आव्हानात्मक व खडतर अवकाश सफर

Space-Effect
Space-Effect

मानवी अवकाश मोहिमांच्या इतिहासात प्रथमच ख्रिस्तिना कोच नावाच्या ४१ वर्षांच्या एका अमेरिकन महिला अंतराळवीराने तब्बल ३२८ दिवस अंतराळात वास्तव्य करण्याचा विक्रम केला. 

अवकाश युगाचा प्रारंभ होऊन साठ वर्षे लोटली आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ पावणेसहाशे अकवाशवीरांनी भरारी घेतली. मात्र, अंतराळ सफर नक्कीच सुखावह व आरामदायक नसते. अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षण, धोकादायक प्रारणे, जीवघेणे तापमान व अनपेक्षित छोट्या-मोठ्या दगडधोंड्यांचे धोके या सर्वांना अवकाशवीरांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या मानवी अवकाश मोहिमा दहा-पंधरा दिवसांच्या होत्या.

आता मात्र चंद्र व त्यापलीकडील मंगळ व इतर ग्रहगोलांकडे जायचे म्हटल्यास काही वर्षांची अवकाश सफर करावी लागेल. यासाठी पूर्वतयारी म्हणून अवकाशात मानवी शरीर कशी साथ देईल किंवा इतक्‍या दूरच्या प्रवासात नक्की कुठले धोके दडले आहेत, हे जाणून घेण्याची धडपड शास्त्रज्ञ करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून वीस वर्षांपूर्वी अमेरिका, रशिया, युरोपियन राष्ट्रांसारख्या १६ देशांनी मिळून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक बांधले. या स्थानकात एका वेळी जास्तीत जास्त पाच-सहा अंतराळ प्रवासी वास्तव्यात असतात व ते अनेकविध प्रयोग करून अतिशय कमी गुरुत्वाकर्षणात मानवी शरीर कसे तग धरू शकते, याचा अभ्यास करीत आहेत. 

मानवी शरीरावर परिणाम
अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचे मानवी शरीरावर अनेक परिणाम होताना दिसतात. स्थानकात पृथ्वीप्रमाणे चालता येत नसून तरंगत हिंडावे लागते. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे पृथ्वीवर सोपी वाटणारी कामे अवघड वाटू लागतात. हाडातील कॅल्शियम विरघळून जाणे, स्नायू शिथिल होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, हृदय व रक्ताभिसरण मंदावणे, दिशांचा गोंधळ उडणे, यासारख्या समस्यांना अवकाशयात्रींना सामोरे जावे लागते. या ‘स्पेस सिकनेस’ला तोंड देत अवकाशयात्री विविध प्रकारचे जैवरासायनिक, भौतिक, औषध व शरीरशास्त्रावरचे प्रयोग करीत असतात. ख्रिस्तिनाने गेल्या ११ महिन्यांत २१० प्रयोगांत भाग घेतला. कमी गुरुत्वाकर्षणात हाडे व स्नायू कसे निकामी होऊ लागतात, कर्क व मूत्रपिंडाच्या रोगासंबंधीचे काही प्रयोग केले.

पुढील मोहिमांसाठी प्रयोग महत्त्वाचे
महिलांच्या व विशेषतः ख्रिस्तिनाच्या शरीरावर दीर्घकाळच्या अंतराळ वास्तव्यामुळे कुठले परिणाम झाले, याचादेखील अभ्यास केला जात आहे. लवकरच अमेरिका चांद्र मोहीम राबवत असून, त्यात महिलांचा समावेश असणार आहे. यापुढील काळात ख्रिस्तिनाच्या अंतराळ वास्तव्यापेक्षा जास्त काळ महिलांना अंतराळात ठेवले जाईल व त्या अनुभवाच्या जोरावर दूरदूरच्या ग्रहगोलांकडे स्त्री-पुरुषांना जाता येईल. यामुळे ख्रिस्तिना कोचचे घरदार सोडून नव्हे, तर पृथ्वी सोडून दूरवरच्या धोकादायक अंतराळातील दीर्घकाळ वास्तव्य नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com