कर्नाटकात राजकीय अस्वस्थता

Karnataka
Karnataka

गेल्या काही दिवसांत कर्नाटक ढवळून निघाले आहे. माजी मंत्री होरट्टी बरळले आणि भीमाशंकर वाघमारेने म. ए. समितीच्या नेत्यांविरोधात अश्‍लाघ्य भाषा वापरली. तर दुसरीकडे, उत्तर कर्नाटक स्वतंत्र करण्याची मागणी करत स्वतंत्र ध्वज फडकावण्यात आला. त्याच वेळी विशाल गोमंतकची मागणी करत सह्यांची मोहीमही सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे महाआघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्‍नी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कर्नाटकातील येडियुरप्पा सरकार सैरभैर झाले. त्यातून टीकाटिप्पणी वाढून तणाव वाढत आहे. हा तणाव वाढत असतानाच कर्नाटकातील अंतर्गत प्रश्‍नाने उचल खाल्ली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. आता पुन्हा एकदा त्या मागणीने उचल खाल्ली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कर्नाटकची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडीजवळ उत्तर कर्नाटक राज्याचा स्वतंत्र ध्वज फडकावला. भारतात कोणत्याही राज्याला स्वतंत्र ध्वज वापरता येत नाही; मात्र असे असतानाही कर्नाटकात अनधिकृतपणे लाल-पिवळा ध्वज राज्याचा मानला जातो. आता स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी करणाऱ्यांनीही पिवळा-हिरवा-केशरी असे तीन रंग असलेला ध्वज फडकवून आपला इरादा स्पष्ट केला आहे.

एकीकडे या दोन बाबींमुळे राज्यात अस्वस्थता असतानाच गोमंतकची मागणीही जोर धरू लागली आहे. कर्नाटक तिन्ही बाजूंनी अस्वस्थ आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण दक्षिण कर्नाटकच्या तुलनेत उत्तर कर्नाटकचा न झालेला विकास. या भागातील नागरिक, राज्यकर्त्यांना आपण विकासाच्या बाबतीत मागास असल्याची भावना सातत्याने टोचत असते. वस्तुतः भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली. भारत स्वतंत्र होताना देशातील पाचशेवर राजे-महाराजेही स्वतंत्र झाले. त्यानुसार काही राजे भारतात तर काही पाकिस्तानात सामील झाले. म्हैसूरचे राजे भारतात सामील झाले आणि म्हैसूर राज्य अस्तित्वात आले.

‘एक भाषा एक राज्य’ रचनेवेळी म्हैसूर राज्यामध्ये मद्रास प्रांतातील कन्नडभाषक भाग व हैदराबाद संस्थानमधील कन्नडभाषक भाग जोडून १९५६ ला हे राज्य अस्तित्वात आले. त्याचे ‘कर्नाटक’ नामकरण करण्यात आले. कर्नाटकची लोकसंख्या सुमारे साडेसहा कोटी आहे, तर राज्यात ३० जिल्हे अस्तित्वात आहेत. आता यातून स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य करावे, अशी मागणी आहे. ही मागणी करणाऱ्या भागातील लोकसंख्या सुमारे अडीच कोटी इतकी आहे. हा भाग विकासापासून मागास राहिला आहे. येथील सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक विकास झालेला नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे बंगळूर, म्हैसूर आदी दक्षिणेतील शहरे विकासाच्या वाटेवर वेगाने वाटचाल करत असताना उत्तर कर्नाटक अद्यापही मूलभूत सुविधांसाठीच झगडतो आहे, असा थेट आरोप केला जात आहे. वैजनाथ पाटील यांनीही त्यासाठी आंदोलन उभे केले होते; मात्र प्रत्येक सरकारने काहीबाही आश्‍वासने देऊन वेळ मारून नेली आहे. या मागणीला दक्षिण आणि उत्तर कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कन्नड भाषेचाही संबंध आहे. दोन्ही ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या कन्नडमध्ये फरक असल्याचे सांगितले जाते. यासह अनेक प्रश्‍न उपस्थित करून स्वतंत्र कर्नाटक राज्याची मागणी रेटली जात आहे, परिणामी राज्यात अस्वस्थता आहे. यादरम्यान, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यास कर्नाटक एसआयटीने झारखंडमध्ये जावून पकडले. या घटनेने राजकीय अस्वस्थेत भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com