विषमतेची थरारगाथा (मंदार कुलकर्णी)

Mandar-Kulkarni
Mandar-Kulkarni

ऑस्करमध्ये यंदा ‘पॅरासाइट’ आणि ‘१९१७’ यांची विशेष चर्चा होती. ‘पॅरासाइट’नं सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कार मिळवत इतिहास घडवला, तर ‘१९१७’नंही पुरस्कारांची दाद मिळवली. अतिशय वेगळ्या वाटेवरच्या या दोन चित्रपटांवर एक झोत.

पॅरासाइट म्हणजे खरं तर बांडगूळ. दुसऱ्या झाडावर वाढणारी वेल. स्वतःचं अन्न तयार करता येत नाही म्हणून दुसऱ्याचं अन्न शोषणारी आणि ज्या झाडाचं अन्न शोषते त्या झाडाचा बळी घेणारी वेल. समाज हे जंगल म्हटलं तर त्यातलं कोणतं झाड मूळ आणि कोणतं बांडगूळ...? यंदा ‘ऑस्कर’पासून गोल्डन ग्लोबपर्यंत अनेक पुरस्कारांची दाद मिळवणारा ‘पॅरासाइट’ हा चित्रपट नेमका हाच प्रश्न विचारतो. आर्थिक दरीमुळं जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक प्रश्न निर्माण होत असताना, वाढत असताना हा चित्रपट हीच दरी आणखी खोल करून दाखवतो. श्रीमंतांनी तयार केलेल्या संपत्तीवर पोट भरणारे गरीब हे पॅरासाइट, की त्या गरिबांच्या श्रमांचा वापर करून संपत्ती आणि विलासी जगाची निर्मिती करणारे श्रीमंत हेच पॅरासाइट, असा प्रश्न तो विचारतो.

चित्रपटाचं रूप ब्लॅक ह्युमरचं आहे, थ्रिलरचं आहे हे तर खरंच; पण त्याच्याही पलीकडं जाणारं आणि फक्त दक्षिण कोरियातल्याच नागरिकांना नव्हे तर जगभरातल्या कोणत्याही नागरिकाला थेट सवाल करणारं, आत्मचिंतन करायला लावणारं विलक्षण भेदक भाष्य या चित्रपटात आहे आणि म्हणून तो उंचीचा आहे. 

‘पॅरासाइट’मध्ये सुरवातीला एक निमुळती खिडकी दिसते आणि तिच्यातून बाहेरच्या रस्त्याचं दृश्य दिसतं. तिथून हळूहळू कॅमेरा खाली जातो आणि या रस्त्याच्या खाली, झोपडीवजा बेसमेंटमध्ये राहणारं एक कुटुंब दिसतं. पूर्ण कुटुंब बेरोजगार असताना, त्यांना चिंता नेटची आणि व्हॉट्सअॅपची असल्याचं दिग्दर्शक दाखवतो आणि तिथूनच दिग्दर्शक, लेखकाचं एकेक भाष्य थेट विचार करायला भाग पाडतं. पती की-तेक, पत्नी चुंग सूक, त्यांचा मुलगा की-वूक, मुलगी की-जाँग तिथं राहतायत. की-वूकचा मित्र बाहेरच्या देशात शिकायला चाललाय आणि तो पार्क या श्रीमंत कुटुंबातल्या मुलीच्या ट्युशनचं काम या की-वूकला ऑफर करतो. एकेक करामती करत संपूर्ण किम कुटुंब कशा प्रकारे त्या श्रीमंत पार्क कुटुंबात शिरकाव करतं तो सगळा गमतीदार भाग दाखवत असताना दिग्दर्शक एक ट्विस्ट देतो आणि तिथून चित्रपटाचा वेग, थरार सगळंच वाढत जातं. 

कोरियातल्या चित्रपटांनी थ्रिलरचा एक खास जॉनर तयार केला आहे. अतिशय भन्नाट ट्विस्ट, रहस्य हे त्यांचं वैशिष्ट्य. मात्र, ‘पॅरासाइट’चं वैशिष्ट्य म्हणजे थ्रिलर प्रकारची मांडणी करत असताना तो तुम्हाला फक्त खुर्चीला खिळवून ठेवण्याचं काम नाही करत. तो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. चकचकीत, सेंटेड जगाच्या आत बटबटीत, कुबट वास येणारं काही तरी असतं हे आपण अनेकदा अनुभवतो. नेमकं तेच दिग्दर्शक बाँग जून-हो अनेक प्रतीकांतून दाखवतो. चित्रपटातल्या काही गोष्टी उलगडल्या, तर ते स्पॉयलरसारखं होईल; पण दोन जगांमधला विरोधाभास दाखवण्यासाठी ज्या काही जागा दिग्दर्शकानं घेतल्या आहेत त्यांच्याबद्दल हॅट्स ऑफ. दोन मितींना छेदणारी आणि या दोन्ही मितींना प्रश्न विचारणारी तिसरी मिती हे या चित्रपटाचं बलस्थान आहे.

किम कुटुंबाच्या घरातली बाहेरच्या जगाकडं बघण्यासाठीची छोटीशी निमुळती खिडकी आणि त्याच वेळी पार्क कुटुंबाच्या घरातली संपूर्ण काचेची भिंत; प्रचंड पावसामुळं किम कुटुंबाच्या घरात होणारा नाश आणि त्याच वेळी त्याच ‘सुंदर’ पावसानंतर पार्क कुटुंबात साजरा होणारा वाढदिवस, नाट्य वाढवण्यासाठी आणि भाष्य करण्यासाठीही तळघर या घटकाचा केलेला चपखल वापर या सगळ्या गोष्टी जबरदस्त आहेत. पावसाच्याच प्रसंगात दिग्दर्शकानं जो तिसरा ट्रॅक वापरला आहे तोही विलक्षण आहे. की-वूकच्या मित्रानं की-वूकला ‘स्कॉलर्स रॉक’ नावाचा छोटा दगड देणं, तो ज्याच्याकडं असतो त्याच्याकडं श्रीमंती येते असं सांगणं आणि त्या दगडाचा चित्रपटभर होणारा प्रवास ही दिग्दर्शकानं तयार केलेली खास जागा आहे. किम कुटुंब पार्क कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका वठवत असताना पार्क कुटुंबातल्या छोट्या मुलानं किम कुटुंबीयांच्या शरीराला येणाऱ्या वासातलं साधर्म्य ओळखणं आणि आर्थिक विषमता दाखवण्यासाठी त्याच वासाच्या प्रतीकाचा दिग्दर्शकानं वेगवेगळ्या दृश्यांत करून घेतलेला वापर फार उत्तम आहे. दिग्दर्शकानं जाणीवपूर्वक केला आहे की माहीत नाही; पण जिन्यांचा वापरही अर्थपूर्ण वाटला.  अर्थात सबटेक्स्ट्‌ इतकं जाणीवपूर्वक पेरत असताना पडद्यावर दिसणारी गोष्ट अर्थातच खिळून ठेवणारी आहेच. की-वूकनं बहिणीला आर्ट टीचर म्हणून घुसवणं, तिनं लहान मुलाच्या चित्रातली ‘मानसिकता’ दाखवून इंप्रेशन मारणं किंवा आधीच्या केअरटेकरला घालवून किम-वूकच्या आईला घुसवण्याचा भाग धमाल. बाकी, पार्क कुटुंब मात्र बथ्थड असणं हे जरा अती वाटतं. ‘लुळीपांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरिबी’ वगैरे आपण ऐकत आलोय तसंच उगीचंच साचेबद्ध. 

अनेक गोष्टी पार्क कुटुंबीयांच्या लक्षातही येत नाहीत हे थोडं ऑड वाटतंच...पण कदाचित दिग्दर्शकाला तेच नेमकं बोलायचं असेल का? स्वतःच्या किंचित गोष्टींचं अवडंबर करणाऱ्या या कुटुंबाला बाकी काही दिसतंच नाही, जाणवतच नाही हाही विरोधाभास त्याला अधोरेखित करायचा असेल तर? हा चित्रपट दोन-तीन ठिकाणी संपवता आला असता. जेव्हा ही विरोधाभास असलेली जगं एकमेकांसमोर येतात तेव्हा जे काही होतं तिथं संपवण्याची शक्यता होतीच; पण नंतर पुन्हा दिग्दर्शक त्या कथेतले धागे थोडे उलगडून दाखवतो आणि वर्तुळ पूर्ण करतो तो भाग महत्त्वाचा. विरोधाभास दाखवण्याची पुढची जागाही दिग्दर्शकानं सोडलेली नाही हे जास्त विलक्षण. हा चित्रपट ‘कॉमेडी थ्रिलर’ इतपत मर्यादित राहिला असता, तर कदाचित तो इतर चित्रपटांच्याच मालिकेतला झाला असता. मात्र, छोट्या छोट्या गोष्टींची प्रतीकं आणि विचार करायला लावणारी मांडणी यांच्यात या चित्रपटाचं वेगळेपण.

एकीकडं या चित्रपटाचं कौतुक करत असताना थोडं आणखीही बोलायला हवं. हा चित्रपट अतिशय उत्तम असला तरी अशा प्रकारचे, असं भाष्य करणारे अनेक चित्रपट किती तरी होते, आहेत. फॉरेन कॅटेगरीतल्या चित्रपटाला ऑस्कर मिळण्याइतका, इतिहास घडवण्याइतका हा चित्रपट इतका प्रचंड वेगळा आहे का हा थोडा डिबेटचा विषय नक्कीच आहे. भाष्य आणि चित्रभाषा यांचा विचार केला तर ‘जोकर’मध्येही किती तरी गोष्टी आहेतच की. ‘१९१७’सारखा विलक्षण प्रयोग एरवी ऑस्करच्या चौकटीत आवडला असताच की. त्यामुळे इतिहास तयार करण्याइतकं वेगळेपण या चित्रपटात आहे का, असाही प्रश्न काहींच्या मनात आला असेल तर त्यात वावगं नाही. या चित्रपटाचं टायमिंग सुरेख आहे आणि ऑस्करच्या परीक्षकांना चौकटीच्या बाहेर डोकावून बघावंसं वाटलं ही सकारात्मक बाब; किंबहुना ‘श्रीमंतीतल्या चकचकाटामागच्या अंधाराकडं बघा जरा’ असं या चित्रपटानं जे सांगितलंय ते अमेरिकी लोकांना थोडी टोचणी देणारं होतं का असाही प्रश्न विचारावासा वाटला. 

‘सबटायटल्सच्या एक इंची जागेच्या वर बघा,’ असं जून-हो यांनी ऑस्कर समारंभात सांगितलं ते फार महत्त्वाचं. सबटायटल्सकडं आपण लक्ष देत असताना बाकी पडद्यात दिसणारी चित्रभाषा खूप वेगळंही काही तरी सांगत असते हे अगदीच मान्य. जून-हो यांचं म्हणणं खरं तर फक्त चित्रपटांनाच नाही तर सगळीकडंच लागू होतं, नाही का? आपण अनेकदा समोरच्या बोलण्याकडंच लक्ष देत बसतो आणि ती व्यक्ती डोळ्यांतून जे सांगत असते, मनातून जे बोलू पाहत असते त्याच्याकडं दुर्लक्षच करतो. शब्दांच्या पलीकडचं खूप काही तरी असतंच. त्यामुळंच ‘पॅरासाइट’ बघताना शब्दांच्या पलीकडचे; किंबहुना कथेच्याही पलीकडचे अर्थ लक्षात आले आणि कोरियातल्या या चित्रपटानं भारतातल्या जाणिवांना हलवलं तर ते जास्त परिणामकारक ठरेल हे नक्कीच.

‘पॅरासाइट’ असं हलवतो. नक्कीच हलवतो. स्वतःच्या चित्रपटांपलीकडं एखाद्‌दुसरी कॅटेगरी सोडली तर फार न बघणाऱ्या ऑस्करवाल्यांना त्यानं किमान यंदापुरतं तरी हलवलं म्हणजेच बघा की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com