बिग ब्रदर इज वॉचिंग...

बिग ब्रदर इज वॉचिंग...

कोणतीही लढाई मोदी- शहा सोपी मानत नाहीत, ते प्रचंड तयारीनिशी मैदानात उतरतात. वॉर्ड पातळीवर गल्लीत काय सुरू आहे हे पाहण्याची दोघांची सवय देशभरात कधी आदर, तर भीतीयुक्‍त चर्चेचा विषय असते. ‘मायक्रो’ आणि ‘मॅक्रो’ पातळीवर उतरून निवडणूक व्यवस्थापन करताना ते पक्षातील प्रत्येकाकडे लक्ष ठेवून असतात. या अतीव देखरेखीने महाराष्ट्रातील बड्या दिग्गज उमेदवारांचा बळी घेतला आहे.

२०१४मध्ये विरोधी बाकांवर असलेल्या भाजपचे दोन्ही सभागृहांतील नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे आज निवडणूक रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. प्रकाश महेता हे प्रमोद महाजनांच्या मुशीत तयार झालेले, मुंबईतील घाटकोपर या गुजरातीबहुल भागाचे सलग सहा वेळा आमदार. अमित शहांचे निकटवर्ती. पण आज तेही रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे एकेकाळच्या अनुशेषग्रस्त उपराजधानी नागपुरात निर्माण झालेल्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही सत्ताकेंद्रांच्या गळ्यातले ताईत. त्यांनी एका प्रकल्पात ‘शक्तिकेंद्रां’ना ऊर्जा देणाऱ्यांना अर्थपूर्ण भावनेने विरोध केला होता म्हणे. गडकरी- फडणवीस यांच्या एकत्रित शब्दाचाही फायदा झाला नाही अन्‌ अखेरच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर पत्नी ज्योतीला उमेदवारी द्यावी लागली. पक्षात जो सत्तेत असेल त्याची तळी राखणारे राज पुरोहितही सक्तीच्या निवृत्तीवर गेले आहेत. 

हा केवळ पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या धक्‍कातंत्राचा भाग नाही, तर त्यात सुसूत्रता आहे. ती ज्याला कळत नाही त्याला नव्या भाजपमध्ये स्थान नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. सत्ता अनेकविध प्रलोभने समवेत घेऊन येते. ती नाकारावीत असा मोदींचा आग्रह आहे असे म्हणतात. ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ हे त्यांचे गाजलेले वक्‍तव्य. ते प्रत्यक्षात येते आहे की नाही याची काळजी शहा वाहतात. पक्षाला मोठे करण्यासाठी जी मंडळी खपतात, त्यांना या अटीमधून काहीशी सूट मिळतेही. पण पक्षासाठी सरसावून काम न करणाऱ्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले की तो नजरेच्या टप्प्यात येतो. पक्षापेक्षा स्वत:ला मोठे मानणाऱ्या नेत्यांची काही खैर नसते. खडसे हे भाजपचे महत्त्वाचे नेते. फडणवीस यांना डावलून त्यांना संधी देण्याची पक्षनेतृत्वाला गरज वाटली नाही. हे वास्तव स्वीकारण्याऐवजी खडसे श्रेष्ठींच्या इच्छेला आव्हान देत राहिले अन्‌ तिथेच गडबड झाली. अर्थात, खडसे यांच्या मुक्‍ताईनगरावरील पकडीची संपूर्ण कल्पना भाजपला आहेच. ते बंड करतील तर भाजपची जागा एकाने कमी होईल याची जाणीव असल्यानेच भाजपने त्यांना उमेदवारनिवडीचे स्वातंत्र्य दिले. आपले वर्चस्व राखण्यासाठी खडसेंनी योग्य तो बोध घेत नमते घेतले अन्‌ मुलगी रोहिणीला पुढे केले. एकेक जागा महत्त्वाची असल्याने श्रेष्ठींनी खडसेंना सांभाळून घेतले. 

 विनोद तावडे हे तर ‘परिवारा’ने योजनापूर्वक राजकारणात आणलेले कार्यकर्ते. उमद्या स्वभावाच्या तावडेंना उद्दामपणाने गाठल्याच्या तक्रारी दिल्लीदरबारात तीन-चार वर्षांपासून पोहोचू लागल्या होत्या, असे म्हणतात. माध्यमांमधील मैत्र, मराठापणाचे बळ ही शक्तिस्थळेही तावडेंची उमेदवारी वाचवू शकली नाहीत. राज्यातील भाजपचीच नव्हे, तर ‘परिवारा’चीही राजकीय गरज सांभाळत ती सावरण्याचे काम तावडेंनी एकेकाळी केलेले. तावडे महत्त्वाचे होतेच, पण नंतरच्या तक्रारींची ‘मोटाभाईं’च्या वहीत नोंद झाली, अन्‌ संधी हुकली. मुंबई महापालिकेत सहकारी शिवसेनेशी अटीतटीची लढाई झाली, तेव्हा तावडे ताकदीने मैदानात उतरले होते काय, खरेच त्यांची ताकद आहे काय, असा प्रश्‍न केला गेला होताच. उमेदवारी नाकारल्यावर तावडे यांनी आत्मपरीक्षणाची भाषा वापरली आहे, ती श्रेष्ठींना भावते काय ते येणारा काळ सांगेल.

 प्रकाश महेता यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत भ्रष्टाचाराचा अवलंब केल्याच्या तक्रारी आल्या. त्या लोकपालांनी ग्राह्य मानल्या. त्यांना मंत्रिमंडळातून डावलले, तेव्हाच उमेदवारीही मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले होते. आज त्यांचा शिष्योत्तम पराग शहा अर्ज भरण्यापूर्वी आशीर्वादासाठी गेला, तेव्हा त्याच्या गाडीवर हल्ला झाला. ‘पार्टी विथ डिफरन्स’ची अशी गत होणे शहांना आवडणारे नाही. या मोहऱ्यांबरोबरच मेधा कुलकर्णींसारख्या सजग लोकप्रतिनिधीचीही संधी हुकली. दिल्लीच्या भाषेत कितीतरी रुपये- खुर्दे येतात, गळतात. पक्षकार्य करताना स्वत:ची प्रतिमा सतत समोर न आणणे, पक्षाची ‘लाइन’ आपली मानत पुढे नेणे, सार्वजनिक जीवनात शुचिता पाळणे हे दिल्लीच्या आग्रहाचे मुद्दे आहेत. तसे होतेय काय याकडे लक्ष देण्याचा अधिकार श्रेष्ठी वापरतात. मधू देवळेकरांसारखा प्रतिभावान नेता पूर्वीच्या वातावरणातही पक्षापुढे टिकला नव्हता. उत्तर प्रदेशात रामजन्मभूमीचे आंदोलन चालवणारे कल्याणसिंहही नंतर बाहेर फेकले गेले होतेच. 

भाजपच्या नव्या अवतारात तर कोण काय करतो, कसे वागतो याकडे दोन्ही सत्ताकेंद्रांचे लक्ष आहे. आगळिकी केल्या तरी पक्षाची वाढ करत असाल, तर काणाडोळा केला जाईलही, नाही तर जे तावडे-महेतांचे झाले तेच इतरांचेही होईल. शीतयुद्धाच्या काळात अनेक देशांत ‘बिग ब्रदर इज वॉचिंग’ अशी परिस्थिती होती. सध्या भाजपमध्ये छोट्या-मोठ्या नेत्यांची स्थितीदेखील अशीच झाली आहे. सत्ताधाऱ्यांची यंत्रणा तशीही मोठीच, शिवाय शिस्तबद्ध पक्षसंघटनेची त्याला जोड आहे. प्रचंड जनसमर्थन लाभलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वत्र बघत आहेत. छोट्या-मोठ्या नेत्यांचे त्यामुळे काय होईल ते होवो, त्यांची ही नजर निरलस कार्यकर्त्यांचे, समस्याग्रस्त देशाचे भले करो, एवढीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com