शिवरायांचं आरमार (प्रशांत सरुडकर)

Prashant-Sarudkar
Prashant-Sarudkar

छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी अनेक गोष्टींतून जाणवते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणलं होतं. शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी (ता. १९ फेब्रुवारी) साजरी होत आहे. त्यानिमित्त शिवरायांनी आरमारासंदर्भात केलेला विचार; सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आदी जलदुर्गांमधलं वेगळेपण, मराठ्यांच्या बोटींची वैशिष्ट्यं आदी गोष्टींचा वेध.

'ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांगच आहे,’ हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे शिवाजी महाराजांनी जाणलं होतं. इसवीसन १६५७ च्या सुमारास महाराज कोकणात उतरले, त्यावेळी त्यांनी समुद्र जवळून पाहिला. त्या वेळच्या परकीय सत्तांमध्ये मोघल, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे प्रामुख्यानं होते. यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता. या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. मराठ्यांच्या व्यापाराला हा मोठा अडथळा होता. शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार केला. सुरुवातीला खोल समुद्रातल्या दळणवळणापेक्षा किनाऱ्याचं संरक्षण व्हावे, या उद्देशानं वीस गुराब त्यांनी बांधायला सुरूवात केली.

कल्याण, भिवंडी, पेण या ठिकाणी हे काम सुरू झालं. ही बांधणी दर्जेदार व्हावी, या उद्देशानं हे काम पोर्तुगीज खलाशी लुई व्हेगास आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हेगास यांच्यावर सोपवण्यात आलं. त्यांच्यासोबत काही मराठी कारागिर हे काम करत होते. व्हेगास यांच्याकडून आपल्या कारागिरांना नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं, हा यापाठीमागचा उद्देश होता. 

मराठ्यांच्या या छोट्याशा बोटी इंग्रजांनी पाहिल्या. मराठ्याच्या या बोटी अतिशय साध्या आहेत, आपली एक युद्धनौका अशा अनेक बोटींवर मात करील, असं इंग्रजांना वाटलं. पुढं मराठी नौकांची संख्या वाढत गेली. या नौकाबांधणी कारखान्यांत विविध प्रकारची जहाजं बांधली जात असत. यामध्ये गुराब म्हणजे तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज, तरांडी (या प्रकारच्या नावेचा उपयोग प्रामुख्यानं माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठी केला जात असे), तारवे आणि गलबतं ही जलद चालणारी जहाजं होती, शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाजं होती. यातून मालवाहतूक केली जात असे. ही जहाजबांधणी करताना महाराज अतिशय दक्ष होते. नावेसाठी लागणारं लाकूड रयतेला त्रास न होता उपलब्ध झालं पाहिजे, असं त्यांना वाटत असे. आज्ञापत्रात उल्लेख आहे : ‘आरमारास तख्तं, सोट, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते, ते आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे चे अनुकूल पडेल, ते हुजुर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहीत जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची; परंतु त्यास हात लाऊ न द्यावा. काये म्हणोन की, ही झाडे वर्षा दो वर्षानी होतात यैसे नाही.

रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली, ती झाडे तोडिलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये? या वृक्षांच्या अभावे हानीहि होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित येखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे न्यावे.’ जनहिताचा राज्यकारभार करण्याची महाराजांची दृष्टीच या आज्ञापत्रातून आपल्या लक्षात येते. या बांधणीत कमी पडलेली आंबा आणि फणसाची लाकडं महाराजांनी कर्नाटकातून मिळवली. सुरुवातीच्या काळात नौका तयार झाल्यावर त्या खोल समुद्रात जाण्यासाठी पोर्तुगीजांमुळे अडचण होत होती. कारण खाडीच्या दोन्ही बाजूला पोर्तुगीजांच्या ताब्यातले प्रदेश होते. रात्रीच्या वेळी अतिशय सावधपणे या बोटी समुद्रामध्ये आल्या. शिवाजी महाराजांचे आरमार पश्चिम समुद्रातून विहार करू लागले. पुढं जहाजांची संख्या चारशेपर्यंत वाढत गेली. महाराजांनी आरमाराचं नियोजनही अत्यंत सुव्यवस्थितपणे केलेलं होतं. दोनशे जहाजांचा ताफा करून त्यावरती सुभा, दौलतखान, मायनाक भंडारी, वेंटगी सारंगी म्हणजेच दर्यासारंग, इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले आणि समुद्रावर दरारा निर्माण केला. पुढं खोल समुद्रात जाणाऱ्या नौकाही बांधण्यात आल्या. इराण, बसरा, मक्का या ठिकाणाशी व्यापारास सुरुवात झाली. शिवरायांच्या आरमारात सुमारे पाच हजार सैनिक होते. 

छ्त्रपती शिवरायांनी सन १६६४ मध्ये सुरत लुटली. स्वराज्याला उपद्रव देऊन कोणी धन साठवून ठेवलं असेल, तर ते परत मिळवावं हा राज्यकारभाराचा एक नियमच होता. शिवराय सुरतेत गेले. रीतसर खंडणी मागण्यात आली; परंतु ती द्यायला नकार मिळाल्यावर मराठ्यांनी सुरत लुटली. मोठं धन हाताशी आलं. या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला. समुद्रातलं दळणवळण सोयीचं व्हावं आणि गोव्याच्या पोर्तुगिजांवर धाक बसावा हा यापाठीमागचा उद्देश होता. किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवण्यात आली. बांधकामाला सुरुवात झाली; पण काही काळातच स्वराज्यावर मिर्झाराजे जयसिंग यांचं वादळ आलं, पुढं पुरंदरचा तह झाला. महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जावं लागलं. तिथं ते अडकून पडले, या काळात सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम हिरोजी यांनी स्वतःचे दागदागिने गहाण टाकून पूर्ण केलं. बळकट असा किल्ला निर्माण झाला. 

आरमारासाठी बळकट जलदुर्गाची निर्मिती झाली पाहिजे, असं महाराजांना वाटत असे, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या जलदुर्गांच्या बांधकामातून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. मुरुड-जंजिऱ्याचा किल्ला हा सिद्धींच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याजवळ पद्मदुर्ग (कांसा) हा किल्ला बांधला. पद्मदुर्ग वसवून दुसरी राजापुरी उभी केली. सन १६७२ मध्ये मुंबईच्या जवळ खांदेरी बंदरावर शिवरायांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. मुंबईला आणि पर्यायानं इंग्रजांना धाक बसावा हा यापाठीमागचा उद्देश होता. उत्तर कोकणातलं दळणवळणही यामुळं सुलभ होणार होते. सुरुवातीला दौलतखान आणि नंतर मायनाक भंडारी यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं. कल्याण आणि चौल इथल्या खजिन्यातून एक लक्ष होन या किल्ल्यासाठी महाराजांनी उभे केले.

इंग्रजांना ही बातमी समजताच त्यांच्यात खळबळ माजली. मुंबईचा गव्हर्नर जेराल्ड आँन्जिअर यानं डॅनियल ह्यूज यास तिथं पाठवलं, खडकाजवळ उभा राहून तो ‘हे बेट आमचं आहे, तुम्ही इथून निघून जा’ असं मराठ्यांना उद्देशून बोलू लागला. यावरती मायनाक म्हणाले : ‘‘हे बेट आमचंच आहे. आम्ही इथून जाणार नाही, मी माझ्या राजांचा हुकूम मानतो.’’ मराठे ऐकत नाहीत हे पाहून लढाई करून इथून मराठ्यांना हाकलून लावावं, या उद्देशानं इंग्रजांचं नाविक दल ‘हंटर’ आणि ‘रिव्हेंज’ ही लढाऊ जहाजं घेऊन त्या ठिकाणी आले. यामध्ये कॅप्टन रिचर्ड केग्वीन, कॅप्टन फ्रान्सिस थाँर्प, कॅप्टन विलियन मिंचीन, सार्जंट नॅश, कॅप्टन माँलिव्हिएर हे नामवंत इंग्रज अधिकारी होते. लढाईला सुरुवात झाली, उथळ पाण्यामुळं इंग्रजांच्या बोटी चालेनात. उलट मराठी आरमार अतिशय चपळाईनं इंग्रजांवरती हल्ले करू लागलं. रिचर्ड केग्विन म्हणाला : ‘‘मराठ्यांच्या छोट्या बोटी आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात. अशा छोट्या बोटी आपल्या आरमारात असत्या, तर किती बरं झालं असतं.’’ सुरुवातीला मराठ्याच्या बोटींना नावं ठेवणारे इंग्रज या बोटींचं कौतुक करू लागले. ब्रिटिश अभिमानाने म्हणत : ‘Britannia Rule the waves, Britons never will be slaves.’ मात्र, असे इंग्रज या ठिकाणी हरत गेले. 

कुलाबा किल्ल्याचं बांधकाम इसवीसन १६७८ मध्ये सुरू झालं. या किल्ल्याचं बांधकाम करताना दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधल्या आहेत. या बांधकामात चुन्याचा मसाला वापरला गेला नाही- म्हणजेच दरजा भरलेल्या नाहीत. याचं कारण, समुद्राच्या लाटा भिंतीवरती आदळल्या, की त्याचं पाणी दोन दगडाच्या फटीतून आतमध्ये जावं, पाण्याच्या प्रवाहाला विरोध कमी प्रमाणात व्हावा आणि बांधकाम दीर्घायुषी व्हावं.

पद्मदुर्गच्या बांधकामातसुद्धा वेगळ्याच प्रकारचं तंत्र वापरलं गेलं आहे. या किल्ल्याच्या भिंतीवर जिथं लाटा आदळतात, तिथं ७-८ सेंटिमीटर दगड झिजलेले आहेत; पण यामध्ये वापरलेला चुन्याचा मसाला मात्र झिजला नाही. दगडापेक्षा भक्कम ताकद या चुन्यामध्ये प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली दिसते. खांदेरी किल्ला भक्कम व्हावा आणि शत्रूला सहजासहजी किल्ल्याजवळ जाता येऊ नये, या उद्देशानं महाराजांनी या किल्ल्याच्याभोवती वेगवेगळ्या आकाराचे दगड टाकले. या टाकलेल्या दगडावर कालवे वाढावेत म्हणजे कडा धारदार होतील आणि पाण्यातून चालत जाणं अवघड होऊन जाईल, हा उद्देश. विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळत तर पाण्यात प्रचंड मोठी भिंत महाराजांनी बांधली. तिची लांबी सुमारे पाऊण किलोमीटर आहे, तर रुंदी तीन मीटर आहे. किनाऱ्यापासून खोल समुद्रात तिचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. शत्रूच्या बोटी जर विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आल्या, तर या भिंतीवर आपटून त्या फुटाव्यात, असा उद्देश. मराठी बोटींचा तळ खोल नसल्यानं या भिंतीचा धोका त्यांना नव्हता. पुढं विजयदुर्गवर इंग्रजांचा हल्ला झाला, त्यावेळी इंग्रजांच्या बोटी या भिंतीवरती आदळून फुटल्या, असं दिसून येतं. 

शिवरायांनी स्वतंत्र्य आरमार उभारून स्वराज्याला बळकटी आणली. समुद्रमोहिमा काढल्या. जेधे शकावलीत उल्लेख आहे : ‘शके १५८६ मध्ये माघ मासी राजश्री जाहाजात बैसोन बसनूरास गेले, ते शहर मारून आले.’ गोव्यातल्या कदंबांच्या राज्यानंतर सुमारे तीनशे वर्षं कोणत्याही एतद्देशीय सत्तेकडं आरमार नव्हते. शिवरायांनी ते उभं केलं, दर्या प्रसन्न केला. जनहिताचं शिवराज्य निर्माण करायला समुद्रानं साथ दिली. शिवरायांचं आरमार पाहिल्यावर त्यांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com