रंगसंवाद : काचशिल्प श्रीरामाचे!

रंगसंवाद : काचशिल्प श्रीरामाचे!

कलाकृती साकारण्यासाठी कलावंत वेगवेगळ्या साधनांची निवड करत असतात. त्या साधनांद्वारे आपली कलाकृती साकारतात. नगरचे प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांनी निवडलेले साधन वेगळे आहे. काच. काचेसह इतर माध्यमांतून ते वेगवेगळ्या कलाकृती साकारतात. त्यातही स्टेन ग्लास डिझायनिंगमध्ये त्यांचा हातखंडा आहे. कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेच्या जोरावर त्यांनी गेल्या वीस वर्षांपासून अनेक कलाकृती साकारल्या. त्यातील नावीन्य व आकर्षकतेमुळे त्यांनी देश-विदेशात लौकिक कमावला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजवर अनेक कलाकृती साकारणारे दंडवते यांनी लॉकडाऊन काळात एक महत्त्वाचा प्रोजेक्‍ट हातात घेतला. अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्रासाठी ‘ग्लास म्युरल’ (द्विमितीय) प्रभू श्रीरामांची दहा फूट उंच आणि आठ फूट रुंद असे भव्यदिव्य काचशिल्प साकारण्यात गुंतले आहेत. ही कलाकृती अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात ठेवण्यात येणार असल्याने दंडवते ही कलाकृती अतिशय मेहनत घेऊन साकारत आहेत.

अंतर्गत वास्तू सजावटीत प्रामुख्याने स्टेन ग्लास डिझायनिंगचा डोर, पार्टिशन, सिलिंग, स्टेअरकेस, वॉडरोब, ग्लास म्युरलचा उपयोग केला जातो. यात आधी आराखडा तयार केला जातो. त्यानंतर चित्र रेखाटन, फार्मा कटिंग, आरसा किंवा रंगीत काचांचे तुकडे करण्यापर्यंतचे काम कलाकार करत असतो.

त्यावर पॉलिश, ॲसिड टेक्‍शचर, अल्ट्रा व्हायलेट लाईट, विशिष्ट ग्ल्यूद्वारे पेस्टिंग अशा विविध प्रक्रिया करून कलाकृती साकारत असतात. हे काम किचकट आणि तेवढेच आव्हानात्मकही आहे. स्टेन ग्लास प्रक्रियेत रंगीत काचांचे तुकडे विशिष्ट पद्धतीने लीड किंवा ऍल्युमिनियम चॅनेलमध्ये सोल्डरिंग करून फिट केले जाते. एअर ब्रशिंग कॉम्प्रेसरच्या साह्याने काचेवर रंग दिले जातात. हॅन्ड स्टेन ग्लासमध्ये काचेवर लीड किंवा एमसीलद्वारे लाईनिंग बॉर्डर करून त्यात रंग ओतले जातात. इचिंगमध्ये बारीक सिलिका रेती कॉम्प्रेसरच्या साह्याने कमी जास्त प्रेशरने काचेवर मारली जाते.

काच कलाकृती साकारताना हाताला कापणे, इजा होणे, विविध टेक्‍शचरसाठी काचेवर रासायनिक प्रक्रियाने हात भाजणे, काच नाजूक असल्याने हाताळताना कलाकृतीची तुटफुट होणे अशा अडचणी येतात. त्यामुळे ही कला इतर कलांपेक्षा अतिशय अवघड आहे; पण हे अवघड आणि आव्हानात्मक काम दंडवते यांनी स्वीकारले आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसह वेगवेगळे विक्रम केले आहेत. 

या कलानिर्मितीसोबतच दंडवते एक सामाजिक कर्तव्य म्हणून समाजातील दिव्यांग मुलांना ‘कला विश्व प्रतिष्ठान’ या त्यांच्या संस्थेच्या वतीने कलाप्रशिक्षण देतात. विविध सामाजिक विषयांवर कलेतून समाजप्रबोधन करतात. नैसर्गिक आपत्तीत दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून विविध उपक्रम राबवतात. दिव्यांग, महिला बंदिवान, बेघर-अनाथ मनोरुग्ण महिला, आदिवासी मुली, अनाथालय, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध कला कार्यशाळा विनामूल्य घेतात.  
मेकॅनिकल ड्राफ्टस्मन, आर्ट टिचर डिप्लोमा हे शिक्षण घेणारे दंडवते यांनी दहा वर्षे विविध कंपन्यांत डिझाईन डिपार्टमेंटमध्ये काम केले. पुढे नोकरी सोडून ते पूर्ण वेळ काचकलेतच गुंतले. कलेची निर्मिती करण्यासाठी नाजूक काचेशी खेळणे सोपे नाही; पण त्यातला आनंद ते मिळवत आहेत. श्रीरामांच्या काचशिल्पातून तो द्विगुणीत होणार, असा त्यांचा विश्‍वास आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com