मधुमेह आणि व्यायामाचे गैरसमज (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी
बुधवार, 1 मे 2019

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

हेल्थ वर्क
योगासने केल्याने मधुमेह बरा होतो, हा वेडगळ समज आहे. अमुक एखादे आसन केल्याने स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत चालते, असे म्हणणाऱ्या योगाचार्यांना स्वादुपिंड कोठे आहे, हेदेखील माहिती नसते. त्यामुळेच असे छातीठोकपणे सांगणाऱ्याला व्यायामातील फारशी माहिती नाही, हे आपण लगेच ओळखावे. मात्र, योगासने पूरक व्यायाम म्हणून जरूर करावीत. चालणे किंवा फिरायला जाण्यासारख्या व्यायामात स्नायूंचा आकार वाढत नाही. त्यामुळे हा व्यायाम मधुमेही रुग्णांना पुरेसा नाही. 

व्यायाम प्रकार
स्नायूंची संतुलित ताकद वाढविणारा वजन उचलण्याचा व्यायाम हा प्रमुख होय. आज पुण्यात उत्कृष्ट व्यायामशाळा आहेत, त्यात हा व्यायाम घेता येतो. हा व्यायाम करताना प्रत्येक प्रकारात पूर्वीपेक्षा जास्त वजन उचलण्याचा, ढकलण्याचा, ओढण्याचा, सरकविण्याचा प्रयत्न करणे फार महत्त्वाचे असते. स्नायूंचा आकार वाढू लागल्यावर इन्शुलिन किंवा गोळ्यांचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे व्यायामाला सुरवात करण्याच्या आधी आपल्या डॉक्‍टरांना कल्पना द्यावी. हळूहळू पूर्णपणे व्यायाम आणि आहाराच्या आधारे मधुमेहाचे नियंत्रण शक्‍य होते. मात्र, लघवी व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही ना, याची अधूनमधून तपासणी करावी. हे व्यायाम आठवड्यात दोनदा अगर तीनदा पुरेसे असतात. मधुमेहींच्या रक्तवाहिन्यांना इजा पोचण्याची शक्‍यता असते. त्यासाठी दमश्‍वासाचे व्यायाम करणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे आदी महत्त्वाचे आहेत. योगसनांची उपयुक्तता पूरक व्यायाम म्हणून वादातीत आहे. प्रत्येक मधुमेहाचा रुग्ण हा एक स्वतंत्र विषय असल्यासारखेच असते. त्यामुळे प्रत्येकाने किती खावे, किती व्यायाम करावा व कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर ठरते. तरीदेखील अत्यंत कमी तीव्रतेने व्यायाम करण्यास कोणतीच हरकत नाही. मधुमेहातील पुढील गुंतागुंत टाळण्यास व्यायाम अत्यावश्‍यक आहे. शारीरिक व्यायामाबरोबर मनाचे व्यायाम म्हणून प्राणायामासारखे व्यायाम केल्यास शरीरमनाचे उत्तम संतुलन साधले जाते.  

(पुढील भागात वाचा - आहार आणि आरोग्य)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Dr Rajiv Sharangpani all well supplement sakal pune today