#MokaleVha : अनुभूती

Sensation
Sensation

‘शीलाबाई, थांबशील नं मी येईपर्यंत. तीनपर्यंत नक्की येते. त्याआधी आली मुंबईची मित्रमंडळी, तर पंचाईत नको म्हणून तुला थांबवतेय.’

शीलाबाई गेली सहा वर्षं माझ्याकडं धुणं, भांडी, केर-पोछा करीत होती. आजपर्यंत तिच्यावर घर कधी सोडलं नव्हतं. पण, आजची गोष्ट वेगळी होती. आमची मित्रमंडळी दुपारी तीनपर्यंत मुंबईहून येणार होती आणि नेमकी आमच्या दोघांची महत्त्वाची मीटिंग निघाली. अगदी घाईघाईत संपवली असती, तरी तीन-साडेतीन वाजले असते. कदाचित, लवकर पोचली मंडळी तर पंचाईत नको म्हणून आदल्या दिवशी शीलाबाईला विचारलं.

ज्या मीटिंगसाठी एवढा आटापिटा केला, ती शेवटी कॅन्सलच झाली.
चला, आता लवकर घरी पोचता येईल. शीलाबाईला लवकर घरी पाठवता येईल. असं मनात आलं. खूप दिवसांनी आम्ही सर्व मित्रमंडळी जमणार होतो. आम्ही पुण्याला स्थायिक झाल्यापासून भेटी दुर्मीळच झाल्या होत्या.

घरी पोचलो. लॅच कीनं दार उघडत असतानाच शीलाबाईला हाक मारली.
ती घाईघाईनं बेडरूमच्या बाहेर आली. तिथं काय करत होती ती?
‘शीलाबाई, बेडरूमध्ये काय करत होतीस?’
‘अंऽऽ अंऽऽ मांजर आली वाटलं म्हणून आत गेले.’

जाताना मी बेडरूमचं दार बंद केलं होतं. खिडक्याही बंद होत्या. आत बघितलं तर पलंगावरची चादर चुरगळलेली. ही झोपली, बिपली की काय? मनाचा संताप झाला.
‘शीलाबाई, मी लवकर घरी येणार नाही म्हणून निवांत झोपलीस की काय पलंगावर?’ मी ओरडून विचारलं. 
‘मी... मी...’
चाचरत शीलाबाई म्हणाली.
मी तिला खूप बोलले. प्रत्येक शब्दागणिक माझा आवाज चढत होता. शीलाबाई स्वयंपाकघरात कोपऱ्यात थरथरत उभी होती.
‘काढून टाक कामावरून. चूक त्यांची नाही. तुझी आहे. अजून डोक्यावर चढवून ठेव,’ नवरा तणतणत म्हणाला.
‘बाई, नका राग धरू. कामावरूनही नका काढू. दोन छोटी लेकरं आहेत,’ तिनं विनवणी केली.
‘मग, हे आधी नव्हतं समजत.’
‘मला एकदा पलंगावर झोपून बघायचं होतं. मी कधीच पलंगावर नाही झोपले. कसा मऊ-मऊ असतो तो बघायचा होता. मी चुकले. मी पाया पडते तुमच्या.’
‘सगळ्या चादरी काढ आणि धुऊन टाक,’ मी अजूनही तिच्या अंगावर ओरडून बोलत होते.
‘सगळं करते; पण मला काढू नका.’
‘ते नंतर बघू. अशी माणसं नकोत आम्हाला. उद्यापासून कामावर येऊ नकोस,’ मी निर्णय दिला. मी स्वयंपाकघरात बघितलं. जेवलीपण असेल ओरपून, मनात आलंच. पण आश्चर्य, एका पातेल्यात शेवयाची खीर करून ठेवली होती. बाईनी सगळा स्वयंपाक केलाय; पण गोड विसरल्या वाटतं, असं समजून तिनं खीर केली होती. खरं तर मीटिंगहून येताना मी गुलाबजाम आणणार होते, विसरलेच. मंडळी अडीचला पोचली. त्यानंतर नुसता धुमाकूळ, गप्पा, चेष्टा, विनोद, हसतखेळत जेवणं झाली. सगळ्यांनी खीर आवडीनं खाल्ली.
‘ताज हॉटेलची रेसिपी दिसतेय.’
‘ताज? ही काय भानगड?’ सगळ्यांचे चेहरे प्रश्नार्थक. ‘पोचली वाटतं बातमी. एक दिवस राहिलो होतो. पण, खास गंमत तर ऐका. आमच्या खोलीच्या शेजारी होता ‘राजपुताना स्वीट’. खास श्रीमंत लोकांसाठी बनवलेला. भाडं दिवसाला दीड लाख,’ नवरा खुशीत म्हणाला.
‘दीड लाख?’ 
‘येस. सकाळी आम्ही खोलीच्या बाहेर पडत होतो तर तिकडे साफसफाई चालली होती. आम्हाला उत्सुकता, आहे तरी कसा आतून. मग सफाई कामगाराला विचारलं, बघू का? तर म्हणाला, पाच मिनिटांत बघा.’
‘वॉव! कसा होता गं आतून?’
‘फोटो तरी काढायचे.’
‘काढले, थांबा दाखवते.’
मी खूष होऊन फोटो आणले.
एखादा राजवाडाच जणू. प्रत्येक रूममधून समुद्र दिसत होता. दिवाणाखान्यातल्या झोपाळ्यावर बसलो तर वाटलं समुद्राच्या लाटांवरच झुलतोय आपण. पाय रुततील इतके जाड गालिचे; राजेशाही पलंग असलेली बेडरूम म्हणजे आरसे महालच जणू. न राहवून त्यावर एक मिनिट का होईना झोपून बघितलं. बाथरूम तर आपल्या घराएवढी असेल. तिथं असलेल्या नाजूक आणि अत्यंत महागड्या कपातून खोटा खोटा चहा पितानाचा. हे बघ प्रत्येक खोलीत आमचा सेल्फी आहे.’
‘फाइव्ह स्टार हॉटेलातला राजपुताना स्वीट, इतके दिवस नुसतं मासिकातच फोटो बघत होतो. तुम्ही पाच मिनिटं का होईना, तुम्हाला राहिला मिळालं, नाहीतर दिवसाला दीड लाख रुपये भाडं परवडेल का आपल्याला?’
मी नवऱ्याकडे एकदम चमकून बघितलं. माझ्या जे मनात आलं तेच त्याच्याही आलं असावं.
राजपुताना स्वीट आम्हाला परवडणारा नव्हता, तरी ते सुख आम्ही पाच मिनिटं उपभोगलं; मग शीलाबाईला आमच्या पलंगावर एकदा झोपावंसं वाटलं, यात तिनं काय मोठा गुन्हा केला होता?
दुसऱ्या दिवशी उजाडताच नवऱ्याला म्हटलं, 
‘बोलवूया का शीलाबाईला?’
‘जरूर बोलाव. अशी चांगली बाई मिळणार नाही. आपण वेड्यासारखेच वागलो काल.’ तेवढ्यात बेल वाजली. शीलाबाई दारात उभी होती. ही घटना माझ्यासाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी होती. आपण सगळेच चुका करत असतो. पण, आपल्या चुका आपल्याला दिसत नाहीत आणि त्यामुळे त्याला काही शिक्षेची गरज आहे, असं तर अजिबात वाटत नाही. मात्र, दुसऱ्यांच्या चुका चटकन दिसतात आणि इतकंच नव्हे तर त्यांना आपल्याला शिक्षाही करावीशी वाटते आणि आपल्यापेक्षा दुबळ्या लोकांना आपण करतोही. या अनुभूतीमुळे मी नक्कीच बदलले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com