हेल्थ केअर मॅनेजमेंट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 August 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर 
आपण सारेच जास्त आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो. किरकोळ आजारपण असो वा चाळिशीनंतरच्या तपासण्या असोत. त्यासाठी आपण विविध निदान (डायग्नोस्टिक सेंटर) केंद्रात जातो. निव्वळ पुणे शहरात आज अशा हॉस्पिटल्स व निदान केंद्रांची संख्या सहज सहा-सातशेच्या घरात पोचली आहे. हे सारे डॉक्‍टरी क्षेत्र आहे, अशी आपण अनेकांनी एक कल्पना करून घेतली आहे. सध्याच्या दशकात म्हणजेच २०१०-२०२० पर्यंतच्या काळात या साऱ्याचे जागतिक नाव आहे हेल्थकेअर सेक्‍टर. इथे डॉक्‍टर असतातच; पण त्यांचे प्रमाण जेमतेम दहामध्ये फक्त दोन एवढेच असते.

मात्र, या दहाच्या दहांवर त्यांची कामे, त्यांचे निर्णय, त्यांची कार्यक्षमता यावर देखरेख ठेवणारी एक मॅनेजमेंटची शाखा आता अस्तित्वात आली आहे. तिचे नाव आहे हेल्थकेअर मॅनेजमेंट. कोणत्याही पदवीनंतर या विषयातील पदव्युत्तर पदवी घेऊन उमेदवारीला सुरवात होऊ शकते. आवडीनुसार क्षेत्र निवडता येते, बदलता येते, प्रगती करता येते. मुख्यतः आरोग्यविषयक संबंधित साऱ्या क्षेत्रातील व्यवस्थापन कौशल्ये या अभ्यासक्रमात शिकवली जातात. 

आसपास पाहा ना तुम्हीच! पंचकर्म, वेटलॉस-गेन, ब्यूटी वेलनेस आणि अशाच कितीतरी नावांनी हेल्थकेअर सेंटर्स आहेत. एवढेच नव्हे, मोठमोठ्या रुग्णालयांमध्येसुद्धा योग, डाएट, फिटनेस, वेलनेस, हार्ट रिहॅबसेंटर वगैरे नावाने विभाग सापडतीलच. थोडक्‍यात सांगायचे तर, हे खिशात पैसा असलेल्या प्रत्येकासाठीचे ‘आरोग्य कारण’ सांभाळण्याचा फार मोठा उद्योग आहे. तो वाढता वाढता वाढून सारेच व्यापत चालला आहे. प्रचंड हुशारी, प्रचंड मार्क, प्रचंड पैसे व प्रचंड कठीण अशी प्रवेश परीक्षा देण्याची कुवत यापैकी कशाचीच गरज नसलेला असा हा सुरेखसा कोर्स अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. 

गंमतच पाहा ना, खूप हुशार असलेली तब्बल दहा वर्षे अभ्यास करून डॉक्‍टर बनलेली एक डॉक्‍टरीण अशाच एका हेल्थकेअर डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली. तिचा इंटरव्हू घेण्याच्या पॅनेलवर तिचीच शाळकरी मैत्रीण बसली होती. तिथली मॅनेजर म्हणून तिचे तीन वर्षे काम झाले होते ना? हेल्थकेअरमधील पदवी घेतल्यानंतर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dr Shriram Git edu supplement sakal pune today