#MokaleVha ज्ञानदीप लावू जगी

पुष्कर औरंगाबादकर
Sunday, 9 August 2020

‘कीर्तन’ म्हटलं की आपल्याला दिसतो विठू माउली समोर उभा असलेला एक कीर्तनकार, त्याच्याबरोबर असणारे साथीदार आणि समोर अत्यंत तन्मयतेनं तल्लीन झालेला श्रोतृवर्ग! ‘भगवंताच्या कथा’ आणि ‘संत वाङ्मय’ आपलं वक्तृत्व, संगीत, गायन, अभिनय, नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून अत्यंत अभ्यासू पद्धतीनं सादर करणारा हा एकपात्री कलाकार म्हणजे ‘कीर्तनकार’! 

‘कीर्तन’ म्हटलं की आपल्याला दिसतो विठू माउली समोर उभा असलेला एक कीर्तनकार, त्याच्याबरोबर असणारे साथीदार आणि समोर अत्यंत तन्मयतेनं तल्लीन झालेला श्रोतृवर्ग! ‘भगवंताच्या कथा’ आणि ‘संत वाङ्मय’ आपलं वक्तृत्व, संगीत, गायन, अभिनय, नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून अत्यंत अभ्यासू पद्धतीनं सादर करणारा हा एकपात्री कलाकार म्हणजे ‘कीर्तनकार’! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हरिकीर्तनाची ही परंपरा हजारो वर्षांपूर्वी देवर्षी नारद मुनींपासून सुरू झाली आणि पुढे तिच्या अनेक शैली आणि परंपरा विकसित होत गेल्या. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर आधी आपल्या पेशन्टला तपासून मग काय औषध द्यायचं ते ठरवतो; त्याचप्रमाणे कीर्तनकारांनी बदलत गेलेल्या काळात त्या त्या समाजव्यवस्थेचं अगदी अचूक ‘डायग्नोसिस’ केलं - आणि त्या त्या काळानुरूप विषय आपल्या कीर्तनांमधून मांडले! हरिकीर्तनामधून दिली गेलेली अध्यात्म-धर्माची शिकवण असेल, राष्ट्रीय कीर्तनांमधून दिली गेलेली राष्ट्रीय अस्मितेची शिकवण असेल, किंवा कीर्तन सप्ताहांमधून सांगितले गेलेले वंदनीय आणि चिंतनीय विषय असतील... कीर्तनाने समाजावर कायम व्यापक, सहिष्णू आणि दैवी संस्कार घडवले. मात्र त्यासाठी पूरक ठरलं ते म्हणजे आपल्या समृद्ध मातीमध्ये जन्माला आलेलं कालातीत स्वरूपाचं ‘संत वाङ्मय’!

आज काळजी वाटते की ‘मनोरंजन’ आणि ‘प्रशिक्षणाच्या’ गलिच्छ माध्यमांच्या गर्दीत कीर्तनासारखं इतकं प्रभावी माध्यम हरवत तर नाही ना चाललेलं? कीर्तन करणारी तर सोडाच पण कीर्तन ऐकणारी पण तरुणाई हळूहळू कमी होत चालली आहे. तरी देखील आज अनेक संस्था आणि ज्येष्ठ कीर्तनकार गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून कीर्तन पुढच्या पिढीला देण्याचं कार्य अविरतपणे करत आहेत. परंतु एखाद्या तरुणांनी कीर्तन शिकायचं म्हटलं तर ‘त्याला पुढे स्कोप आहे का?’ या आई-वडिलांच्या स्कोपवादी विचारांमुळे एक खूप मोठा तरुण वर्ग कीर्तनासारख्या समृद्ध प्रशिक्षण-प्रकारापासून वंचित राहतो. त्या वर्गाला आज या ओघात आणायचं असेल तर स्वाभाविकच त्या तरुणाला, त्याच्या आईवडिलांना, आणि कीर्तनालाही थोडेसं बदलावं लागेल. 

आपण आजच्या काळातले तरुणाईला पडलेले प्रश्न, त्यांच्या व्यथा आणि त्यावर आपल्या समृद्ध संत वाङ्मयामध्ये असणारी कालातीत उत्तरं कीर्तनाच्या माध्यमातून, आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून मांडू शकलो, तर आजही ही तरुणाई कीर्तनाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. 

‘जॉब इंसेक्युरिटी’, ‘करिअर प्लॅनिंग’, ‘नेतृत्व विकास’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’, ‘उद्योजकता विकास’, ‘मेंटल स्ट्रेस’ या आणि अशा विषयांवर कॉलेज आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कीर्तनं होऊ लागली आहेत. पण एक प्रश्न अनुत्तरित राहिला - स्कोपवादी आईवडिलांचा! तर ऐका... कीर्तनामुळे अभिनय, वक्तृत्व, संगीत, गायन, नृत्य आणि सादरीकरणासाठी करावा लागणाऱ्या अभ्यासाची सवय आपल्या ‘बाळाला’ लागते. ते एकदा झालं की आपलं बाळ ज्या कुठल्या क्षेत्रात जाईल तिकडे प्रभावीपणे आपलं कार्य करू शकेल. हाच आजच्या भाषेत ‘सॉफ्ट स्किल्स’चा सगळ्यात सखोल अभ्यासक्रम नाही का?

‘कन्टेन्ट क्रिएशन’या आजच्या काळातल्या सगळ्यात ‘फलदायी’ क्षेत्रात प्रत्येक कीर्तनकार प्रचंड प्रभावी पद्धतीनं काम करू शकतो - कारण समाजव्यवस्था, सादरीकरण आणि सर्व कलांचा परिचय त्याला झालेला असतो. म्हणजेच ‘कीर्तन’ हेच सगळ्यात व्यापक ‘लाईफ स्किल’ नाही का? असं आपलं बाळ जागतिक पातळीवर ज्ञानाचे दीप लावल्याशिवाय राहील का? हे मी नव्हे नामदेव महाराज शेकडो वर्षांपूर्वी सांगून गेले - ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगीं!’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article pushkar aurangabadkar