मद्यपान आणि हृदयाचे आरोग्य

Heart-Attack
Heart-Attack

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ
दररोज एक ग्लास वाइन डॉक्टरपासून दूर ठेवते, अशी एक लोकप्रिय धारणा आहे. मद्यप्राशन, विशेषतः रेड वाइन हृदयासाठी चांगली आहे, असेही समजले जाते. परंतु हे पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. आपण मद्यामधील घटकांविषयी, तसेच त्याच्या परिणामांविषयी माहिती करून घेऊयात. काही शोधनिबंधांमध्ये मध्यम प्रमाणातील मद्यपानामुळे हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले आहे, पण या अभ्यासातून कारण आणि परिणाम ठरविणे कठीण आहे. मध्यम प्रमाणातील अल्कोहोलमुळे एचडीएल या चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी किंचित वाढविण्यात मदत होऊ शकते, असे दिसून आले आहे. संशोधकांनी असेही सुचविले आहे की रेड वाइन, विशेषत: त्यात समाविष्ट असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे, हृदयाचे संरक्षण करू शकते. परंतु, याचा अर्थ असा नाही की आपण लगेच मद्यप्राशन चालू करावे. व्यायाम, धूम्रपान थांबवणे इत्यादी गोष्टीसुद्धा चांगल्या (एचडीएल) कोलेस्टेरॉलची  पातळी वाढवू शकतात आणि फळे, भाज्या, द्राक्षाच्या रसासारख्या खाद्यपदार्थांमध्येही मद्यापेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट आढळू शकतात.

मध्यम प्रमाणात मद्यसेवन म्हणजे काय? 
मध्यम प्रमाणात मद्यसेवन म्हणजे प्रतिदिवशी प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी एक ड्रिंक आणि पुरुषांसाठी दोन पेगांपर्यंत. एक ड्रिंक म्हणजे बिअर : १२ द्रव ऑउन्स (३५५ मिलिलिटर), वाइन ः ५ द्रव ऑउन्स (१४० मिलिलीटर, डिस्टिल्ड स्पिरिट्स (८० प्रूफ ) - १.५ द्रव ऑउन्स (४४ मिलिलिटर होय. तथापि, या मार्गदर्शक तत्त्वांचा कोणत्याही कारणास्तव मद्यसेवन सुरू करण्यासाठी वापर करू नये. 

अधिक मद्यपान हृदयाला हानिकारक आहे का?
अधिक प्रमाणात मद्यपान हृदयाविकारासह अनेक आरोग्यविषयक दुष्परिणामांशी निगडित आहे. अतिप्रमाणात मद्यपान केल्यास उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोकही येऊ शकतो. अतिमद्यसेवनामुळे हृदयाची गती ही अनियमित आणि तीव्र (ऍट्रिअल फिब्रिलेशन) होते. यामुळे पक्षघाताची शक्यता असते. अतिप्रमाणात मद्यसेवन केल्याने हृदयाची पंपिंग क्षमता कमी होऊन कार्डिओमायोपॅथी होऊ  शकते. अल्कोहोल हा अतिरिक्त उष्मांकाचा स्रोत आहे. अतिरिक्त मद्यसेवनामुळे स्थूलता आणि जीवनशैलीचे इतर आजार बळावू शकतात. मद्य हृदयाव्यतिरिक्त आपल्या यकृताचीही अपरिमित हानी करते. त्यामुळे मद्यप्राशनापासून हृदयाला संरक्षण मिळते, हे अर्धसत्य आहे. त्यामुळे तुम्ही हृदयविकाराने मरणार नाही, पण यकृताच्या समस्यांनी नक्कीच मरू शकता. त्यामुळे मद्यसेवनाच्या वाटेला न जाणेच उत्तम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com