प्रार्थनेतील स्वयं-सूचना

Prayer
Prayer

आपण स्वतःला ज्या स्वयं-सूचना देतो, तीच आपली स्वतःची प्रार्थना असते. गेल्या ३ नोव्हेंबर रोजी ‘प्रार्थना’ या लेखामध्ये उल्लेख केलेल्या दोन तंत्रांपैकी हे एक. आपल्या इच्छाशक्तीवर (will power) आणि विश्वासावर (faith, trust) आधारित असे सर्वात सोपे, प्रभावी आणि परिणामकारक तंत्र आहे. हे शिकण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची गरज नाही. फक्त काही नियम आहेत जे वापरले तर परिणाम होतो. आपल्याला जे नको आहे ते म्हणण्यापेक्षा आपल्याला जे हवे आहे ते मागितले, तर नक्की मिळते, या श्रद्धेवर आधारित हे तंत्र आहे.

बऱ्याचदा आपण जसे आहोत तसे आपण आपल्याला आवडत नाही. कारण, आपल्या मनातली आपली आदर्श प्रतिमा वेगळी असते. आपले हित स्वास्थ, यश, आनंद आणि सुख हे पाच पैलूंवर (शारीरिक आणि मानसिक आरोग्य, बौद्धिक क्षमता, भावनिक क्षमता, सामाजिक बांधीलकी, आध्यात्मिक बैठक) अवलंबून असते. या पाच पैलूंतील आपली क्षमता वाढवायची असेल किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वात, सवयीत बदल करायचा असेल किंवा आपले ध्येय, आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर या तंत्राचा उपयोग करता येईल.

काहीवेळा आपल्या जागरूक मनाला (conscious mind) सुचवलेले बदल करण्याची इच्छा असते; परंतु आपल्या अवचेतन किंवा सुप्त मनाच्या (subconscious mind) चुकीच्या प्रोग्रामिंगमुळे आपण आपल्याला हवे ते साध्य करू शकत नाही. 

यामध्ये जागरूक सजग मनाद्वारे आपल्याला जे हवे आहे ते आपल्या अवचेतन मनावर बिंबवतो. त्याला सतत सांगतो की ‘मला हे हवे आहे’. आपले अवचेतन मन  ते स्वीकारते आणि जतन करते. मग आपल्यात बदल घडतो. तुम्ही किती प्रखरतेने, ध्यासाने हे तंत्र वापरता त्यावर ठरते की, आपली प्रार्थना कधी फळाला येईल. आपण यात सुप्त किंवा अवचेतन मनाचे प्रोग्रामिंग बदलणार आहोत. इतक्या वर्षात चुकीचे झालेले अवचेतन मनाचे प्रोग्रामिंग कसे बदलायचे?

एक किंवा दोन वाक्ये तयार करायची जी आपली प्रार्थना असेल. वाक्य सुटसुटीत हवीत; कारण आपल्याला ती सतत म्हणायची आहेत. त्यात लय हवी, पद्याच्या स्वरूपात असल्यास उत्तम. कारण  गाण्याच्या स्वरूपातील वाक्ये चटकन पाठ होतात. 

उदा. ‘मी माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी खूप मेहनत करतो आणि म्हणून माझे आयुष्य खूप सुखात आणि आनंदात चालले आहे.’ हे वाक्य सकारात्मक हवे व  वर्तमानकाळातले हवे. वाक्य जसेच्या तसे म्हणजे कानामात्रेचा जराही फरक न करता म्हणायला हवे.

आपली पाचही इंद्रिये वापरून, मनात आपल्या बदलाची प्रतिमा निर्माण करून, त्यात भावना ओतून, प्रार्थनेशी समरस होऊन शांतपणे, मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणायला हवीत. जागेचे आणि कितीवेळा वापरायचे याला बंधन नाही; पण खाली दिलेल्या चार वेळी वापरल्यास फायदा लवकर होतो.  
  ध्यान करताना 
  सकाळी उठल्यावर लगेच 
  रात्री झोपण्यापूर्वी
  अंघोळ करताना
या चारही वेळी आपला मेंदू अल्फा लहरीमध्ये असतो. त्यामुळे तो अधिक ग्रहणशील (Receptive), मुक्त आणि सर्जनशील असतो. एडिसन, आइनस्टाइन आणि बऱ्याच हुशार विचारवंतांनी त्यांच्या कामासाठी यावेळेचा सदुपयोग केला होता. या वेळा व्यतिरिक्त आपण कधीही, आपले मन जेव्हा नकारात्मक विचारांनी ग्रासलेले आहे किंवा आपल्याला गरज वाटेल तेव्हा सतत एखाद्या जपासारखी ही वाक्ये म्हटली पाहिजेत. आपल्यातल्या बदलाचा आपल्याला ध्यास लागला पाहिजे. आपली प्रगती ही आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते, श्रीकृष्णाने भगवतगीतेतही हेच सांगितले आहे. आपण विष प्यायचे की अमृत, हेही आपल्याच हातात आहे. आयुष्य काळजीत चिंतेत, व्यथेत, नकारात्मकतेत, षड्रिपूंच्या सहवासात घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रार्थनेत व्यतीत करणे नक्कीच उत्तम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com