#MokaleVha : अट्टहास माणूस जपण्याचा!

Couple
Couple

माझ्याकडे एक जोडपं समुपदेशनासाठी आलं. दोघांशी स्वतंत्रपणे बोलले तेव्हा लक्षात आलं, की दोघांनाही एकमेकांबद्दल असंख्य तक्रारी आहेत. नवऱ्याला वाटत होतं की, ‘‘माझ्या बायकोसाठी योग्य काय आहे? हे मला जास्त चांगलं कळतं. कारण, ती स्त्री आहे आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे.’’

तिला डान्स शिकायचा आहे तर त्याचं म्हणणं घरात राहून तिने गाणं शिकावं. आता तिला कसली आवड आहे हे तो ठरवणार का? तिचं म्हणणं होतं, ‘‘माझा नवरा डान्स नको म्हणतोय कारण घरात राहून तो शिकता येणार नाही. त्यापेक्षा गाणं शिक आणि ते पण घरी प्रायव्हेट क्लास करून. लग्न झाल्यापासून या लोकांनी गोष्टी माझ्यावर लादल्या आहेत. माझ्यासाठी योग्य अयोग्य ही मंडळी ठरवणार. माझा नवरा नोकरीसाठी घराबाहेर जातो. त्याच्या नोकरीच्या ठिकाणी स्त्रियाही आहेत. पण मला म्हणे की, तू घरात राहूनच नोकरी कर.’’ 

लग्न होऊन नवरी गृहप्रवेश करते तेव्हा गुलाबाच्या पायघड्या घालून तिचं स्वागत केलं जातं. का? तर नवीन सुनेचा गृहप्रवेश आणि सुनेच्या रूपात आलेल्या लक्ष्मीचा घरात प्रवेश. एका नवीन नात्याचा जन्म बायको, सून, भावजय आणि मग नात्याला नाव दिलं की अपेक्षा सुरू. त्यापेक्षा मंडळी, तिचा गृहप्रवेश करताना अस म्हणू या की, आपल्या कुटुंबात एक नवीन मेंबर आला आहे. नात्यापेक्षा तिचा स्वीकार एक व्यक्ती म्हणून करूया. तिच्यासाठी योग्य किंवा अयोग्य तिला ठरवू द्या. एखादं नातं जपायचं, फुलवायचं असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा तो आहे तसा स्वीकार करणं, त्याच्यावर बिनाशर्त (unconditional) प्रेम करणं आवश्यक असतं.

जसे तुम्ही अद्वितीय एकमेव आहात तशीच ती व्यक्तीही आहे. माझ्यासारखा मीच हे जेवढं खर आहे तेवढंच खरं तुझ्यासारखी तूच हेही असायला हवं. दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणं, तिच्या मताचा मान ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. तुम्हांला हवा म्हणून आणि हवा तसा बदल त्या व्यक्तीत घडला पाहिजे, याची अपेक्षा करणं म्हणजे त्या व्यक्तीला जखडून ठेवणं. काही नात्यात नात्यातल्या व्यक्तीला विचार करायला वाव दिला जात नाही. कारण काय तर? तुमच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा किंवा तुम्हांला असं वाटतंय की, ती व्यक्ती चुकीचे निर्णय घेईल. तर मग असा विचार करा की चुकेल पण त्यातूनच शिकेल. 

एका स्त्रीने समुपदेशनाच्या वेळी मला म्हटलं, ‘‘माझ्या मुलाला तुम्ही ठणकावून सांगा, तुझ्या आईला परजातीची सून चालणार नाही त्याचा तू विचारही करू नकोस.’’
‘‘हे मी त्याला का सांगू?’’ मी तिला विचारलं.
‘‘तुम्ही समुपदेशक आहात. तुमचं तो ऐकेल.’’
‘‘पण मी का सांगू? तो एकतीस वर्षाचा आहे. त्याला त्याची बायको कशी हवी आहे कळतंय.’’
‘‘नाही ना. त्याला कधी भूक लागते आणि त्याने किती खायला हवा हेही मीच सांगते.’’ 
‘‘का?’’
‘‘तेच तर सांगतेय. त्याला त्याचं हित कळत नाही.’’
‘‘असं तुम्हांला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कदाचित तुमच्या वरच्या प्रेमाने तो स्वत:ला हवा तसा निर्णय घेत नसेल किंवा तो त्याचा निर्णय घ्यायला असमर्थ असेल तर त्याला आपण समर्थ करूया. पण काहीही झाल तरी त्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका.  त्याचा निर्णय तुम्ही स्वीकारा.’’

खरंतर, प्रत्येक व्यक्तीला तिच्यासाठी काय योग्य आहे, हे नक्की कळत असतं, असं आपण मानू आणि त्या म्हणण्याचा स्वीकार करू. तेव्हाच आपण त्या व्यक्तीचा ती आहे तसा स्वीकार करायला शिकू. 

नात्यातला मोठा शत्रू म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर केलेली सक्ती. कोणाही व्यक्तीला नात्यांच्या अपेक्षांत जखडून ठेवणं म्हणजे त्याला पछाडणं. 

खरंतर, आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाबरोबरचा प्रवास हा सुंदर हवा. मग नातं कुठलं का असेना. अगदी मित्रत्वाच्या नात्यालाही हे लागू होऊ शकत. 

आपले त्या व्यक्तीच्या नातेसंबंधावरून त्या व्यक्तीची गुणवत्ता आपण ठरवत असतो. आपलं त्याच्याबरोबरचं नातं चांगलं असतं तोपर्यंत ती व्यक्ती अतिशय चांगली असते. पण काही कारणाने नातं बिघडलं की ती व्यक्ती लगेच वाईट होते म्हणजेच नातेसंबंधातल्या पातळीवर व्यक्ती वाईट की चांगली ठरवली जाते. 

नात्यांत आपली भूमिका शिक्षकाची नको तर विद्यार्थ्याची हवी. नातं जपण्यासाठी, टिकवण्यासाठी नात्यातल्या मागचा माणूस जपणं महत्त्वाचं आणि म्हणूनच आपण सर्व जण ते जपण्याचा प्रयत्न करूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com