#MokaleVha : फुगवलेला 'स्व'

mokalevha
mokalevha

एकदा एका प्रोजेक्‍टसाठी एका अनाथाश्रमात (खरंतर हा शब्द बोचतोय मला) गेले असताना त्यांच्या कार्यालयात व्यवस्थापकाची वाट बघत बसले होते. एक आठ-दहा वर्षांची छोटी मुलगी फडक्‍याने फर्निचर पुसत होती. मला बघताच तिने नमस्कार केला. पटकन एक खुर्ची पुसली आणि मला म्हणाली, ‘इथे बसा. ही खुर्ची मी छान पुसली आहे.’ ‘तू इकडे राहतेस?’ ‘हो, मी अनाथ आहे नं.’ माझ्या अंगावर काटा आला. या मुलीचं हसण्या-बागडण्याचं वय. ‘अनाथ’ वगैरे शब्दांचे अर्थ समजायची आताच काय गरज? जीवनाचं वास्तव कळण्याचं हे वय नाही. ‘तुझं नाव काय?’ तिचा चेहरा प्रफुल्लित झाला. मघाची विषण्णता पार पुसून गेली.  आनंदानं तिनं नाव सांगितलं, सोनिया रमेश कदम. असंच काहीतरी. नक्की काय नाव सांगितलं ते माझ्या आजही लक्षात नाही.

‘किती छान नाव आहे गं.’ ‘आवडलं तुम्हाला?’ ‘हो तर आणि तू नावाप्रमाणेच आहेस सोनसळी.’ ती हसली. आपलं पुसण्याचं काम तिनं सुरू ठेवलं. तेवढ्यात तिथल्या व्यवस्थापिका आल्या. कामाचं बोलून मी परतले.  परत त्या आश्रमात जायची वेळ तीन-चार महिन्यांनी आली. तोपर्यंत मी तिचं नाव विसरले होते. आजही ती ऑफिस पुसत होती. मला बघताच म्हणाली, ‘ताईंनी तुम्हाला बसायला सांगितलंय.’ ‘काय करतेस?’ ‘पुसतेय. ऑफिस स्वच्छ ठेवायची जबाबदारी माझी आहे. मला अजिबात धूळ आवडत नाही.’  ‘तू शाळेत नाही जात?’ ‘जाते की. ताई मला रोज शाळेत पाठवतात. पण, मला घरकाम करायला आवडतं.’ ‘शाळेत रोज जायचं. घरकाम फावल्या वेळात करता येतं की. तुझं नाव विसरले गं मी. सांगतेस परत?’ ‘हो. मनाली राम केळकर.’ तिचं पहिलं नाव माझ्या लक्षात नव्हतं. तरीसुद्धा वाटलं हे काहीतरी वेगळ आहे.

‘तुमचं नाव काय?’ मी नाव सांगितलं. तिनं हसून मान डोलावली.  आश्रमात मी एक प्रोजेक्‍ट करायचं ठरवलं. शाळेतल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना समाजात कसं वावरायचं याचं शिक्षण द्यायचं. आज मी ऑफिसमध्ये जाताच ती मागं धावत आली. ताईंनी माझ्याकडे जी मुलं या प्रोजेक्‍टमध्ये भाग घेणार होती, त्यांची लिस्ट दिली. आज मला तिचं नाव लक्षात होतं. लिस्टमध्ये मला तिचं नाव दिसलं नाही. मी ताईंना विचारलं,

‘मनाली नाहीये का आपल्या प्रोजेक्‍टमध्ये?’ तिनं उत्तर दिलं. ‘आहे की मी. पण, माझं नाव मनाली नाहीये.’ ‘गेल्या वेळी मला तू हेच नाव सांगितलंस ना?’ ‘हो. त्या दिवशी माझं हेच नाव होत.’ ‘म्हणजे?’ ‘म्हणजे आज हे नाव नाहीये.’ माझ्या साशंक चेहऱ्याकडे बघून ताई म्हणाल्या, ‘हिचं नाव रोज वेगळं असतं. आज काय आहे सांग गं मावशीला.’ ‘खरे.’ ‘आणि मधलं नाव?’ ताईंनी विचारलं. ‘अंsss आठवत नाहीये.’

‘आठवलं, मेनका सचिन खरे.’ हे काय गौडबंगाल? ‘नाव असं रोज कोणी बदलत नाही गं. एकच नाव आपल्याला जन्मभर असतं.’ म्हटलं  ‘ह्यॅंss असं कुठं असतं. मला जे आवडतं ते नाव मी रोज घेते.’ ‘का?’ ‘कारण मला नावच नाही. मी स्टेशनवर जन्मले.’ हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर तसूभरही दु:ख नव्हतं, विषण्णता नव्हती. होता तो फक्त आनंद. ‘वेगवेगळी नावं खूप आवडतात. मग मी रोज सकाळी माझं नाव ठरवते आणि सगळ्यांना सांगते. गेल्या वेळी तुम्ही येऊन गेल्यावर दुसऱ्या दिवशी माझं नाव तुमचं होतं.’  माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या सगळ्यांना मी सांगत असते. आपल्यावर आलेल्या परिस्थितीशी तडजोड करू नका. ती स्वीकारा. यातला ‘स्वीकार’ हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. 

कारण, तडजोड करताना बऱ्याचदा आपला ‘इगो’ सुखावला जातो. ‘इगो’ हा उद्धट, असमंजस, चुकीच्या समजुतीवर आधारलेला आणि प्रमाणाबाहेर फुगवलेला ‘स्व’ असतो. It is very nasty part of our self आणि कुठलीही गोष्ट स्वीकारली की मग त्यातून उत्तम मार्ग निघू शकतो. जसा या मुलीने काढला. आपण अनाथ आहोत, आपल्या आई-बापाने आपल्याला नाव ठेवलं नाही, हे आपण हसतमुखानं स्वीकारायला शिकलं पाहिजे, हे या मुलीला शिकवायला कोणाही समुपदेशकाची मदत लागली नाही.  आपल्याला एक नाव नसण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. आपल्याकडं काय नाही याचं दु:ख करण्यापेक्षा जे आहे, त्यात आनंद शोधायचा हे आपल्याला लहानपणी शिकवलं होतं. पण, आपल्याकडे जे नाहीये, ते नाहीये म्हणून त्यांत आनंद शोधायचा, हे तिला फार लहान वयात कळलं होतं. कोणीही न शिकवता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com