esakal | ऐकू आनंदे... : जुन्याला दिलेला नव्याचा साज
sakal

बोलून बातमी शोधा

ऐकू आनंदे... : जुन्याला दिलेला नव्याचा साज

रेहमान इज मॅजिक. तो वेडा आहे, तो कमाल आहे. तो खूप प्रयोग करतो आणि खूप रिस्कही घेतो. म्हणूनच ए. आर. रेहमाननं संगीतकार ते ‘लिजंड’ असं स्थित्यंतर लीलया पार केलंय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून सोनू निगमपर्यंत कुणा गायकाबरोबर काम केलं नाही त्यानं? प्रयोगांवर तर पुस्तकच लिहावं लागेल. ‘रोझा’तल्या गाण्यांपासून ‘मॉम’मधल्या पार्श्वसंगीताच्या प्रयोगापर्यंत काय काय बोलणार?... तर, अशा या जीनिअस माणसानं केलेला एक प्रयोग फार विलक्षण आहे.

ऐकू आनंदे... : जुन्याला दिलेला नव्याचा साज

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी

रेहमान इज मॅजिक. तो वेडा आहे, तो कमाल आहे. तो खूप प्रयोग करतो आणि खूप रिस्कही घेतो. म्हणूनच ए. आर. रेहमाननं संगीतकार ते ‘लिजंड’ असं स्थित्यंतर लीलया पार केलंय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून सोनू निगमपर्यंत कुणा गायकाबरोबर काम केलं नाही त्यानं? प्रयोगांवर तर पुस्तकच लिहावं लागेल. ‘रोझा’तल्या गाण्यांपासून ‘मॉम’मधल्या पार्श्वसंगीताच्या प्रयोगापर्यंत काय काय बोलणार?... तर, अशा या जीनिअस माणसानं केलेला एक प्रयोग फार विलक्षण आहे. तंत्रज्ञान किती उत्तमरित्या वापरता येतं आणि नवं काही करण्यासाठी प्रत्येक वेळी जुनं डिस्कार्डच करावं लागतं असं नाही हेही दाखवून देणारा हा प्रयोग आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेहमाननं हा प्रयोग केला आहे ‘दिल्ली-६’ या चित्रपटात. रेहमान काही विशिष्ट दिग्दर्शकांबरोबर खुलतो. मणिरत्नम असो, किंवा आशुतोष गोवारीकर. असाच तो खुलतो ते राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याबरोबर. ‘रंग दे बसंती’ या त्यांच्या चित्रपटासाठी तरुणाईचं अफाट संगीत दिल्यानंतर ‘दिल्ली-६’ या चित्रपटासाठीही रेहमाननं खूप प्रयोग केले आहेत. ‘दिल गिरा दफतन’सारख्या गाण्यात वाद्यमेळ विशिष्ट अंतरानंतर घेण्याचा प्रयोग, किंवा ‘ससुराल गेंदा फूल’मध्ये एक खास वाद्य असे प्रयोग आहेत या चित्रपटात. मात्र, विलक्षण प्रयोग आहे तो ‘भोर भयी’ या गाण्यामध्ये.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गाण्यात श्रेष्ठ गायक बडे गुलाम अली खां यांचं किती तरी वर्षापूर्वीचं गायन रेहमाननं वापरलं आहे. हे बडे गुलाम अली खां हे अक्षरशः ‘लिजंड’ गायक. ‘मुघले आझम’साठी तब्बल २५ हजार रुपये मानधन मागणारे आणि ते मिळवणारेही जबरदस्त गायक. अशा जबरदस्त, श्रेष्ठ गायकाच्या गायनाचं फक्त ‘मास्टरिंग’ करून किंवा त्याच्यासाठी नुसता वेगळा वाद्यमेळ वापरून रेहमान थांबलेला नाही, तर नवीन गायिका आणि हे जुनं रेकॉर्डिंग यांच्यात त्यानं मस्तपैकी जुगलबंदी लावून दिली आहे. त्यामुळे ऐकताना खूप मजा येते.

ही जुगलबंदी गाण्यासाठी गायिकाही तितकीच तोडीची पाहिजे. रेहमाननं त्यासाठी निवड केली आहे ती श्रेया घोषालची. अर्थात फक्त तिचं गायनातलं प्रभुत्व एवढीच गोष्ट गृहीत धरून त्यांनी तिची निवड केलेली नाही, तर श्रेया चित्रपटात गाणार आहे ती सोनम कपूरसाठी. त्यामुळे तो विचार करूनही रेहमाननं हे कास्टिंग केलं आहे. श्रेयाही फार उत्तम गायली आहे.

बडे गुलाम अली खां यांनी ‘गुजरी तोडी’ रागातली ही चीज गायली आहे. ती विलक्षणच आहे. त्यातले काही तुकडे आणि श्रेयानं गायलेले नवीन गायलेले तुकडे असं एकत्र करून रेहमाननं ही जादू तयार केली आहे. शेवटी एका क्षणी दोघांचेही आवाज एकत्र ऐकू येतात तो क्षण तर फारच छान आहे. बडे गुलाम अली खां यांच्या आवाजाला एक किंचित ‘एको’ दिल्यामुळे दोन्ही गायनांतला काळाचा फरकही रेहमाननं सूक्ष्मपणे दाखवून दिला आहे. हे गाणं नक्की ऐका. यूट्युबवर नुसतं Bhor bhaye delhi-6 असं सर्च केलं, की हे गाणं मिळतं. गंमत म्हणजे बडे गुलाम अली खां यांची मूळ ‘भोर भयी’सुद्धा यूट्युबवर उपलब्ध आहे. सच्चा कानसेन ‘दिल्ली-६’मधल्या गाण्यानंतर तेसुद्धा शंभर टक्के ऐकणारच यात शंका नाही. अर्थात ते जास्त आवडलं, तर मात्र तुमचा दोष नाही. शेवटी लिजंड ते लिजंडच, बरोबर ना?

Edited By - Prashant Patil