बुकीश : अनोख्या नात्याचा अंक

Born-Free
Born-Free

रात्री आम्ही जेवत असताना ती तंबूत आली, अत्यंत प्रेमानं डोकं माझ्या अंगावर घासून ती तिथून निघून गेली. त्या रात्री ती परत आली नाही. जवळजवळ तीन दिवस ती आमच्यापासून लांब होती. मध्येच यायची तेव्हा आमच्यावरचं प्रेम व्यक्त करायची. ...आमच्यावर तिचं अजून प्रेम असलं तरी आता ती आमच्या प्रेमबंधातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होती, असं कदाचित तिला सांगायचं असावं...या बंधातून मुक्त होणं हेच तिच्यासाठी अधिक श्रेयस्कर होतं...

अॅडमसन पती-पत्नी आणि एल्सा सिंहिणीच्या अनोख्या नात्याचा एक अंक इथं संपतो...

तिच्या तीन छाव्यांच्या रूपानं एल्सा पुन्हा अॅडमसन दांपत्याच्या आयुष्यात आली. पण ती खूप नंतर. एल्सा अगदी चार महिन्यांची असल्यापासून जॉय आणि जॉर्ज अॅडमसन यांच्याबरोबर राहिली. माणसांबरोबर वावरत असली तरी एल्सा ''पाळीव'' नव्हती. सिंहकुलात जन्माला येतानाच जे स्वच्छंद आयुष्य ती घेऊन आली होती, तेच ती जगली. दंतकथा वाटावी अशी ही रिअल लाइफ स्टोरी निसर्ग चित्रकार जॉय अॅडमसन ''बॉर्न फ्री -अ लायनेस ऑफ टू वर्ल्डस'' या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवते. साठ वर्षे उलटून गेली आहेत, पण वन्य प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांच्या मस्ट रीड पुस्तकांच्या यादीतल्या ''बॉर्न फ्री''च्या स्थानाला अजूनही जुनाटपणाचा स्पर्श झालेला नाही.

अगदी लहान वयात मात्यापित्याचं छत्र हरपल्यामुळं माणसांच्या जगात माणसांबरोबर एखादा वन्यप्राणी वाढल्याचं एल्सा हे काही पहिलं उदाहरण नाही. पण असे सगळे प्राणी अखेरीस अपरिहार्यपणे प्राणिसंग्रहालयात जातात. एल्सा आणि अॅडमसन पती-पत्नीची गोष्ट इथं वेगळी ठरते. तीन वर्षांची होईपर्यंत जॉय आणि जॉर्जनी एल्साला तिचं आयुष्य तिच्याच पद्धतीनं जगायला शिकायला मदत केली. पहिल्या दिवसापासून एल्सा जंगलच्या राजकन्येसारखीच वाढली. एल्साच्या स्वच्छंदपणे वाढण्याची कहाणी म्हणजेच बॉर्न फ्री.

एल्सानी अनेकांना वन्य प्राण्यांकडं, निसर्गाकडं वळवलं. सलग तेरा आठवडे बॉर्न फ्री न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपणाऱ्या पुस्तकांच्या यादीत सर्वोच्च स्थानी होते. मराठीसह चोवीस भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या या पुस्तकावर त्याच नावाचा एक चित्रपटही आहे. या चित्रपटासाठी डॉन ब्लॅकनी लिहिलेल्या ‘बॉर्न फ्री टू फॉलो युवर हार्ट’ या गाण्यानं ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब अॅवॉर्डही पटकावले. चित्रपटात जॉय आणि जॉर्जची भूमिका करणाऱ्या व्हर्जिनिया मॅकेन्ना आणि बिल ट्रॅव्हर्सनाही एल्सानी भुरळ घातली होती.

जॉयनी सत्तावीसाव्या वर्षी केनियात पाऊल ठेवलं. चार दशकांच्या केनियातल्या वास्तव्याविषयी जॉयनी अकरा पुस्तकं लिहिली. त्यातल्या चार पुस्तकांमध्यं तिनं एल्सा आणि नंतर तिच्या छाव्यांचं विश्‍व रेखाटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com