आहार आणि आरोग्य

डॉ. राजीव शारंगपाणी
सोमवार, 6 मे 2019

ऑल इज वेल
आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!  शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा   आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र
एक अभागी चिंतातुर नुकताच भेटला. त्याच्या जीवनातला आनंद हिरावण्याचे पुण्यकर्म अनेकांनी केले होते. आपल्या आहाराविषयी बोलताना तो म्हणाला, ‘‘सध्या मी अंडी खात नाही, कारण त्यात कोलेस्टेरॉल असते. मांसाहार करणे सोडून दिले आहे, कारण रक्तदाब वाढण्याची भीती आहे. साखरेचे पदार्थ खात नाही, कारण मधुमेह आनुवंशिक आहे. पालेभाज्यांनी पोटात गॅस होतो, टोमॅटोमुळे लघवीमध्ये खडे होतात...’’ आहाराबद्दलच्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तो सांगत होता आणि तो अतिशय जाणीवपूर्वक दुःखात राहात होता. मी म्हटले, ‘‘तू श्‍वाससुद्धा घेऊ नकोस, कारण ही हवा किती दूषित आहे! त्यामुळे कर्करोग होतो. आपण दररोज पितो ते पाणी किती खराब आहे! त्याने आतड्याचे विविध रोग होतात, म्हणून तू पाणीही पिऊ नको.’’ गृहस्थ रागावले आणि म्हणाले, ‘‘मी माझ्या आरोग्याला एवढे जपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही माझी थट्टा करता?’’ आपल्या सर्वांना खाणे आवडते. आहारातील सात्त्विक, राजस आणि तामस पदार्थ आवडतात. मात्र वेळोवेळी काही घाबरट लोक जगातल्या एकूण एक खाण्याच्या पदार्थांपासून होणारे अपाय उच्चरवाने प्रतिपादन करतात. कित्येक लोकांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतात.

‘आहारशास्त्र’ शास्त्र म्हणून ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष आयुष्यात फार शास्त्र आल्यास आयुष्यातील आनंद नष्ट होतो. एखाद्या पदार्थात ‘चवीपुरते मीठ टाका’ असे म्हणणे आणि ‘४० मिलिग्रॅम मीठ टाका’ म्हणणे, यातील मूलभूत फरक आपण लक्षात घ्यायला हवा.
(उद्याच्या अंकात - शारीरिक परिश्रमावर ठरवा आहार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rajiv Sharangpani all is well sakal pune today