भेट तुझी माझी स्मरते... (राज जाधव)

Raj-Jadhav
Raj-Jadhav

व्यवहार अनेकदा भावनांवर मात करतात आणि मग निर्णयांचं भूत आयुष्यभर मानगुटीवर बसतं. मात्र, गतकाळाचं हेच भूत एखाद्या क्षणी आपल्यासमोर उभं ठाकतं आणि मग मन सैरभैर होऊन जातं. ‘इंटिरिअर कॅफे नाइट’ ही शॉर्टफिल्म याच गोष्टीवर अतिशय तरलपणे भाष्य करते. भूतकाळाचा उसवलेला धागा नेमकेपणानं अधोरेखित करणाऱ्या या शॉर्टफिल्मविषयी...

भावनिक आणि व्यावहारिक बाबींत निर्णय घेताना बऱ्याचदा व्यावहारिक निकषांचं पारडं जड होत जाते. अनेकदा, मन मारून, नाईलाजानं आपल्याला काही ठोस पावलं उचलावी लागतात- याचा त्रास होणार असतो हे ठाऊक असतानाही. खरं तर, हा त्रास आपल्यापुरता मर्यादित असता तर हरकत नव्हती; पण यात कुणी दुसरी व्यक्ती समाविष्ट असेल तर? तुमचा निर्णय केवळ तुमचा न राहता समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावरही परिणाम करणारा असेल तर? वेगळं होण्याचा निर्णयही असाच. कौटुंबिक परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांमुळं बऱ्याच प्रेमींना असे निर्णय घ्यावे लागतात. 

...पण म्हणतात ना काळ हा सगळ्यात जालीम उपाय आहे. काळाच्या ओघात जखमेची तीव्रता कमी होत जाते. ती जखम तशी भरणारी नसतेच; पण कालांतरानं ती पहिल्यासारखी भळभळत नसते इतकंच. नाही म्हणायला, खपली भरून आल्यानंतरही आठवणींची सल खुपत राहते आतमध्ये; पण मनाला वेळीच ओढून ‘आज’मध्ये आणलं, की आपणही भानावर येतो. काळ लोटल्याचा अजून एक फायदा असा, की आता त्या दुःखाला कवटाळून न बसता, आपण फोर्सफुली मूव्ह ऑन होऊ लागतो, परिस्थितीला स्वीकारू लागतो. हेच प्राक्तन की काय म्हणत, त्या घटनेला पुस्तकातला एक हळवा चाप्टर समजून नॉर्मल आयुष्याचं नवं पर्व सुरू करून जगू लागतो; पण नशिबाचीही एक गंमत असते. आपण एखादी वस्तुस्थिती स्वीकारली, की ते परत पूर्ववत होऊ पाहत आपली परीक्षा घेतं.

प्रेमकथा सफल होतात किंवा अर्धवट राहतात. हे दोनच पर्याय समोर असताना समजा दैवानं तिसरी शक्‍यता निर्माण केली तर? अर्धवट वाटणाऱ्या प्रेमकथेची आयुष्याच्या उत्तरार्धात दुसरी इनिंग सुरू झाली तर? ‘इंटेरियर कॅफे नाईट’ ही तेरा मिनिटांची शॉर्ट फिल्म अशीच एक कहाणी आहे एका उतारवयातल्या जोडप्याची. या दोघांनी तरुणपणी परिस्थिती स्वीकारून, आपापले मार्ग बदलले असताना, एक दिवस अचानक नशीब त्यांना तीस वर्षांनी समोरासमोर उभे करतं. 

कोलकातामधलं एक कॉफीशॉप. संध्याकाळ उलटून गेलेली, शॉप बंद करण्याच्या काहीशी आधीची वेळ. रेडिओवर वातावरणाला आणि परिस्थितीला साजेसं, हेमंत मुखर्जीचं ‘कोतो दिन पोरे एले, एकटू बोशो’ हे बंगाली गाणं वाजतं आहे. (‘तू खूप दिवसांनी आली आहेस, थोडा वेळ थांब’ अशा साधारण अर्थाचं.) तो आत येतो, इतक्‍यात त्याची नजर एका टेबलावर स्थिरावते. कुणीतरी ओळखीचं असल्याची एक शंका, त्याच नजरेत घेऊन तो त्या टेबलापर्यंत जातो. ‘तो’ म्हणजे खुद्द कॉफीशॉपचा मालक, पांढऱ्या दाढीचे खुंट वाढलेला उतारवयातला नसिरुद्दीन शाह. तो येऊन तिच्यासमोर (शेरनाझ पटेल) बसतो. तीही समवयीन. आधी, कोण बसलं आहे हे पाहतापाहता होणाऱ्या तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर हळूवार कुठलंसं जुनं कोडं अनाहूतपणे सुटल्याचे भाव दाटतात. त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात, दाढीच्या मागं लपलेलं मिश्‍किल हास्य आणि आश्‍चर्यमिश्रित, स्तीमित झालेले, भरून पावलेले डोळे ओळखीचे वाटू लागतात. अखेर स्मितहास्यासरशी दोघांची ओळख पटते. मग गप्पा सुरू होतात. तीस वर्षांपूर्वी जिथं सर्व काही संपलं होतं तिथून पुढं. 

तीस वर्षांनंतर, तिच्याशी बोलल्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. लग्न करून, सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ती आता फक्त स्वतःसाठी जगायला घराबाहेर पडली आहे. कोलकातामधलाही आज तिचा शेवटचाच दिवस. त्यानंतर नैनितालला जाऊन राहणार असल्याचंही ती कळवते. म्हणजे आताही ताटातूट? नशिबाला नेमकं अपेक्षित काय आहे म्हणावं?
त्यांची शेवटची भेटही कॉफीशॉपमधलीच. समोर सध्याच्या नसीर आणि शेरनाझच्या गप्पा चालू असताना, मागच्या टेबलवर तीस वर्षांपूर्वीच्या शेवटच्या भेटीप्रसंगी, नसीर (नवीन कस्तुरीया) आणि शेरनाझ (श्वेता बासू प्रसाद) ही जोडी आपल्याला दिसते. नाईलाजानं तिला एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घ्यावा लागलेला असल्यानं, ही दोघांची शेवटची भेट असते.
तीस वर्षांपूर्वी दोघंही परिस्थितीपुढे हतबल होते; पण आता कदाचित नाहीत, नसावेत. म्हणजे जे हातातून निसटून गेलं होतं, ते पुन्हा आपलंसं करण्याची दुसरी संधी आयुष्य आज घेऊन आलं असताना, ते दोघं काय निर्णय घेतात याचं उत्तर म्हणजे, ‘इंटेरियर कॅफे नाईट’ ही शॉर्टफिल्म.

नसिरुद्दीन शाह किती मुरलेले अभिनेते आहेत, हे सर्वश्रुत आहेच. या शॉर्टफिल्ममध्येही त्यांचे एक्‍सप्रेशन्स, आवाज, योग्य ठिकाणी पॉझेस घेत केलेली संवादफेक आणि जेव्हा संवाद नसतात तेव्हा त्यांचे बोलणारे डोळे कमाल करून जातात. संवादाची शैली आणि वागण्याबोलण्यातला ‘विटीनेस’ हा काहीसा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सलमान हबीबचं एक्‍सटेन्शन वाटावा, असा असला तरीही जमून आला आहे.

तीच जादू शेरनाझ पटेलची. साधा आणि नैसर्गिक अभिनय. शेरनाझचा चेहरा आणि तिचं स्मितहास्य नेहमीच रिफ्रेशिंग वाटतं. तरुण शेरनाझची भूमिका करणाऱ्या श्वेता बसू प्रसादनंही छोट्याशा भूमिकेमध्ये उत्तम कामगिरी करत अभिनेत्री म्हणून तिच्यातली चुणूक, ‘इकबाल’ आणि ‘मकडी’नंतर पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. दिग्दर्शक अधिराज आणि श्वेता क्‍लासमेट असल्याने आणि श्वेतालाही ही कन्सेप्ट आवडल्यानं, तिने सहनिर्माती, कास्टिंग आणि अभिनय अशा अनेक बाबतीत मोलाची भूमिका निभावली. नवीन कस्तुरीयानं साकारलेला तरुण नसीरही उमदा वाटतो.

विशेषतः दोघांच्या दिसण्यात बरंच साम्य असल्याने तो तरुण नसीर म्हणून अगदीच परफेक्‍ट वाटतो. ती सोडून जाणार असल्याची घालमेल, राग आणि अगतिकता नवीननं पडद्यावर नेमकी साकारलेली आहे. दिबाकर बॅनर्जीला असिस्ट करत नवीननं याआधी ‘सुलेमानी किडा’ या चित्रपटात आणि ‘पिचर्स’ या वेब सिरीजमध्येही उल्लेखनीय काम केलं आहे.

नात्यांमधला एक हळवा कोपरा, फारच अलगदपणे उलगडण्याचा एक सुंदर प्रयत्न केल्याबद्दल अधिराज बोस या युवा दिग्दर्शकाचे कौतुक करायला हवं. दोन्ही जोड्यांमधले प्रसंग एकमेकांसोबत दाखवण्याचा प्रयोगही लाजवाब झाला आहे. परिस्थितीनुसार वेगवेगळे साउंड्‌स वापरून/ न वापरून, दोन्ही कालखंडातला फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्नही उत्तम. एडिटिंग आणि साउंड डिझायनिंगमुळे ही शॉर्टफिल्म अधिकच प्रभावी वाटते, हे विशेष. एकंदर, ही शॉर्टफिल्म आपल्या मनातल्या कप्प्यात दडलेल्या एखाद्या आठवणीची पोतडी हळूवार काढून आपल्यासमोर ठेवते. एखादी अर्धवट आठवण, कधी काळी जी सर्वस्व होती; पण आज काळाच्या ओघात हरवली आहे, आज तिचं अस्तित्वच कदाचित आपल्यासाठी अनभिज्ञ आहे, अशी एखादी आठवण. आपण जीव ओवाळून टाकायला तयार असतो अशी एखादी व्यक्ती, केवळ ती आपली नाहीये म्हणून नजरेआड होऊ द्यावी, आणि हे सत्य पचवून एक काळ लोटल्यानंतर एके दिवशी तीच समोर येऊन उभी रहावी, तर याला काय म्हणावं? आयुष्याकडून मिळालेला सेकंड चान्स? ज्यांना हा चान्स मिळाला त्यांना याचं सोनं करता यायला हवंच, शिवाय ज्यांना नाही मिळाला त्यांच्याही आठवणी, कॉफीची चव जिभेवर रेंगाळत रहावी तशा मनात सदैव दरवळत राहतीलच, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com