मधुमेहींसाठी स्नायूंचा आकार वाढविण्याचा व्यायाम (डॉ. राजीव शारंगपाणी)

मधुमेहींसाठी स्नायूंचा आकार वाढविण्याचा व्यायाम (डॉ. राजीव शारंगपाणी)

हेल्थ वर्क
स्नायूंची ताकद वाढविण्याचा वजन उचलण्यासारखा व्यायाम केला जातो. आपल्या शरीरात इन्शुलिनसारखा एखादा पदार्थ स्नायूंमधून स्रवत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. साहजिकच आपल्या शरीरात स्नायूंचे प्रमाण आणि स्नायू वापरण्याची क्षमता अधिक असल्यास हा इन्शुलिनसारखा पदार्थही अधिक प्रमाणात स्रवतो. या पदार्थामुळे रक्तातील साखर पेशींमध्ये प्रवेश करू शकते. तिचा विनियोगही व्यवस्थित होतो. आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी असणे हे नेहमी हितावह असते आणि मधुमेही रुग्णांच्या बाबतीत जास्तच. चरबी ही निसर्गाची किमया आहे. आपण गाय-म्हशींसारखे पाळीव प्राणी पाहिल्यास ही चरबी कशी कमी जास्त होते. ते लक्षात येईल. साधारणतः जूनदरम्यान सर्व गुरांची हाडे दिसू लागतात, कारण मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये गवत अजिबात नसते. त्यांचा आहार कमी असतो. त्यामुळे, प्राण्यांचे शरीर चरबी वापरायला लागते. परिणामतः हाडे दिसू लागतात. पाऊस पडला की भरपूर गवत उगवते. आहार वाढल्याने प्राण्यांची चरबीही वाढते व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गुरांची हाडे दिसत नाहीत. कारण, शरीर पुढे वापरण्यासाठी चरबीचा साठा करून ठेवत असते!

खाद्यसंस्कृतीमुळे अन्न सदासर्वकाळ सर्वत्र उपलब्ध झाले आणि लठ्ठपणा ही विकृती आली! उपासमार टळली, पण अनावश्‍यक वजन वाढू लागले. ही विकृतीची लक्षणे असणारी चरबी शरीरात भलतीकडेच प्रवेश करू लागली व शरीराची धुळधाण व्हायला सुरवात झाली. चरबीचा वापरच होईनासा झाला. चरबी फक्त फक्त जमा होऊ लागली तिचा खर्चच नाही!

पुरुषांच्या शरीरात १२ ते १४ टक्के चरबी आणि स्त्रियांच्या शरीरात १५ ते १८ टक्के चरबी योग्य असते. पुरुषांच्या शरीरात चरबी जास्त झाली की ते स्त्रियांसारखे दिसू लागतात आणि स्त्रियांच्या शरीरात चरबी कमी झाली की त्या पुरुषांसारख्या दिसू लागतात. शरीर विश्रांती घेत असताना शरीरातील स्नायू चरबीचा वापर करतात. साहजिकच स्नायूंचे प्रमाण जेवढे अधिक, तेवढे त्या स्नायूंनी वापरलेल्या चरबीचे प्रमाणही जास्त असते. म्हणूनच स्नायूंचे प्रमाण वाढवणारा व्यायाम चरबी कमी करण्यास योग्य असतो. चरबी कमी झाल्यावर स्वादुपिंडावर इन्शुलिन बनविण्यासाठी येणारा ताणही कमी होतो. म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी स्नायूंचा आकार वाढविणारे व्यायाम हे प्रमुख व्यायाम होत.

(उद्याच्या अंकात वाचा - मधुमेह आणि व्यायामाचे गैरसमज)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com