्लाश इन्ज्युरी), मानेच्या मणक्‍याचे छिद्र बारीक होणे व मणक्‍याच्या चकतीचा दाब पडणे, या विकृती आढळून येतात. रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे व निदान तपासणीचे अहवाल, रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन उपचार केले जातात. फिजिओथेरपी, औषधोपचार, मानेखाली घ्यावयाची उशी यांसारख्या किरकोळ उपचारांनी बहुतांश वेळा आराम मिळतो. काही वेळा ट्रॅक्‍शन देणे, थंड अथवा गरम पिशवीने शेक देणे, बायोफिडबॅक, स्प्रे मारणे, मल्टिमोड्यूल ट्रिटमेंट, आयएफटी, मॅट्रीक्‍स थेरपी यांसारखे उपचार करतात. काही रुग्णांमध्ये मात्र दुर्बिणीद्वारे मानेच्या मणक्‍यामधील चकतीचा नाडीवरील दाब काढून मणके जोडले जातात. सद्यःस्थितीत मणक्‍यांच्यामध्ये असलेला चकती काढून कृत्रिम चकतीचे रोपणासारखी अत्याधुनिक शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रिया योग्य वेळी झाल्यास संभाव्य धोके टळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com