esakal | #MokaleVha : दुसऱ्यांच्या आनंदात शोधावा आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

Joy

मित्राच्या कंपनीमधील एक मित्र सहकुटुंब आपल्या पत्नीसह वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी आला होता. मित्र आम्हाला कुतूहलाने घर दाखवत होता. आम्हीपण घर पाहत होतो. किचनमध्ये गेल्यावर कंपनीतील त्याच्या मित्राची बायको म्हणाली, ‘‘अहो, किचन लहानच आहे. इथं मांडणी कशाला काढली? दरवाजे सागाचे हवे होते.

#MokaleVha : दुसऱ्यांच्या आनंदात शोधावा आनंद

sakal_logo
By
प्रा. कुंडलिक कदम

एका मित्राच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मित्राने छोटे; पण छान घर बांधले होते.

मित्राच्या कंपनीमधील एक मित्र सहकुटुंब आपल्या पत्नीसह वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी आला होता. मित्र आम्हाला कुतूहलाने घर दाखवत होता. आम्हीपण घर पाहत होतो. किचनमध्ये गेल्यावर कंपनीतील त्याच्या मित्राची बायको म्हणाली, ‘‘अहो, किचन लहानच आहे. इथं मांडणी कशाला काढली? दरवाजे सागाचे हवे होते.’़़’

माझ्या मित्राला त्यांच्या बोलण्यावर, प्रश्नावर काय बोलावे, तेच कळत नव्हते. मित्राने द्यायचे म्हणून काहीतरी उत्तर दिले. त्याच्या कंपनीमधील मित्र आणि मित्राची बायको सतत काहीतरी सल्ला व घराच्या बांधकामाबद्दल त्रुटी काढत होते. मित्राचा चेहरा खूप पडला होता. त्याचा घर बांधण्याचा आनंद कमी झाल्यासारखा वाटत होता. मित्राला त्यांचा थोडासा राग आला होता. पण तो दाखवत नव्हता. नंतर आम्ही जेवण करायला गेलो. जेवण झाल्यावर मित्राला भेटायला गेलो आणि म्हणालो, ‘‘जेवण एकदम मस्त होते. घर पण सुंदर बांधले आहेस. त्या मित्राच्या आणि त्याच्या बायकोच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको.’’ 

माझ्या या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले होते. त्याचा निरोप घेऊन निघालो. खरेच, माझ्या मित्राने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरी मिळवली होती. त्याच्या पत्नीने छोटेछोटे घरगुती व्यवसाय करून पैसे साठवून मित्राला घर बांधण्यासाठी मदत केली होती. स्वतःचे घर असावे, असे त्यांचे स्वप्न होते. ते त्यांनी आज पूर्ण केले होते. खरेच त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होते.

पण, आपल्या समाजात त्याच्या कंपनीतला मित्र आणि त्याच्या बायकोसारखी माणसे असतात. त्यांना कोठे काय बोलावे? याचे भान नसते. ते कायम दुसऱ्याचा आनंद कसा कमी होईल, त्यांना दुःख कसे वाटेल याचा विचार करत असतात. त्याचप्रमाणे त्यांना इतरांच्या उणिवा दाखवण्याची सवय असते. त्यांना दुसऱ्यांचे भाव, भावना याची कदर नसते. जीवनात वाटचाल करताना अशा माणसांकडे दुर्लक्ष करून वाटचाल केल्यास आपला आनंद वाढणार आहे.

loading image