ऑन स्क्रीन : पंचायत - ग्रामीण राजकारणाचा खाष्ट नमुना!

Panchyat Web Series
Panchyat Web Series

‘पंचायत’ ही वेब सीरिज अनेक अर्थानं वेगळी आहे. बहुतांश वेब सीरिज गुन्हेगारी विश्‍व, त्याची सेक्स आणि हिंसाचार किंवा थेट कॉर्पोरेट विश्‍वातील चढाओढ आणि ताणलेले संबंध, यांवर बेतलेल्या असताना पंचायत आपल्याला थेट एका खेड्यात घेऊन जाते. तेथील राजकारण, काही अत्यंत साधी-भोळी, तर काही अत्यंत बेरकी माणसं, त्याचं निवांत जगणं, याचा छानसा पट ही ‘ॲमेझॉन प्राइम’वरील सीरिज उभा करते. मोजकीच पात्रं आणि हलकं-फुलकं कथानक आणि जोडीला प्रत्येक भागाची वेगळी कथा, यामुळं ही मालिका कधीही आणि कुठपासूनही पाहता येते, हेही वैशिष्ट्यच.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पंचायत’ सुरू होते उत्तर प्रदेशातील छोट्या खेड्यात फुलोरी या गावात. अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) इंजिनिअरिंगची पदवी मिळवतो; मात्र मार्क कमी पडल्यानं त्याला चांगलं प्लेसमेंट मिळत नाही. त्याला फुलोरीमध्ये पंचायत सचिवाची २० हजार रुपयांची नोकरी तेवढी मिळते आणि दिल्लीत घरी बसून राहण्यापेक्षा तो फुलोरीत हजर होणं पसंत करतो. मित्र त्याला, ‘तू ‘स्वदेस’चा मोहन भार्गव होणार,’ असा ‘आशीर्वाद’ही देतात. आपली मोटारसायकल आणि सर्व सामान घेऊन फुलोरीत दाखल झालेला अभिषेक इथं कुठं येऊन पडलो, याच विवंचनेत असतो. गावची महिला प्रधान (सरपंच) मंजूदेवी (नीना गुप्ता) व तिचे अधिकार वापरणारा पती ब्रिजभूषण दुबे (रघुवीर यादव) यांचा गावावर वचक आहे. विकास (चंदन रॉय) हा अभिषेकचा असिस्टंट असतो व गावाची ओळख करून द्यायची जबाबदारी त्याच्यावर असते. अभिषेक रुजू झाल्यानंतर पंचायतीच्या ऑफिसमधील एका खोलीत राहू लागतो व धमाल गोष्टी घडायला सुरुवात होते. वेगवेगळ्या आठ कथांत आपल्याला गावातील अवलिये लोक आणि खाष्ट राजकारणाची ओळख होते.

‘भूता पेड’ या भागात गावात सोलर दिवे लावायला सुरुवात होते आणि अभिषेकला स्वतःच्या सोयीसाठी ऑफिसच्या बाहेर सोलर दिवा हवा असतो. मात्र, गावाबाहेर एक भूताचं झाड आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी त्याच्याबाहेर दिवा लावायचं ठरतं. या झाडावर भूत नाही, हे सिद्ध केल्यास अभिषेकला त्याच्या दारात दिवा मिळणार असतो. मग तो विकासच्या मदतीनं भूत नसल्याचं सिद्ध करतो. ‘चक्केवाली कुर्सी’ हा भाग गावातील राजकारण व लोकांच्या मानसिकतेचा जबरदस्त नमुना पेश करतो. पंचायती ऑफिसमधील कॉम्प्युटरच्या मॉनिटर चोरीचा भाग, २६ जानेवारीच्या झेंडावंदनातून सुरू झालेलं पुरुष विरुद्ध महिला पुढारी प्रकरण, अभिषेकचा उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न व त्यात आलेलं अपयश, अशा गोष्टींतून कथा पुढं सरकते. गावाच्या प्रेमात पडण्याचा एक धागा अभिषेकला शेवटच्या भागात सापडतो व पुढील भागाची तयारी करीत ही सीरिज ब्रेक घेते.

दिग्दर्शक दीपककुमार मिश्रा हलक्या-फुलक्या कथानकातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. पहिल्या भागाचा दुसऱ्याशी थेट संबंध नसला, तरी प्रत्येक भागानंतर उत्सुकता अधिक ताणली जाते. ‘द व्हायरल फिव्हर’ (टीव्हीएफ) या प्रॉडक्शन हाउसच्या या आधीच्या ‘कोटा फॅक्टरी’सारख्या मालिका वैशिष्ट्यपूर्ण होत्या व ही मालिकाही त्यात फिट बसते. जितेंद्रकुमारनं नाइलाजास्तव खेड्यात काम कराव्या लागणाऱ्या तरुणाची भूमिका छान उभी केली आहे. रघुवीर यादव सरपंचाच्या भूमिकेत धमाल करतात, तर नीना गुप्ता त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत शोभून दिसतात. चंदन रॉयचा विकास जमला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com