#MokaleVha : भय इथले संपेलही...

Life
Life

ज्योती (नाव बदलले आहे) ही अत्यंत श्रीमंत कुटुंबातील सुविद्य तरुणी. सुसंस्कारित व एकत्र कुटुंबातून आलेल्या ज्योतीचा विवाह उपेंद्र (नाव बदललेले आहे) यांच्याशी झाला. उपेंद्रचे कुटुंबदेखील गर्भश्रीमंत. वैवाहिक बंधनातून ज्योतीला दोन मुले झाली. उपेंद्रच्या हातात अमाप पैसा असल्यामुळे त्याला चैनीची चटक लागली. त्यातून हॉटेलींग, पब, डान्सबार, दारू, ड्रग्जची चटक लागली. उपेंद्रचे एकूणच ढासळणे ज्योतीला आक्षेपार्ह होते. त्यातून वाद सुरू झाले. उपेंद्रला अश्लील चित्रफिती पाहण्याचे व्यसन लागले.

त्यातून तो ज्योतीवर अत्याचार करू लागला. तिच्या माहेरची एकूणच सामाजिक प्रतिष्ठा व सामाजिक बंधनातून तिने अत्याचार मूकपणे सहन केला. दुर्दैवाने ज्योती व्याधीग्रस्त झाली. डॉक्टरांनी एड्सची भीती व्यक्त केल्यावर ज्योती जागी झाली. तोपर्यंत उशीर झाला होता. कायदेशीर प्रक्रियेमधूनही ज्योतीचे आयुष्य पूर्वपदावर येणे अवघड झाले. 

दुसरी केस गरीब कुटुंबातली. गरीब कुटुंबात वाढलेल्या अस्मा (नाव बदलले आहे)चे गरीब कुटुंबातील सलीमशी विवाह झाला. विवाहबंधनातून अस्माला सहा मुले झाली. सलीम रोजंदारीमधून मिळणारे पैसे सलीम व्यसनावर उडवत होता. नाइलाजाने तिला घरकाम करण्यासाठी बाहेर पडावे लागले. अस्मा मुलांसमोर सलीमकडून होणारी मारहाण निमूटपणे सहन करत होती. एके दिवशी अस्मा काम करत असलेल्या घरी तिला जास्त वेळ काम करावे लागले. रात्र झाल्यामुळे घरमालकाने ड्रायव्हरसोबत गाडीतून अस्माला तिच्या घरी सोडले. ती गाडीतून उतरलेली बघून सलीमने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन जीवघेणी मारहाण केली. अस्मा मुलांसह माहेरी निघून गेली.

अस्माच्या कष्टाच्या पैशावर जगणाऱ्या सलीमची उपासमार होऊ लागली. त्याने अस्माच्या माहेरी जाऊन तिला सासरी येण्यासाठी धमक्या देऊ लागला. अस्माने नकार दिला. एके दिवशी सलीमने चिडून अस्माच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. मरणप्राय यातना सहन करत अस्माला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करणे भाग पडले. विवाह झाल्यापासून अस्माने मुकाट्याने सलीमकडून होणारा छळ सहन केला. त्यातून सलीमची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच गेली. 

दोन्ही केसमध्ये एक समान घटक म्हणजे अत्याचारग्रस्त या महिला असून हिसांचाराच्या बळी ठरलेल्या आहेत. शिवाय दोन्ही महिलांनी अत्याचार अनेकवर्षे निमूटपणे सहन केले. फक्त विवाहित महिलांवर अत्याचार होतात हे अर्धसत्य आहे. एकूणच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुय्यम व उपभोगाची वस्तू असा असल्यामुळे नकळत अत्याचार करण्यास उद्युक्त केले जाते.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०१८ मधील सर्वेक्षणानुसार इतर कोणत्याही गुन्ह्यातील तक्रारीपेक्षा कौटुंबिक अत्याचाराच्या तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले. सन २०१७ मधील सर्वेक्षणात बलात्काराच्या एकूण ३२५०० तक्रारींची नोंद झाली. एकूणच अभ्यासातून दर तीन मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतो, असे स्पष्ट झाले. परंतु त्यातूनही ब­ऱ्याच अत्याचार व गुन्ह्यांची नोंद होत नसल्याची बाब समोर आल्याने महिलांवर होत असलेल्या अत्याचाराची भयानकता अधिकच असल्याचे दिसते. या सर्व बाबींची प्रामाणिकपणे कारणमीमांसा होणे आवश्यक आहे.

महिलांवरील अत्याचार व त्यासंबंधातील गुन्हे संपूर्णपणे थांबवणे समाजव्यवस्थेनुसार अवघड असलेतरी प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करणे शक्य असून त्याचे त्वरित परिणाम संभवतात. 

भारतीय संस्कारामध्ये ‘नारी सर्वत्र पूज्यते’ अशी आध्यात्मिक शिकवण आहे. भारतीय धर्मशास्त्रानुसार, स्त्रियांना पूज्य भाव दिलेला असला तरीसुद्धा त्याचे प्रतिबिंब सामाजिक व्यवहारामध्ये होत नाही. महिलेला समानतेची वागणूक देऊन तिला आत्मविश्वास, ऊर्जा व शक्ती देणे गरजेचे आहे. महिला सक्षमपणे उभ्या राहिल्या तर अत्याचाराला प्रतिबंध होईल तसेच गुन्हेगारावर आपोआप जरब बसेल. अत्याचार करण्याचे साधन ‘महिला’ नाहीत हा विचार दृढ झाला पाहिजे. जागतिक सर्वेक्षणातील अभ्यासानुसार महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत फक्त ०.१ टक्के तक्रारी होत असल्याचे आढळून आले आहे. सामाजिक रुढी परंपरा, चालीरीती, कौटुंबिक ढाचा तथाकथित सामाजिक मूल्ये याचा आत्यंतिक पगडा वर्षानुवर्षे असल्यामुळे अत्याचाराविरुद्ध तक्रारीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. महिलांनी अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणे गरजेचे आहे. पीडित महिला तक्रार करण्यास धजावत नाहीत. सर्व कारणे किंवा अडथळे झुगारून देऊन अत्याचाराविरुद्ध पीडित महिला व संबंधिताने त्वरित आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अन्याय किंवा अत्याचार सहन करणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगाराला अधिकाधिक गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे असा होतो.  

महिलांवरील अत्याचार, लैंगिक गुन्हे, बलात्कार, बालअत्याचार, अल्पवयीन मुले व मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार याबाबत ऑनलाइन तक्रार पोलिसांच्या वेबसाइटवर दाखल करता येऊ शकते. त्याचप्रमाणे मोबाईलवर अश्लील मेसेज, फोटो पाठवून विनयभंग झाल्याबाबतची तक्रारही सायबर क्राइमला करता येते. तक्रारीची दखल स्थानिक पोलिस स्टेशनला घेतली न गेल्यास वरिष्ठांकडे त्वरित दाद मागता येते.

अशा प्रकारच्या महिलांवरील अत्याचारांची दखल त्वरित घेऊन तपास करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. पुणे पोलिस आयुक्तालय येथे ‘महिला दक्षता समिती’, ‘भरोसा सेल’ येथे तक्रार स्वीकारली जाते. तसेच अत्याचारित महिलेला न्यायालयात थेट तक्रार दाखल करता येते. कोणत्याही गुन्ह्याबाबत दखल घेऊन गुन्ह्याचा तपास न्यायालयामध्ये दाखल करणे पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानंतर न्यायालयामधून तक्रारींचा निपटारा कायदेशीर प्रक्रियेमधून होतो. कौटुंबिक अत्याचार व सामाजिक गुन्हे याबाबत केवळ पोलिसांना व न्यायप्रक्रियेला जबाबदार धरणे अथवा दोष देणे गैर आहे. याचा अर्थ पोलिसांची जबाबदारी कमी होते असे नाही. पोलिसांकडून प्रतिबंधक उपायांबाबत वारंवार सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे तक्रारी करण्याची ठिकाणे व सहजसोपे अर्ज याबाबतही मार्गदर्शन केले जाते.

गुन्हा व गुन्हेगारी या विषयातील शास्त्राचा अभ्यास केला असता प्रत्येक गुन्हा हा प्रवृत्ती व विकृतीमधून घडतो, असे मानसशास्त्र सांगते. मुळात अशी प्रवृत्ती निर्माण होतानाच अटकाव झाला तर त्याचे विकृतीत रूपांतर होणे थांबते. गुन्हेगारी प्रवृत्ती ही अचानक होत नाही तर प्रक्रियेमधून निर्माण होते. लहान वयात मुलांवर होत असलेले संस्कार अत्यंत गरजेचे व आधारभूत आहेत. संस्कार कुटुंबातून तसेच शाळा व समाजातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या होतात. इयत्ता ८ वी ते १० वी या वर्गातील मुलामुलींचे प्रबोधन व व्यक्तिमत्त्व विकासासंबंधीचे शिक्षण आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com