Independence Day : जबाबदारीचे स्वातंत्र्य

स्मिता दोडमिसे (Smita.dodmise@esakal.com)
Monday, 12 August 2019

आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्वातंत्र्य मिळते, तेव्हा स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही येते, याचे भान बाळगणे आवश्‍यक आहे. तेव्हाच खरे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकू.- स्मिता दोडमिसे
 

स्वातंत्र्यदिन : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण आपली स्वत:ची राज्यघटना तयार केली आणि नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र्ये दिली. विचार, अभिव्यक्ती, संचार, धार्मिक आचार अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य मिळाले.

आता स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अगदी मूलभूत विचार केला, तर असे आपण म्हणू शकतो कुठल्याही नियंत्रणातून, अंकुशातून मुक्ती मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य. मुक्ती मिळते; पण त्यासोबत पुढे मुक्त जगताना काही गोष्टींचे भान असणे आवश्‍यक आहे. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच मुळी आपल्याला हवे तसे विचार करण्याचा, बोलण्याचा आणि वागण्याचा हक्क असणे असा आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या ताब्यातून किंवा हस्तक्षेपातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य; परंतु ते स्वातंत्र्य उपभोगताना काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात, त्यालाचा जबाबदारी म्हणतात. आज आपल्याला कसले कसले स्वातंत्र्य आहे; तर भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य व आता असलेले डिजिटल स्वातंत्र्यपण या सगळ्या स्वातंत्र्याच्या मुळाशी अधोरेखित होते ती जबाबदारी.

आता स्वातंत्र्य आणि जबाबदारी या गोष्टी माझ्या मनात अगदी पक्‍क्‍या रुजायला कारणीभूत झाला तो एक प्रसंग, माझ्या लहानपणी घडलेला. लहानपणी अभ्यास न करणे, सतत खेळणे यावरून आई रागवायची, तिने माझी तक्रार बाबाकडे केली. ते म्हणाले, ती मोठी झाली, तिला कळते आपण काय केल्याने काय होईल. तेव्हा अती खेळल्याने, अभ्यास न केल्याने काय पारिणाम होतील हे तिला कळते; मग ती ठरवेला तिला काय करायचे ते. तू नको रागवत बसू. मला त्या क्षणी बाबा न रागावल्याचा आनंद झाला; पण तिथून पुढे मात्र माझे प्रत्येक पाऊल उचलताना मला ते शब्द आठवायचे. काय होईल हे तिला माहितेय. तेव्हा ती ठरवेल कसे वागायचे. त्या जबाबदारीने माझे वागणे आपसूकच शहाण्यासारखे व्हायला लागले. अभ्यास नाही केला तर आपल्याला काही येणार नाही, कमी मार्कस पडतील या जबाबदारीची जाणीव झाली.

भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात भाषण, आचारविचार, धर्म, भाषा, विहार अशा अनेक बाबतीत आपल्याला भारताचे नागरिक म्हणून स्वातंत्र्य आहे, जसे भाषण स्वातंत्र्य आहे; परंतु आपण काय बोलतो, त्याचा परिणाम काय होणार, त्याचे पडसाद काय उमटणार याचा विचारा करूनच बोलायला पाहिजे.

भारतातील नागरिकांना भाषण-स्वातंत्र्य या मूलभूत हक्काप्रमाणे आजच्या काळात आपले विचार, कृती लोकांपर्यंत मांडायला डिजिटल स्वातंत्र्य मिळालेय. फेसबुक, ट्‌विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर विविध गोष्टींवर व्यक्त होण्याचं, इतरांच्या पोस्टवर कमेंट करण्याचं स्वातंत्र्य आज आहे; पण प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याचा अतिरेक आजकाल या साइट्‌सवर दिसू लागला आहे आणि अशाच कमेंट्‌स समाजात खळबळ निर्माण करताना दिसत आहेत. "शत्रुत्व किंवा समाजातील दोन वर्गांमध्ये वाद निर्माण करणारे वाक्‍य' उद्गारल्यास कायद्याने शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारची कमेंट करणे योग्य होते का? हा विचार करण्याची जबाबदारी प्रत्येक नेटिझन्सची आहे.
स्त्रियांसाठी जसे हुंडाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार असे अनेक कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. त्या कायद्याचे संरक्षण स्त्रीला खरोखर मिळायला हवे, मिळतेही; परंतु दुर्दैवाने असे म्हणावे लागतेय आता या कायद्याचा दुरुपयोगही घडताना दिसतोय. या कायद्याचा आधार घेत दुरान्वये संबंध असलेल्या अनेक नातेवाइकांचेही नाव गोवण्यात येते.

आजच्या भारताचा विचार करता आपल्याला अनेक गोष्टींत स्वातंत्र्य मिळाले अन्‌ अजूनही काही स्वातंत्र्ये मिळालेली नाहीत. बळिराजाला आज हमीभावाचे स्वातंत्र्य नाही. आता केलेल्या नोटाबंदीने ना भ्रष्टाचार कमी झाला, ना दहशतवाद संपला ना नक्षलवाद असे खेदाने म्हणावे लागते. नोटाबंदी आणि जीएसटी यांच्या कात्रीत सापडला आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, स्कील इंडिया, क्‍लीन इंडिया वगैरेबरोबरच "न्यू इंडिया मिशन'वर बोलले जात आहे. बदलत्या काळानुरूप देश बदलायलाच हवा आणि हे कर्तव्य सरकार आणि समाज दोघांचेही आहे. आज आपल्यापुढे असलेल्या अनेक समस्या आहेत. त्यात बेरोजगारी, दारिद्य्रता साक्षरता, स्वच्छता अग्रक्रमावर आहेत. त्यासाठी सरकार जसे प्रयत्नशील आहे; तसेच आपलीही भारतीय नागरिक म्हणून ती जबाबदारी आहे.

मी माझे घर, परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक नियमाचे पालन करेन हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, हॉर्न वाजवू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत ही आपली नैतिक जबाबदारी आहे. स्वातंत्र्य आपल्याला फुकटात नाही मिळाले. कित्येकांनी आपल्या घरांवर तुळशीपत्र ठेवले, प्राणाची आहुती दिली, तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळाले; मग या स्वातंत्र्याची लाज राखणे, त्याची जाणीव ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

कर्तव्याचा विचार न करता केवळ आततायीपणे अधिकारांची शेखी मिरवणे ही लोकशाहीला लागलेली कीड आहे. यामुळे लोकशाही तकलादू बनत आहे. जे बोलणे, वागणे समाजहिताला, देशहिताला घातक ठरते असे बोलणे, वागणे म्हणजे स्वातंत्र्याचा दुरुपयोगा होय. स्वातंत्र्य ही आपली जबाबदारी आहे, याचे भाना जेव्हा येईल तेव्हा या स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने मजबुतीकरण होईल, स्वातंत्र्य टिकवायला जबाबदारीच्या भानाची साथ हवी हे मात्र खरे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Independence Day written by Smita Dodmise