खाऊन बघाच... खाऊस्वे! 

खाऊन बघाच... खाऊस्वे! 

वीकएंड हॉटेल
कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती आठवून पहा, त्या प्रांताचे अनेक पदार्थ नजरेसमोर येतील. जसं चायनीज म्हटलं, की किती तरी डिशची नावं समोर येतात. अगदी इटालियन, मेक्‍सिकन, थाय अशा विविध देशांच्या डिशबाबतही असंच जाणवेल. याला अपवाद आहे तो म्यानमारचा. इटालियन, मेक्‍सिकन, थाय डिश जेवढ्या आपल्याला परिचित आहेत, तितक्‍या म्यानमारच्या डिश आपल्या परिचयाच्या नाहीत. या देशाची ओळख म्हणून एकमेव डिश समोर येते ती बर्मीज खाऊस्वे. 

अलीकडे ही डिश विशेष प्रसिद्ध होत आहे. अगदी पुणेकरांनाही ही डिश ओळखीची झाली आहे. 

या डिशचं एका शब्दात वर्णन करायचं झालं, तर साधी डिश असं आपण म्हणू शकतो. मलेशियन किंवा सिंगापुरी लक्‍सा सूपशी साम्य असणारी ही डिश आहे, असंही म्हणता येईल. बर्मीज खाऊस्वेमध्ये प्रमुख घटक असतात ते कोकनट सूप किंवा कोकनट करी, नूडल्स आणि विविध भाज्या. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्हीही प्रकार उपलब्ध असतात. याचं वेगळेपण सांगायचं झालं तर हा पदार्थ सर्व्ह करताना मूळ घटक असतातच आणि इतर उपघटक वेगळे करून बरोबर दिले जातात. आपण आपल्या आवडीनुसार त्याचे प्रमाण निवडून डिशची आवडती चव बनवू शकतो. 

या घटकांमध्ये, तळलेला लसूण, तळलेले कांदे, कोथिंबीर, लिंबू, चिली फ्लेक्‍स, हिरव्या मिरचीचे तुकडे, कांद्याची पात, लिंबू, तळलेले नूडल्स, शेंगदाणे इत्यादीचा समावेश असतो. 

इतक्‍या विविध घटकांमुळे या डिशची चव अनोखी बनते. थोडी गोड, थोडी आंबट, थोडी तिखट असं विविध चवींचं मिश्रण या एकाच पदार्थातून मिळतं. या वेगळ्या चवीच्या डिशचा आस्वाद पुण्यात कुठे घेता येईल, हे बघायचं झालं तर काही नावं सांगता येतील. 

कार्गो (कोरेगाव पार्क) - चवीचे पदार्थ खायला कार्गोमध्ये जायलाचं हवं असं म्हटलं जातं. इतर डिशेस प्रमाणेच इथल्या खाऊस्वेची चव अधिक छान आहे. इतर रेस्टॉरंटमध्ये खाऊस्वसाठीचे सर्व घटक वेगवेगळे दिले जातात आणि आपल्याला ते एकत्र करून खायचे असतात. यात आपल्याकडून चव बिघडण्याची शक्‍यता असते. ही शक्‍यता कार्गोमध्ये नसते, कारण तिथे सर्व घटक एकत्र करून सर्व्ह केले जातात. त्यामुळे हमखास चांगल्या चवीची खात्री राहते. 

एफिंगुट ब्रुवर्क्‍स (कोरेगाव पार्क, खराडी, बाणेर) - खाऊस्वेमधला मूळ घटक असणारी कोकोनट करी अधिक क्रिमी असणं हे इथल्या खाऊस्वेचं वैशिष्ट्यं. कोकोनट करीबरोबरचे बर्न्ट गार्लिक नूडल्सही चवदार असतात. 

एफ. सी. रोड सोशल (एफ. सी. रोड) ः इथल्या खाऊस्वेची चव चांगली असतेच पण आपण आकर्षित होतो ते इथल्या सर्व्हिंगसाठी. एका किटलीत कोकोनट करी असते आणि इतर घटक छोट्या डिशमध्ये बाजूने आकर्षक पद्धतीने मांडलेले इतर घटक अशी इथली सर्व्हिंग स्टाइल आहे. आपल्याला हव्या त्या प्रमाणात घटक मिसळून खाऊस्वेची आनंद घेता येतो. 

बॅरोमीटर (कोथरूड) - चवदार पदार्थांसाठी कोथरूडकरांना आवडणारं हे आवडीचं ठिकाणं आहे. इतर डिशेशप्रमाणं खाऊस्वेसाठीही इथं जायला हवं. एका डिशमध्ये नूडल्स, करी आणि बाजूने आकर्षक पद्धतीने मांडलेले घटक असं आकर्षक खाऊस्वे इथं समोर येतं. 

एशियन बॉक्‍स (बाणेर) - दाट आणि एकजीव असलेली कोकोनट करी हे इथलं खाऊस्वेचं वेगळेपण. यामुळे त्याला छानशी चव मिळते. 
या ठिकाणांबरोबर फ्लाइंग डक (बालेवाडी), मामा गोटो (सेनापती बापट रस्ता) इथलंही खाऊस्वे आकर्षक आणि चवीचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com