विखुरलेले चवदार 

नेहा मुळे 
शुक्रवार, 7 जून 2019

विकएंडसाठी हॉटेल शोधताय? मग हा लेख नक्की वाचा...

वीकेंड हॉटेल
ढोकळ्याच्या छान जाळीदार एकसारख्या मांडलेल्या वड्या, त्याच्यावर खोबरं-कोथिंबीर पसरून एका डिशमधून सर्व्ह करणं...ही झाली पारंपरिक पद्धत. बदलत्या ट्रेंडमध्ये पदार्थाला सुबकता, साचेबद्धपणा देणं अपेक्षित नाही. तिथं तो पदार्थ पसरलेला असेल, मात्र कलात्मकरीत्या. बदलत्या ट्रेंडमधली ही फूड स्टाइल आहे ‘डिकन्स्ट्रक्‍टेड फूड’. इथं उदाहरणादाखल ढोकळ्याचं नाव घेतलं आहे. प्रत्यक्षात असे अनेक पदार्थ डिकन्स्ट्रक्‍टेड करून सर्व्ह केले जातात. यामध्ये अगदी वडापावपासून चीज केकपर्यंत काहीही डिकन्स्ट्रक्‍टेड म्हणून सादर होतं. 

डिकन्स्ट्रक्‍टेड फूड ही संकल्पना मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया आणि अशाच आंतरराष्ट्रीय कुकरी शोमधून चर्चेत आली, अगदी सामान्य लोकांपर्यंतही पोचली. डिकन्स्ट्रक्‍टेड या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट तोडून त्याचे वेगवेगळे भाग करणे. हे करताना त्याचा मूळ अर्थ बदलता कामा नये. एखाद्या पदार्थाबाबत विचार करताना आपण त्या पदार्थाचे घटक वेगळे करणं, असं म्हणू शकतो आणि याचाच अर्थ त्याची चव मूळ पदार्थाचीच असेल. हा पदार्थ सर्व्ह करताना वेगवेगळ्या भागात केला, तरी खाताना आपण तो एकत्र करूनच खातो. म्हणूनच डिकन्स्ट्रक्‍टेड पदार्थ तयार करताना त्या पदार्थातील महत्त्वाच्या घटकाला प्राधान्य देणं आवश्‍यक आहे. कारण त्या घटकाची चवच त्या पदार्थाची ओळख असते. 

डिकन्स्ट्रक्‍टेड फूडमध्ये सादरीकरणाला महत्त्व असतंच. याचं कारण ते घटक विखुरलेले दिसले, तरी अस्ताव्यस्त दिसणार नाहीत, एकत्र करताना अडचणीचे ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पदार्थाची मूळ चवच चाखता येणं, मात्र त्याची खाण्याची पद्धत वेगळी असा हा ‘डिकन्स्ट्रक्‍टेड’ प्रकार आहे, असं आपण थोडक्‍यात म्हणू शकू. कधी तरी दोन वेगवेगळे घटक एकत्र करून नवी चव आपण तयार करू शकतो. यातून एखाद्या पदार्थाची मूळ चव अधिक चांगली बनण्यासही मदत होते. तसा चव बदलण्याचा धोकाही असतो. 

डिकन्स्ट्रक्‍टेड फूड हा प्रकार लोकांच्या नावीन्याची आवड पूर्ण करण्याच्या मागणीतून जन्मला आहे. तोच पदार्थ लोकांना आवडीनं खायला लावण्यासाठी आता तो घटकांच्या वेगळेपणातून सर्व्ह केला जातो. 

नवीन म्हणून हा प्रकार लोक स्वीकारत असले, तरी दुसरीकडं अशा पदार्थांच्या सादरीकरणावर टीकाही होत आहे. नावीन्यतेच्या नादात पदार्थ पूर्ण तयार करण्याची कृती टाळली जाते, हा आळशीपणाचाच प्रकार म्हणावा लागंल, अशी टीका डिकन्स्ट्रक्‍टेड फूडबाबत केली जाते. नवीन प्रकार म्हणून अशा पद्धतीचे पदार्थ खाऊन पाहण्यास हरकत नाही. पुण्यात काही विशिष्ट ठिकाणी अशा पद्धतीने फूड सर्व्ह केले जाते. त्यातील काही रेस्टॉरंट आणि तिथल्या डिकन्स्ट्रक्‍टेड पदार्थांची माहिती अशी ः 

स्पाइस क्‍लब  (विद्यापीठ रस्ता)
डिकन्स्ट्रक्‍टेड ढोकळा आणि वडापाव

के फॅक्‍टरी (बाणेर)   
डिकन्स्ट्रक्‍टेड  फिलाडेल्फिया चीज केक

टॉइट (कल्याणीनगर) 
डिकन्स्ट्रक्‍टेड स्कॉच एग्ज

ओरायन किचन (बाणेर) 
डिकन्स्ट्रक्‍टेड 
शाही तुकडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article by Neha Mulay