मद्यपानाशिवाय होणारा ‘फॅटी लिव्हर’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॅा. शीतल महाजनी-धडफळे
बदलत्या जीवनशैलीचा यकृतावर निश्‍चितच परिणाम होतो. मुख्यत्वे दारूचे व्यसन नाही, अशाही लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास जाणवतो आणि त्याचे मुख्य कारण स्थूलपणाचे वाढते प्रमाण आहे. भारतीयांमध्ये फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या यकृताच्या आजाराचे प्रमाण ९ ते ३२ टक्के आहे. लठ्ठ आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तीमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्याचप्रमाणे मेद (कोलेस्टरॉल) असलेल्या सर्व व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर आणि त्यामुळे होणारा यकृताचा आजार आढळतो. या आजाराचा उल्लेख सर्वप्रथम १९८०मध्ये लुंडविग या शास्त्रज्ञाने केला. 

NAFLD म्हणजे काय? 
मद्यपानाचे व्यसन नसणारे रुग्ण आणि त्याचे दैनंदिन प्रमाण २० ग्रॅमपेक्षा अत्यल्प असूनही यकृतात मेदाचे/ फॅटचे प्रमाण आढळते, अशा रुग्णांना NAFLD हा आजार होतो. यामध्ये सुरवातीला फक्त फॅटी लिव्हर होते आणि नंतर हेपॅटायटिस, फायब्रोसिस होतो तसेच कालांतराने सिऱ्हॉसिसची बाधा होते. 

हा आजार कोणास होतो? 
१)    स्थूलपणा : स्थूल व्यक्तींमध्ये, म्हणजेच बीएमआय वाढलेला आहे आणि पोटावरील भागात जास्त चरबीचा साठा आहे, अशा व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण अधिक आहे. 
२)    DM & फॅटी लिव्हर : मधुमेह असणाऱ्या सर्व रुग्णांमध्ये हा आजार अधिक आढळतो. 
३)    रक्तातील मेदाचे प्रमाण वाढले असल्यास फॅटी लिव्हरचे प्रमाण अधिक आढळते. 
    
NAFLD ची लक्षणे काय? 
    या आजाराची सुरवातीच्या कळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही जणांना पोटाच्या उजव्या बाजूस बरगडीच्या खालील भागात हलक्‍या वेदना होऊ शकतात. थकवा, निरुत्साह जाणवू शकतो. रक्ताची तपासणी केली तर त्यामध्ये लिव्हर एन्झाइमाइन्स वाढलेली आढळतात, तसेच सोनोग्राफीत लिव्हर मोठे झालेले आढळते, तसेच त्यात फॅटचे प्रमाण आढळू शकते. एमआरआय, फिशरोस्कॅन, सीटी स्कॅन अशा विविध तपासण्यांमधून फॅटचे अचूक प्रमाण जाणून घेता येते. तसेच फिशरोसीस व सिऱ्हॉसिसचे निदान होऊ शकते. तसेच काही प्रसंगी यकृताची बायोप्सी केली जाते. 

उपचारपद्धती -
फॅटी लिव्हर या आजाराच्या उपचारपद्धतीत खालील तीन बाबींचा आवर्जून 
समावेश होतो. 
१. नियमित व्यायाम,     २. वजन कमी करणे,  
३. आहारावर नियंत्रण ठेवणे. 

थोडक्यात, आहार, व्यायाम आणि वजन कमी करणे या त्रिसूत्रीचा दररोजचा वापर आपल्याला फॅटी लिव्हरपासून दूर ठेवू शकतो. आपल्या वजनाच्या १० टक्के वजन कमी केल्यास यकृतामधील फॅटचे प्रमाण प्रकर्षाने कमी होते. फास्ट फूड, तेलकट वस्तू, अतिगोड पदार्थ, प्रमाणाबाहेर कर्बोदकांचा आहारात वापर केल्यास फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते आणि यकृताचे आजार होतात. दररोज व्यायाम केल्याने शरीरातील चयापचय व्यवस्थित चालू राहते आणि यकृतामध्ये चरबी साठत नाही. या आजारापासून मुक्ती मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नित्यनियमित व्यायामच आपली फॅटी लिव्हरपासून सुटका करू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shital mahajani dhadphale all is well sakal pune today