श्‍वासोच्छ्‌वास - स्वच्छ  अंतःकरणाची सुरवात  

डॉ. राजीव शारंगपाणी
बुधवार, 5 जून 2019

"आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

हेल्थ वर्क
शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो. तो अस्थिर असेल तितका छातीकडे जाऊ लागतो. पूर्ण बिघडला असल्यास फक्त छातीच हलते. सदैव श्‍वासाकडे लक्ष ठेवणे याहून नियोजन करण्यासारखे आयुष्यात काहीही नाही. आपला श्‍वास हा कधीही बिघडू देऊ नये. श्‍वास ही शरीरातील पहिली गोष्ट आहे की, ज्याच्या आधारावर शरीरातील साऱ्या क्रिया चालू आहेत. हा श्‍वास आपण कधीही घेत नाही. तो येतो. श्‍वास न घेण्याचा प्रयत्न करून पाहा, तो आत येणारच. आपण फक्त त्याची दिशा ठरवू शकतो. तर ती दिशा ही पोटाकडे ठेवावी. पोट हलत राहिले पाहिजे. हे जमले म्हणजे श्‍वासदेखील आपण घेत नाही, हे समजते. त्यामुळे अवास्तव अहंकार टिकत नाही.

अंतःकरण साफ करण्याची ही पहिली पायरी. अंतःकरणाचे काय सांगावे? त्याबद्दल सांगताना भलेभले थकले. पण, तरीसुद्धा सांगायचे म्हणजे अंतःकरणाचे चार भाग कल्पिलेले आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे ते चार भाग. मन प्रत्येक गोष्टीचा साधकबाधक विचार करते. बुद्धी त्यावर निर्णय घेते. चित्त हे लक्ष ठेवते आणि मी पणाची जाणीव म्हणजे अहंकार. प्रत्येक क्षणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि जरूरीपुरता अहंकार एकत्रितपणे ठेवणे म्हणजे योग. यापैकी चालू क्षणापासून यातील कोणताही भाग दूर गेला की वियोग होतो आणि तो दुःखद असतो. मन थाऱ्यावर नाही, बुद्धी भ्रष्ट झाली आहे, चित्त विचलित झाले आहे असे आपण म्हणतोच. जगामध्ये काहीएक अतर्क्‍य शक्ती आहे. त्या शक्तीचा आणि आपला काही संबंध आहे. हा संबंध उत्तमरीत्या जोपासणे हा योगमार्ग आहे. एकदा हा संबंध उत्तम जोपासला गेला की आपणच ती शक्ती आहोत, असे समजण्याची शक्‍यता वाढते. आयुष्य यदृच्छेने जाऊ लागते. आयुष्यात कोणताही अडथळा आहे, असे वाटत नाही. कारण, कोणत्याही परिस्थितीत भानावर असणे एवढाच योग उरतो. 

(सोमवारच्या (ता .१०) अंकात वाचा - आपल्यापुरता योगमार्ग बनविणे महत्त्वाचे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rajiv Sharangpani all is well sakal pune today