ऐकू आनंदे... : आवाजाचा विलक्षण वापर 

मंदार कुलकर्णी
Friday, 4 September 2020

आवाजाच्या क्षेत्रात आज वेगवेगळे प्रयोग तंत्रज्ञानाच्या मदतीनं सहज शक्य आहेत. मात्र, एक अतिशय विलक्षण, आगळावेगळा प्रयोग आकाशवाणीवर झाला होता. सुमारे तीस-चाळीस वर्षांपूर्वी. मुंबई आकाशवाणीनं अचानक हा खजिना समोर आणला आहे. गंमत म्हणजे ज्या काळात सीडी सोडाच, ऑडिओ कॅसेट्ससुद्धा दुर्मीळ गोष्ट होती, त्या काळात आकाशवाणीवर झालेला हा प्रयोग आला आहे यू-ट्यूबसारख्या आजच्या जनमाध्यमात.

आवाजाच्या क्षेत्रात आज वेगवेगळे प्रयोग तंत्रज्ञानाच्या मदतीनं सहज शक्य आहेत. मात्र, एक अतिशय विलक्षण, आगळावेगळा प्रयोग आकाशवाणीवर झाला होता. सुमारे तीस-चाळीस वर्षांपूर्वी. मुंबई आकाशवाणीनं अचानक हा खजिना समोर आणला आहे. गंमत म्हणजे ज्या काळात सीडी सोडाच, ऑडिओ कॅसेट्ससुद्धा दुर्मीळ गोष्ट होती, त्या काळात आकाशवाणीवर झालेला हा प्रयोग आला आहे यू-ट्यूबसारख्या आजच्या जनमाध्यमात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हा प्रयोग म्हणजे आहे एक नभोनाट्य. मात्र, हे नभोनाट्य अतिशय विशेष आहे. कारण त्यात तीन महिला व्यक्तिरेखा आहेत आणि या तिन्ही व्यक्तिरेखा एकाच कलाकारानं त्या सादर केल्या आहेत. येस्स. ज्या काळात तंत्रज्ञान अतिशय प्राथमिक स्तरावर होतं, त्या काळात अतिशय हरहुन्नरी दिग्गजांनी तयार केलेलं हे नभोनाट्य आहे. त्याचं नाव ‘आम्ही तिघी.’ तिन्ही व्यक्तिरेखांचा आवाज आहे करुणा देव यांचा. ते लिहिलं आहे पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी आणि त्याचं दिग्दर्शन केलं आहे बाळ कुरतडकर यांनी. आज इतक्या वर्षांनी ते ऐकताना अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी नाटक केवळ प्रयोगापुरतं उरणार नाही-तर त्याचा आशयही उच्च असेल याची काळजी घेतली आहे. बाळ कुरतडकर यांनी दिग्दर्शनात अनेक कल्पक गोष्टी केल्या आहेत आणि करुणा देव...कमाल! कुठंही मिमिक्री नाही, आवाजांमध्ये बदल नाही- केवळ आवाजाचे वेगळे स्तर आणि किंचित मॅनरिझम्सचा वापर करून त्यांनी हा मास्टरपीस तयार केला आहे. तिघी व्यक्तिरेखा अतिशय वेगळ्या भासतात आणि तरीही त्या हृदयापर्यंत पोचतात हे त्यांचं कौशल्य.

मिनीची आजी, मिनीची आई आणि मिनी अशा तीन पिढ्यांतल्या तीन जणी एका घरात राहत आहेत. आजीचे पती शंकरराव घर सोडून गेले आहेत, मिनीच्या आईच्या म्हणजे सुशीच्या पतीचं दहा वर्षांपूर्वी निधन झालं आहे आणि त्यांच्याच ऑफिसातल्या एकानं मागणी घातली आहे आणि मिनीला एक तरुण आवडला आहे. तीन पुरुषांचं या तिघींच्या आयुष्यातलं स्थानही एका नाजूक वळणावर पोचलं आहे. त्या तिघी कशा प्रकारे त्याला सामोऱ्या जातात त्याचं हे अठ्ठावीस मिनिटांचं विलक्षण प्रभावी नाट्य.

आजीच्या तोंडी असलेल्या ‘ग्रॅज्वेट’ शब्दापासून मिनीच्या वयामुळे ती म्हणत असलेल्या गाण्यापर्यंत अनेक गोष्टी करुणा देव यांनी अतिशय विचारपूर्वक केल्या आहेत. सुशीसाठी लावलेल्या खालच्या स्वरापासून मिनीच्या स्वच्छंदी स्वभावामुळे तिच्या थोड्या वरच्या पट्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट कमाल आहे. यू-ट्यूबवर आम्ही तिघी किंवा Amhi Tighee असं सर्च केलंत, की आकाशवाणी मुंबईच्या यू-ट्यूब चॅनेलवर हे नभोनाट्य दिसेल. आज तंत्रज्ञान अतिशय वेगवेगळी रूपं दाखवतंय, गोष्टींचीही ॲप्स जोरात चालताहेत; पण तंत्रज्ञान हाताशी नसलं, तरी आशय आणि कौशल्य या गोष्टी काय कमाल दाखवू शकतात, याचा प्रत्यय घेण्यासाठी हा प्रयोग ऐकायलाच हवा. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mandar kulkarni on Fantastic use of sound

Tags
टॉपिकस
Topic Tags: