मनःशांतीसाठी सार्वकालिक सत्ये

Health-Work
Health-Work

हेल्थ वर्क
आपल्याला आपल्या अंतरंगात आणि बहिर्रंगात काय चालले आहे, हे एकसमयाच्छेदे करून, सतत, निर्लेपपणे समजत राहिल्यावर विचारधारा तुटू लागते. फक्त विचार राहतात. मग तेही तुरळक होतात. मग दोन विचारांमध्ये बराच काळ जातो. मग पहिल्यांदाच विचार ‘करता’ येऊ लागतो.

इतके दिवस नुसते विचार येताहेत आणि सगळे काही बिघडवून टाकताहेत, अशी अगतिक अवस्था असते. त्यापासून मुक्तता होते. कोणतीही गोष्ट करताना हालचाल एकदम थांबवणे हेदेखील विचारस्रोत थांबवते. पाणी प्यावेसे वाटल्यावर भांड्यात पाणी ओतण्याआधी एकदम नुसते थांबा. अनुभवा निर्विचारावस्था. जगरहाटीकडे बघताना सार्वकालिक सत्ये सतत आठवणीत ठेवल्यास सामान्यपणे मनःस्थिती बिघडवून टाकतील अशा गोष्टींनीही मनःस्थिती बिघडत नाही. 

आता सार्वकालिक सत्ये अशी -
१.     कुणीही आपणहून दुसऱ्या वाहनावर आदळायचा प्रयत्न करीत नाही. 
२.     तरीही जगन्नियंत्यांच्या इच्छेनुसार अपघात होतातच. 
३.     प्रत्येक अपघातात हानी नशिबानुसार वेगवेगळ्या प्रकारे होते. 
४.     आपण आपल्या बाजूने जमेल तेवढे चोख वाहन चालवायचे.

ही सत्ये माहीत असल्याने रस्त्यावर झालेल्या वाहनांच्या अपघात एकमेकांचा गळा धरणे, मारहाण, शिवीगाळ, सगळे ट्रॅफिक अडवून पोलिस पंचनामा, कोर्टकचेऱ्या अशा मनःशांतीस विघातक सर्व गोष्टी करायच्या की नाही, हे आपल्या हातात असते. आपल्या शरीराची रासायनिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ताबडतोब श्‍वास स्थिर करणे, झालेली हानी जितपत असेल त्या प्रमाणात परमेश्‍वराचे आभार मानणे आणि मार्गस्थ होणे, हे महत्त्वाचे!

सार्वकालिक सत्येही खूप असतात. वानगीदाखल काही -
१.     कोणालाही झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही.
२.     कर्माचे फळ आपण ठरवू शकत नाही.
३.     मृत्यूसमोर सर्व समान असतात. 

वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याची जरूर नाही. कोणतीही एक गोष्ट मनात आणली की, परिस्थितीचे आकलन वेगवेगळ्याच प्रकारे होऊ लागते. यालाच ‘ॲटिट्यूड गेस्टाल्ट’ असाही शब्द आहे. नीट पाहा. काय दिसते? वरीलपैकी एक सत्य मनात आणा. पुनः नीट पाहा. काय दिसते? कसे दिसते? मनःशांती बिघडते असे आपल्याला वाटते तिथे हा गेस्टाल्ट बदला. परिस्थिती तीच असते, पण तिचे आकलन आपल्याला वेगळ्या प्रकारे होऊ लागते. विशेषतः काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि भीती यांपैकी कोणत्याही भावनेने आपण ग्रस्त होऊ लागलो की, सार्वकालिक सत्ये मनात आणा आणि परिस्थितीत पडलेला फरक पाहा.
(उद्याच्या अंकात वाचा - निद्रासुख)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com