शरीररचना व खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये मिळवलेले यश पाहून अनेकांना आपण क्रिकेटमध्ये करिअर करावे असे वाटते. पी. सिंधूच्या यशाने अनेक जण बॅडमिंटनच्या कोर्टवर जाऊ लागले आहेत. रॉजर फेडरर, राफेल नदाल या खेळाडूंनी लॉन टेनिसची लोकप्रियता वाढवली. परंतु प्रत्येकजण त्याची इच्छा असलेला खेळ खेळू शकेल का, यामध्ये आपली शरीररचना त्या खेळातील प्रावीण्य मिळवण्यासाठी पूरक आहे का, याचा विचार होणेही गरजेचे आहे, कारण निसर्गाने प्रत्येकाला काही शारीरिक मर्यादा, तसेच काही उपयुक्तताही दिल्या आहेत. आपण आजच्या लेखात खेळाडूंनी खेळाची निवड करताना काय करायला हवे, याचा स्पोटर्स मेडिसीनच्या दृष्टीने ऊहापोह करणार आहोत. आपल्या शरीराचे रचनेच्यादृष्टीने मुख्यतः तीन प्रकार पडतात. इंग्रजीमध्ये यास इन्डोमॉर्फ, मिसोमॉर्फ आणि इक्‍टोमॉर्फ असे म्हणतात. 

१. इन्डोमॉर्फ : यामध्ये पेअरच्या फळाच्या आकाराप्रमाणे शरीराचा आकार असतो. यामध्ये शरीरातील वरील बाजूला म्हणजे धड, हाताचा भाग व मांडीवर काही प्रमाणात चरबीही दिसून येते. त्यामुळे हे खेळाडू धष्टपुष्ट, जाडजूड अशा प्रकारचे असतात. तुलनेने थोड्या कमी उंचीचे असतात. वेटलिफ्टिंग, रग्बी यांसारख्या खेळांसाठी ही शरीररचना पूरक ठरते.

२. मिसोमॉर्फ : यामध्ये V या इंग्रजी अक्षराप्रमाणे शरीराची रचना असते. सुताराकडे असलेली पाचर म्हणजे एका बाजूला जाड व हळूहळू निमुळता असणारा भाग यासारखी रचना असते. शरीराचा ऊर्ध्वभाग रुंद व कंबरेकडील खुब्याचा भाग अरुंद अशी रचना यामध्ये आढळते. शरीरावर अगदी तिळमात्रसुद्धा चरबी अशा स्वरूपाच्या शरीररचनेत आढळून येत नाही. अतिशय चपळ अशा स्वरूपाची, आत्यंतिक श्रमासह सक्षम अशा प्रकारच्या हृदयाची कार्यक्षमता असलेली व ताण सहन करणारी ही शरीररचना असते. त्याचबरोबर खेळाच्या गरजेनुसार ते सहजपणे वजन कमी अथवा जास्त करू शकतात. अनेक चित्रपटांतील अभिनेतेदेखील मिसोमॉर्फ शरीररचना असल्याने भूमिकांनुसार वजन कमी-जास्त करू शकतात, ती नैसर्गिक देणगी असते. 

३. इक्‍टोमॉर्फ : ही अत्यंत कृश अथवा सडपातळ बांध्याची शरीररचना असते. काटक व सहनक्षमता असलेले हे बॉडी फॉर्म असतात. मुख्यतः मॅरेथॉन, लांब पळण्याच्या स्पर्धा असणाऱ्या खेळाडूंमध्ये ही शरीररचना पूरक असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr narendra vaidya all is well sakal pune today