आयसर अभिक्षमता चाचणी अर्ज उपलब्ध

हेमचंद्र शिंदे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर २८ एप्रिल २०१९ पर्यंत उपलब्ध आहेत. आजपर्यंत दरवर्षी जूनपर्यंत अर्ज उपलब्ध होत होते. प्रवेशासाठी सद्यःस्थितीत त्वरित अर्ज दाखल करावा.

उपलब्ध जागा - पाच वर्षे कालावधीच्या बीएस-एमएस या ड्युएल डिग्रीअंतर्गत बेहरामपूर १५० जागा, भोपाळ - २२५, कोलकता - २२५, मोहाली - २२५, पुणे - २५६, तिरुअनंतपुरम - २२० व तिरुपती - १८५ अशा सात ठिकाणी एकूण १४८१ जागा या वर्षी उपलब्ध आहेत. चार वर्षे बॅचलर ऑफ सायन्सअंतर्गत भोपाळ येथे १०० जागा उपलब्ध आहेत.  

एससीबी वेळापत्रक - ऑनलाइन अर्ज ३१ मार्च ते २८ एप्रिलपर्यंत उपलब्ध आहेत. त्यानंतर हॉल तिकीट २० मे रोजी उपलब्ध होणार असून, परीक्षा २ जून २०१९ला होईल. पीसीएमबी विषयावर सीबीटी पद्धतीने, प्रत्येक विषयासाठी १५ प्रश्‍न असे एकूण ६० प्रश्‍न असून, बरोबर पर्यायास तीन गुण व चुकीच्या पर्यायासाठी एक गुण वजा होतो.

परीक्षा केंद्रे - देशभरात १०७ शहरे, त्यापैकी राज्यातील पुण्यासह मुंबई, अमरावती नागपूर, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांचा परीक्षा केंद्रात समावेश असून, अर्ज भरताना पाच केंद्रे नोंदवावीत.

आयएटीसाठी पात्रता - बारावी परीक्षा २०१८ तसेच २०१९ मध्ये उत्तीर्ण झालेले, होणारे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. २०१९ मध्ये प्रथमच पात्रता गुणात मोठे बदल केलेले असून, पूर्वीप्रमाणे डीएसटी कट ऑफ एवढ्या गुणांची आवश्‍यकता नाही. अर्थात संकेतस्थळावरून पात्रतेबाबत माहिती घ्यावी. देशभरातील प्रत्येक बोर्डाचे प्रत्येक प्रवर्गानुसार कमीत कमी पात्रता गुण उपलब्ध असू शकतात.

उदा - महाराष्ट्र बोर्डाचा विचार करता खुला व ईडब्ल्यूएस गटासाठी ४३१ गुण, ओबीसीसाठी ४२०, एससीसाठी ४०१, एसटीसाठी ३८५ गुण अशी पात्रता आवश्‍यक आहे. याकरिता पीसीबी अथवा पीसीएम, एक भाषा व एक विषय असे मिळून पाचशे गुणांपैकी वरील गुणाएवढे गुण प्राप्त करण्याची गरज आहे.

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या डेमो फॉर्मचा प्रथम अभ्यास केलाच पाहिजे. देशपातळीवर वरील नियमानुसार एससी - १५ टक्के, एसटी - ७.५ टक्के, ओबीसी-एनसीएल - २७ टक्के, पीडब्ल्यूडी - ५ टक्के याचबरोबर ईडब्ल्यूएस - १० टक्के आरक्षण लागू आहे.

फॉर्म भरताना २०१८ मध्ये बारावी झाली असल्यास मार्क भरावेत.
यंदा प्रथमच बारावी देणाऱ्यांनी निकाल जाहीर या पर्यायापुढे ‘नाही’ असे मार्किंग करावे. मात्र, अशा सर्वांना १ मे ते २१ जून या कालावधीत आपले मार्क भरण्याची संधी आहे.

बारावी मार्क भरल्यानंतर बारावी मार्कलिस्ट (एक एमबीपेक्षा कमी आकार) अपलोड करणे आवश्‍यक आहे. 

केव्हीपीवाय चॅनेल - २६ मे ते २० जून २०१९ या कालावधीत पोर्टल ओपन होईल, तेव्हा नोंदणी करावी. 

जेईई ॲडव्हान्स्ड चॅनेल - १५ ते २० जून या अल्प कालावधीत नोंदणी करावयाची आहे. 

अद्ययावत माहिती व वेळापत्रकातील बदलासाठी संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

वाचकांना आवाहन
आपले प्रश्‍न-शंका, सूचना, आवडलेले विषय आणि सहभागासाठी आम्हाला जरूर कळवा - ई मेल -  edusakalpage@gmail.com
फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला कळवू शकता. 
हॅशटॅग वापरा #EDUNokariCareer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shinde edu supplement sakal pune today