निद्रासुख

डॉ. राजीव शारंगपाणी
बुधवार, 10 एप्रिल 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
आपल्याला आनंद देणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी घडतात, त्या घडतात पण घडवता येत नाहीत. आपल्याला भूक लागते, पोट साफ होते, आपण प्रेमात पडतो या सर्व गोष्टी होतात, पण करता येत नाहीत. त्याचप्रमाणे झोप लागते पण ‘लागवता’ येत नाही. आपल्याला झोप यावी यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. खोलीत अंधार करू शकतो. एका उबदार बिछान्याची सोय करू शकतो. डोळे मिटून एका कुशीवर झोपू शकतो, पण झोप आपली आपणच येते. आजच्या जगातील पुढारलेल्या राष्ट्रांतील एक तृतीयांश लोकसंख्या आपोआप येणाऱ्या झोपेपासून वंचित असून, त्यासाठी झोपेच्या गोळ्या खाऊन झोप आणावी लागते. आपणही जलद गतीने तिकडेच चाललो आहोत. म्हणून झोपेच्या बाबतीत वेळीच ‘जागे’ होणे आवश्‍यक आहे. 

शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू आहे आणि मनही तणावमुक्त आहे, याचे एक लक्षण म्हणजे चांगली झोप येणे. दिवसभर शरीराची पुरेशी आणि योग्य हालचाल झाली असल्यास अंथरुणावर पडल्यापडल्या झोप येते. झोपेला आवश्‍यक असे बाह्य वातावरण आता आपल्या हातात फारसे पाहिले नाही. झोपेसाठी संपूर्ण काळोख असणे आवश्‍यक आहे, पण आपल्या घरात कुठूनतरी प्रकाश झिरपत असतो. शांतता आवश्‍यक आहे, पण कुठेतरी ध्वनिक्षेपक किंवा टीव्ही सुरू असतो. अशा स्थितीत आपण झोपणार असतो.

आतील वातावरण आपण पाहू शकतो. मनात विचारांचे थैमान सुरू असेल किंवा दिवसभर बसून शरीर आळसावले असल्यास झोप येणे अशक्‍य असते.

मग झोप आणण्याचा प्रयत्न केला जातो. तो नेहमीच फसतो. मग, कुणी हजार मेंढ्या मोजतात. सारखी कूस बदलतात. झोप काही येत नाही. अचानक पहाटे-पहाटे झोप येऊन जाते. शरीराला दररोज निदान तास, दीड-तास चांगली चालना मिळेल, अशी हालचाल झोप येण्यासाठी आवश्‍यक आहे.

चालणे यात धरू नये. कारण, ती एक नैसर्गिक हालचाल आहे. त्यात काही विशेष व्यायाम नाही. वजन उचलण्याचा व्यायाम, धावणे, पोहणे, सायकल चालवणे यांपैकी काही व्यायाम फार उपयुक्त ठरतात. योग्य श्‍वसनात दिवसभर राहिल्याने मनःशांती मिळते. अशा प्रकारे शरीरमनाची योग्य देखभाल केल्यास झोप ही समस्या उरत नाही. दुपारच्या योग्य झोपेमुळे मनःस्थिती संतुलित राहायला मदत होते. पर्यायाने ताणाशी संबंधित रक्तदाबासारखे विकार होत नाहीत. ज्या माणसावर निद्रादेवी प्रसन्न आहे, त्याचे आरोग्य चांगले असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rajeev sharangpani all is well sakal pune today