#MokaleVha ‘सकाळ’सोबत बोलूया’ हेल्पलाइन

Sakal-Sobat-Boluya
Sakal-Sobat-Boluya

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने ‘we are in this together’ या मोहिमेअंतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या ‘सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसॲबिलिटीज’च्या सहकार्याने मानसिक ताणतणाव व्यवस्थापनासाठी ‘‘सकाळ’सोबत बोलूया’ ही चोवीस तास मोफत हेल्पलाइन तीन ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राथमिक टप्प्यात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात या हेल्पलाइनचा विस्तार करण्यात आला. ‘सकाळ’सोबत बोलूया’ ही हेल्पलाइन सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांत राज्यभरातून जवळपास तीन हजारांहून अधिक लोकांनी हेल्पलाइनवर वेगवेगळ्या मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त संवाद साधला. हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ फोन करणाऱ्या व्यक्तीचे ऐकून घेत त्यांचे समुपदेशन करतात. ‘we are in this together’ या मोहिमेच्या अनुषंगाने आणि ‘‘सकाळ’सोबत बोलूया’ या हेल्पलाइनशी निगडित विविध क्षेत्रांतील विविध वयोगटांतील लोकांसाठी दोन महिन्यांत ‘सकाळ सोशल फाउंडेशन’मार्फत मार्गदर्शनपर अनेक वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचा थोडक्यात आढावा...

1) मानसिक स्वास्थ्यासाठी कीर्तन 
‘श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा’ यांच्या सहकार्याने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांचा ‘मानसिक स्वास्थ्यासाठी कीर्तन कलेचा प्रभावी वापर’ याविषयी मार्गदर्शनपर वेबिनार आयोजित केला. याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत कीर्तन घेऊन जाताना करावयाची पूर्वतयारी, अनुरूप वाङ्मय निवडताना लागणारा दृष्टिकोन, अनुरूप चरित्र शोधताना लागणारा दृष्टिकोन व कीर्तन सादर करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, नोकरी/व्यवसायातील अनिश्चितता आणि मानसिक ताणतणाव, या प्रमुख बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

2) ज्येष्ठ नागरिकांसाठी वेबिनार
‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ज्येष्ठ नागरिकांची ‘फेस्कॉम’ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी व कीर्तनप्रेमींसाठी अध्यात्माच्या माध्यमातून ताणतणाव दूर करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी ‘निकोप उत्तरार्धाचे सूत्र’ या विषयावर कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांचा वेबिनार आयोजित करण्यात आला. याच्या माध्यमातून झपाट्याने बदलणाऱ्या विश्वात आपल्या मनाला सांभाळण्याचे सूत्र, शारीरिक आजार विसरून मानसिक तारुण्य मिळविण्याची गुरुकिल्ली, दुःखाला हसत सामोरे जाण्याचा दृष्टिकोन, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

3)  शिक्षकांसाठी वेबिनार 
‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ एनआयई’ आणि ‘के. एस. एज्युकेअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रभावी अध्यापन’ या विषयावर प्रयोगशील शिक्षक सागर राऊत यांचा मार्गदर्शनपर वेबिनार आयोजित करण्यात आला. या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ई-अध्यापनासाठी व तांत्रिक ज्ञानासाठीचे ॲप, ई-अध्यापनातील अडचणी व त्यावरील उपाय, व्हिडिओनिर्मितीचे तंत्र, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी आपले ई-अध्यापन कसे प्रभावी ठरू शकेल, याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

4) भावनिक आरोग्यावरील नियंत्रण 
मानसिक ताणतणावाची परिस्थिती कशी हाताळावी, ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, याविषयी आध्यात्मिक संस्था प्रजापिता ब्रह्मकुमारी शिवानी यांचा मार्गदर्शनपर वेबिनार आयोजित करण्यात आला. ब्रह्मकुमारी शिवानी यांनी सांगितले, ‘आपण भावनिक आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकलो, तर आपले मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी राहून प्रतिकारशक्तीही वाढेल.’

5) अ‍ॅनिमल असिस्टेड थेरेपी 
अ‍ॅनिमल असिस्टेड थेरेपी किंवा अ‍ॅनिमल असिस्टेड अ‍ॅक्टिव्हिटीज हे प्राण्यांचा वापर करून मानसिक समस्यांचा सामना करणाऱ्यांना आधार देण्याचे पर्यायी माध्यम आहे. याविषयी तान्या काने यांचा वेबिनार आयोजित करण्यात आला. ते म्हणाले, ‘आपण अशा जगात राहतो, जिथे आपल्याबद्दल लोकांचा पूर्वग्रह असतो. त्यामुळे आपला सतत न्यायनिवाडा केला जातो. प्राण्यांमध्ये पूर्वग्रह नसतो. प्राणी आपल्याला रक्तदाब स्थिर करण्यास मदत करू शकतात. ज्यांच्याकडे प्राणी आहेत ते अधिक सुखी आणि दीर्घकाळ जगतात, असे संशोधनही करण्यात आले आहे.’

6) संगीत, गायन आणि ताणतणाव
संगीत व गायनाच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव दूर करता येतो. या हेतूने शास्त्रीय गायक महेश काळे यांचा वेबिनार आयोजित करण्यात आला. ‘संगीतातून आनंदनिर्मिती होते, चांगले संगीत ऐकले तर मन प्रसन्न होते. संगीत एक भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे, संगीत व गायनातून आत्मविश्वास निर्माण होतो. विविध आजारांमध्ये संगीत ही एक उपचारपद्धती म्हणूनही वापरली जाते, त्यामुळे मानसिक ताणतणावातून मुक्त होण्यासाठी संगीत व गायन हे प्रभावी माध्यम आहे’, असे मार्गदर्शन महेश काळे यांनी केले.

7) जगण्याचे धैर्य
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘अनिश्चिततेच्या काळात जगण्याचे धैर्य’ या विषयावर महाराष्ट्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आला. सध्या चालू असलेल्या अनिश्चिततेच्या काळात विद्यार्थ्यांच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. यामध्ये शिक्षण, प्लेसमेंट/नोकरी शोधणे, याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन कसे करावे, चिंता कशी दूर करावी आणि विद्यार्थी स्वतःला कसे सिद्ध करू शकतात, याविषयी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com