माझी सई (गिरिजा ओक)

गिरिजा ओक
Monday, 22 April 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

सेलिब्रिटी व्ह्यू
माझी आत्या सांगलीमध्ये राहते. मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुटीत तिच्याकडे जायचे. आत्याच्या शेजारच्या घरात आज्जी. जिथं माझा आवडता मेन्यू, तिथं जेवायचं, सगळ्यांकडून लाड करवून घ्यायचे, घराच्या मागच्या नारळाच्या बागेत दिवसभर हुंदडायचे, आजूबाजूच्या मुलांबरोबर चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडायच्या, घरासमोर जरबेराच्या फुलांची शेती होती, तिथे टाइमपास करायचा, असा माझा दिनक्रम. मी आत्याला ‘दीदी’ आणि तिच्या यजमानांना ‘काका’ म्हणते. माझे काका सायकॉलॉजीमध्ये एम. ए. आहेत. ते समुपदेशन करतात आणि करियरच्या दृष्टीने दहावीच्या मुला-मुलींच्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात.

माझे आजोबा फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि जपानी भाषेचे क्‍लासेस घेतात. चला आता बॅकग्राउंडची सगळी माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे. तर सई म्हणजे सई ताम्हणकर ही माझ्या आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुटीत फ्रेंच शिकायला यायची. तिथेच तिला काकांच्या करिअर गायडन्सबद्दल कळालं आणि तिने ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्यायची ठरवलं. नेमकी त्याच दिवसांमध्ये मी पण परीक्षा संपवून (नववीची) सुटीसाठी सांगलीला येणार होते. काकांनी आम्हा दोघींची टेस्ट एकत्र करण्याचं ठरवलं (थॅंक यू काका!). सकाळी उठून तयार होऊन मी टेस्टची वाट बघत बसले होते. तोच एक छान दिसणारी साधारण माझ्याच वयाची वाटणारी मुलगी ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसली. तिच्या पेहरावावरून, बोलण्यावरून ती सांगलीसारख्या त्या मानाने छोट्या गावातली नसावी किंवा काही वर्षं बाहेर कुठंतरी राहून आली असावी, असं वाटत होतं. तिनं जीन्स आणि एक छान काळा टॉप घातला होता (काळा रंग मॅडमचा आवडता आहे बरं का. संपूर्ण कपाटात अंधार असतो, फक्त काळे कपडे). तर आम्ही गप्पा मारायला लागलो. तुम्हाला कधी असं झालाय का हो? म्हणजे काहीच ओळख नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा बोलतानाच एक विलक्षण आपलेपणा जाणवलाय? माझं तसंच झालं. टेस्ट संपली, आम्ही एकमेकींचे फोन नंबर घेतले (तेव्हा मोबाईल आम्हा दोघींकडे नव्हते, त्यामुळे अर्थात लॅंडलाइन!) आणि आम्ही जवळपास रोज भेटायला लागलो. ती तिच्या आईच्या दुचाकीवर मला घ्यायला यायची आणि मग आम्ही टाइमपास करत फिरायचो.

उन्हाळ्याची सुटी संपवून परत जाण्याचा दिवस आला, आम्हा दोघींना अक्षरशः रडू आलं. ‘आता तू मुंबईला ये हं’, असं म्हणून मी निरोप घेतला. पुढची दोन वर्षं आम्ही फक्त उन्हाळ्याच्या सुटीत भेटायचो, इतर वेळी सई मला पत्र पाठवायची. एकदा तिने मला वाढदिवसाला एक पत्र पाठवलं होतं. हे पत्रं तिने रंगीत पेनने लिहिलं होतं. ते पत्र वाचून मला तिची आठवण येईल आणि मी रडेन म्हणून तिनेच त्या पत्रात एक टिश्‍यू पेपर चिकटवून दिला होता. ते पत्र अजूनही माझ्याकडे आहे. अर्थात रंगीत पेनाची शाही आता उडून गेली आहे आणि ते जवळपास कोरं दिसतं. खाली टिश्‍यू पेपर मात्र तसाच आहे. अशी ही माझी अत्यंत धाडसी, स्वावलंबी, कर्तृत्ववान आणि तितकीच हळवी, लाघवी मैत्रीण. सई कुठल्याही नात्यात कधीच हातचं राखून वागत नाही. मनापासून प्रेम करते आणि ते शब्दातून व्यक्तदेखील करून दाखवते. तिचा हा गुण माझ्या विपरीत आहे. माझ्या मनात एखाद्याबद्दल खूप प्रेम, काळजी असली तरी ती मी कधीच बोलून दाखवायचे नाही. मला ‘शेअर’ करण्याची सवय नव्हती. अडचणी, भावनिक गुंता आतल्या आत ठेवण्याची सवय होती. हे सगळं भूतकाळात होतं बरं का. माझ्या सईमुळेच मी बदलले. हा बदल घडून येण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागला; कारण नेमकं माझ्या याच स्वभावामुळे आम्हा दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला होता. तब्बल अडीच वर्षं आम्ही एकमेकींशी बोलत नव्हतो. नक्की काय झालं आणि ते आम्ही कसं सोडवलं, 

हे वाचा पुढच्या लेखात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Girija Oak in Maitrin supplement of Sakal Pune Today